Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले #२



रे 

कसा आहेस ? , हा प्रश्न तुला विचारते म्हणजे मी मला पण विचारतेच एक प्रकारे. तर, मी ठीक नाहीये.... काल आपल्या बुचाच्या झाडाची फांदी मोडून पडली.... आपली आपणच. पडली ती थेट घराच्या फाटकावर , ते फाटक पार चेमटून गेलय बिचारं. त्यात रस्ता ब्लॉक झाला ते वेगळंच. अंगणात बुचाच्या पानांचा सडा आणि रस्त्यावर फुलांचा. नशिबाने हे रात्री झालं त्यामुळे जीवित हानी कि काय म्हणतात ती टळली  तेवढी. मग fire brigade बोलावली , त्यांनी शिडी लावून फांदीचे - मोठे ओंडके पाडले , रीतसर मोट्ठ्या कात्रीने पान - फुलं फांदीपासून वेगळी केली. मग मोट्ठे ओंडके त्यांच्या गाडीवर चढवले. हे सारं चालू असताना mseb वाले हजर आले , त्यांनी सगळ्या वायरी आणि दिव्याचा वाकलेला खांब सरळ केला. जवळ जवळ दोन तास हा उपक्रम झाल्यावर fire brigade आणि mseb वाले आले तसे  भुर्रकन निघून गेले

आता फाटक दुरुस्त करून घ्यायला लागणार ..... म्हणजे आला खर्च परत. पण खरं सांगू , मला त्या फाटक चेमटल्यापेक्षा हि फांदी मोडून पडली त्याचाच जास्त वाईट वाटलं. मी रात्रभर विचार करत राहिले, का मोडली असेल ती ? कुठेतरी वाचलं होत, झाडांना सुद्धा मन असतं म्हणून. मग काय वाटलं असेल त्या फांदीला ...... आपला उपयोग एवढाच असं वाटून तिने स्वतःला वेगळं केलं असावं का तिला आतून पोखरलं होतं वाळवीने म्हणून

ती बुचाची फुलं बघ ..... परवापर्यंत त्या फांदीवर मस्त डुलत होती, काल आधी जमिनीला जाऊन भिडली, मग गुपचूप कोपऱ्यात पडून राहिली आणि आज निघून गेली अखेरचा सुगंध पसरवायला
राहून राहून मला ती फांदी खुणावतेय बघ.........  आणि झाड नसलेल्या फांदीमुळं उदास झालय

त्या फांदीसारख करता येत असतं आपल्यालाही तर किती बरं झालं असतं नं रे... आपला कार्यभाग संपलाय एखाद्या नात्यातला कि आपसूक बाजूला व्हायचं. मनात कडवटपणा ठेवता , विसरून जायचं असं नातं होतं कधीकाळी ते. इतकं निर्लेप आयुष्य जगता यायला हवं, नाही

संपलेल्या नात्यात सुद्धा आपण ओलाव्याची फट शोधत राहतो नेहेमी, का तर अजूनही काहीतरी वाटतंय समोरच्याला एवढच समाधान मनाला म्हणून. त्या फटीतूनही मग आपण जुने दिवस उजळवायला बघतो

यू टर्न फक्त वाहतुकीच्या नियमात ठीक असतो, नात्यात इतका सहज घेता येत नाही !  ह्म्म्म ......  शिकायला हवं नं आपण, detach व्हायला. स्वखुशीने, समजून, सहजपणे !! 

असो... मला माहितीये , "कसा आहेस" या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर ना तू देऊ शकणारेस ना मी ; म्हणूनच लवकर ये, बुचाच्या झाडाची समजूत काढायला, फांदी गेल्यापासून केविलवाणं दिसतंय अगदी !

-  (त्या फांदीच आणि जमल्यास तुझं मन वाचू पाहणारीमी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: