Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ७८- लक्ष/लक्ष्य , लक्षवेधी/लक्ष्यवेधी


लक्ष/लक्ष्य , लक्षवेधी/लक्ष्यवेधी  

लक्ष आणि लक्ष्य हे दोन वेगळे, वेगवेगळ्या अर्थाचे शब्द आहेत. ज्या गोष्टीवर 'लक्ष' ठेवले जात असते ती गोष्ट 'लक्ष्य' बनत असते. म्हणून पोपटाकडे पाहून बाण सोडणारे इतर शिष्य आणि त्या पोपटाच्या केवळ डोळ्यावर नजर ठेवून बाण सोडणारा अर्जुन यांची लक्ष्येच वेगवेगळी असतात. लक्ष्यावर लक्ष ठेवल्याशिवाय लक्ष्यभेद होऊ शकणारच नाही; त्याचप्रमाणे लक्ष्यप्राप्ती देखील होणार नाही. आपले लक्ष्य नेमके काय आहे, हे समजल्याशिवाय कुठे लक्ष केंद्रित करायचे तेही ठरवता येणार नाही.


लक्षवेधी/लक्ष्यवेधी

कुणाचेही लक्ष वेधून घेणारी एखादी गोष्ट असेल, तर त्या गोष्टीचे विशेषण म्हणून लक्षवेधी हा शब्द वापरता येईल. उदाहरणार्थ, लक्षवेधी सूचना, लक्षवेधी भाषण, लक्षवेधी लेख इत्यादि.

लक्ष्यवेधी हा शब्द मात्र नेमक्या ठिकाणी आघात अथवा प्रहार करणाऱ्या, इष्ट त्या विषयाचा वेध घेणाऱ्या अश्याच गोष्टीसाठी वापरता येईल. त्यामुळे धनुष्यातून सुटणारा बाण किंवा विमानातून केला जाणारा बॉम्बहल्ला लक्ष्यवेधी असू शकतो. तोफांचे वर्णन करताना त्यांना ‘लक्ष्यवेधी’ म्हणण्याऐवजी ‘लक्षवेधी’ म्हटले, तर त्या तोफा केवळ पाहाणारांचे लक्ष वेधून घेतात एवढाच अर्थ व्यक्त होईल. तोफा या लक्ष्यवेधीच असल्या पाहिजेत, नुसत्या लक्षवेधी नकोत.

- नेहा लिमये

(संदर्भ: शब्द चर्चा- मनोहर कुलकर्णी)

No comments: