Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ५२


रे

काही माणसांच्या येण्याची चाहूल जरी लागली तरी मन आनंदाने उचंबळून येतं. त्या दिवशीची सगळी कामे भराभर उरकली जातात, निरुत्साह कुठल्या कुठे पळून जातो. बरेच दिवस आवरलेलं घर आवरलं जातं. पुस्तकांचं कपाट सोडून इतस्ततः विखुरलेली पुस्तकं परत आपापल्या जागी निमुट जाऊन बसतात.जुने पडदे जाऊन नवीन येतात. स्वयंपाकघरात डायनिंगची रचना बदलली जाते. दिवाणखान्यात सोफा आणि सेटी आलटून पालटून इकडे ठेवू की तिकडे अस करत एकदाचे लागतात. डोअरमॅट नवीन येते.मग जेवणाचे बेत, फिरायला जायचे बेत, येणाऱ्या माणसाच्या आवडीच्या पदार्थांची यादी वगैरे वगैरे.

या सगळ्या निमित्ताने मन किती काय काय परत अनुभवत आणि कुठे कुठे फिरून येतं. त्या माणसाशी जोडलेल्या सगळ्या आठवणी भोवती फेर धरून असतात. नकळत मनात कायम जपलेल्या आवडी निवडी आठवत जातात तेव्हा आपल्यालाच अचंबा वाटतो. पुन्हा जाणवतं, आपण इतके जपतो त्या माणसाला. इतकी वर्षे झाली तरी

काही नाती जुनी होतंच नाहीत बघ. म्हणजे माणूस दूर असलं तरी ते आपल्या मनात आपल्याबरोबरच जगत असतं आणि आपण त्या माणसाबरोबर. रोज भेट व्हायची शक्यता नसते आणि भेटू तेव्हा सगळं आपोआप जुळून येईल हा विश्वास असतोच कुठेतरी

मग ती व्यक्ती येते....आणि एकदम....Deja Vu !! हे सगळं आपण आधीच अनुभवलंय, हे असंच तर होतं सगळं, आपण त्या वेळी इथेच असेच होतो. आनंद-आश्चर्य-गोंधळ मिश्रित मनाने आपण विचार करत राहतो . खरंच हे असंच घडून गेलंय आधी? कधी? केव्हा

नाही रे, ते घडलेलं नसतं याआधी पण पुढच्या प्रत्येक वेळी अगदी असंच घडणार असतं. मन गुंतलेलं असलं एखाद्या नात्यात की असंच होतं, ओंजळीतल्या दानाची, हातात सांडलेल्या क्षणांची उजळणी करत राहत आणि बजावत राहतं, हे असंच आहे आणि असंच राहील, अगदी जक्ख म्हातारे झालो तरीसुद्धा.

मग झोपेत असताना स्वप्न पडतं आणि गालावर हसू उमटतं आणि खात्री पटते, की आपण जामच वेडे आहोत
हो ना रे

(बुचाच्या झाडाला हा वेडेपणा सांगायला अधीर) मी

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: