Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले # २०


मनू

तुझी पत्र यायची मी खूप वाट पाहतो हल्ली. याला दोन कारण आहेत - एक, ती वाचताना तू डोळ्यांसमोर उभी राहतेस  - थोडी हळुवार, बरीचशी रागीट पण आतून एकदम हळवं मन घेऊन जगणारी अशी मनू
दोन - त्या पत्रांना तुझ्या अंगणातल्या फुलांचा सुगंध असतो..... जुन्या दिवसांची  आठवण करून देणारा.  

शाळा सुटल्यावर पायऱ्यांवर बसलेली आठवतेस तू मला. राखाडी रंगाचा युनिफॉर्म, लाल रंगाचा हेअर बँड घालून पाय जवळ घेऊन एक हात हनुवटीवर ठेवून वाट पाहत बसलेली एव्हढुशी तू. त्या वेळी तुला न्यायला सायकलवरून एक काका यायचे. डोळ्यात प्राण आणून त्यांची वाट पाहायचीस तू. त्यांना यायला मिनटं जरी उशीर झाला तरी तुझे डोळे गच्च भरून यायचे. त्यातल पाणी बाहेर पडू नये म्हणून आटापिटा करायचीस पण तरी ते तुला जुमानता वाहू लागायचं. आम्ही सगळे चिडवायचो तुला रडकी म्हणून. येता जाताना शिपाई काका , शाळेच्या आपल्या बाई तुला समजवायच्या , अगं किती रडशील, येईल कोणीतरी थोड्याच वेळात. असं रडतात का वेडाबाई

मी ग्राउंड वर खेळत असायचो पण लक्ष असायचं माझं अधून मधून तुझ्याकडे. तुझे केस ओढायला, तुला टपली मारून जायला मजा यायची. रडकुंडीला आलेली तू, रागावलेली, फुगलेली मनू अजून गोड दिसायचीस

तुला शाळा फार म्हणजे फार आवडायची. अभ्यास करायला आवडायचं. पण एकदा का शाळा सुटली कि तुला घराची पण तेवढीच ओढ असायची .... कधी एकदा घरी जातेस आणि आईला सांगतेस सगळं असं होऊन जायचं तुला. मग दोन तीन मिनटं सुद्धा इकडे तिकडे झालेली खपायचे नाहीत तुला. जणू काही कुणाला तुझी काही काळजीच नाही , एकटी आहेस तू या जगात. काकांच्या सायकलची रिंग वाजली कि धावत सुटायचीस . हीच का ती रडणारी मुलगी असा प्रश्न पडावा इतकी गालभर हसायचीस मग

किती निरागस असतं बालपण मनू. मोठं झाल्यावर आपण मुखवटे घालून जगतो फक्त

जशी तू असतेस सध्या सदानकदा "मी ठीके" चा मुखवटा घालून. खर तर अजूनही तुझे डोळे गच्च भरलेले असतातच .... फरक इतकाच आता तो पाणी बाहेर येऊ देण्याच "आटापिटा" जमतो तुला. सगळं एकटीच सोसत बसतेस

यावर एक औषध आहे माझ्याकडे. मी त्या सायकलवाल्या काकांसारखा येतोय तुला भेटायला , तुझं गालभर पसरलेलं हसू पाहायला. बुचाच्या झाडाला सांगून ठेव .... तुझी फुल ज्याला पाठवली , तो त्याच्या सुगंधासकट येतोय

माझी वाट पाहत पायऱ्यांवर तशीच बसून राहशील नं ? (डोळ्यात पाणी आणता  !!)

- (बुचाचं झाड  आणि तू - दोघांच्या आठवणीत ) मी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: