Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले # १०



रे 

सध्या माझा दिवस कुठे उगवतो आणि कधी संपतो मलाच कळत नाही. ऑफिस मध्ये बरीच कामं आहेत, त्यामुळे उशिरापर्यंत थांबावं लागतंय. जरा ओढाताण होते पण मला हे असंच आवडतं पहिल्यापासून. रिकामा वेळ कायम खायला उठतो मला. कामात असलं कि बाकी विचार आपोआप बाजूला पडतात आणि माणूस एका वेगळ्याच पसाऱ्यात स्वतःला कोंबतो. कोंबतो म्हणजे अक्षरशः कोंबतोचफक्त टार्गेट्स , ऑब्जेक्टिव्ह, डेड लाईन्स आणि स्पर्धा .... कधी सहकार्यांशी, कधी competitors शी तर कधी स्वतःशीच ! भावना , विचार, मतं सगळं बासनात गुंडाळून उंबरठ्याबाहेर ठेवून वावरावं लागतं. काही वर्षांनी याचीही सवय होऊन जाते आणि मग एखादा दिवस जरी तुलनेने सरळ साधा सोपा गेला कि बिथरतो आपण ... काहीच कसं नाही आज

मला फार कौतुक वाटत दिवसचे दिवस आखीव-रेखीवपणे जगण्याऱ्या माणसांचं. एखादा कोरा कागद घ्या , ते म्हणजे तुमचे २४ तास आहेत असं समजा आणि मग तुमचे विचार मांडा त्यावर कि कशी मांडणी असेल दिवसाची ... असं जर कोणी मला सांगितलं , तर मी ब्लँक असेन. म्हणजे घर- ऑफिस -घर हे जरी ठरलेलं असलं तरी त्यात सुद्धा कित्ती काय काय घडून जातं. त्या अर्थाने  रोजचा दिवस वेगळा असतो. आज कालसारखाच गेलाय किंवा उद्या आजसारखाच जाईल ; हे  खात्रीने सांगता येईल  ??  काही माणसं असा कोरा कागद दिला तर समास आखतील किंवा दोन्ही बाजूला समासाएवढी जागा सोडतील , वर श्री , ओम, तारीख, वार तत्सम काही लिहितील आणि मगच लिहायला सुरूवात करतील. आयुष्य सुद्धा असंच असावं यांचं ---- कुठलाही निर्णय  घेताना,'जर-तर' चे समास, आधी देवाला साकडं, मग निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी आणि शेवटी अपेक्षित शेवट.... इतकं परीटघडीचं जगायला कसं जमत असावं रे ??? 

मला कोरा कागद दिला तर मी कधी कविता लिहीन, कधी चित्र काढेन, कधी मनाचे श्लोक लिहीन किंवा एखाद्या आवडत्या गाण्याचं नोटेशन .... नेम नाही. शिवाय कागदाच्या आजूबाजूला पण नक्षी काढून ठेवेन मी. म्हणजे मुळात मला एका कागदावर अख्ख्या आयुष्याचा आलेख मांडणं हाच वेडेपणा वाटतो. आयुष्याला चौकट असावी पण त्याच कुंपण होऊ नये रे. कॅलीडियोस्कोप मधून त्याच काचांचे तुकडे वेगवेगळे मनमोहक आकार, रंग धारण करतात नं तसं असावं आयुष्य सुद्धा. त्याच त्याच चाकोरीतून चालताना, आपल्यात लपलेल्या नव्या वाटा शोधाव्या , त्यावरून प्रवास करावा, धक्के खावेतस्वतःलाच नव्याने ओळखावं आणि परत आजूबाजूच्या जगात मिसळून जावं. आपली कुंपणं आपणच मोडावीत, चौकटी मोठ्या कराव्यात आणि वेगळं काहीतरी अजमावून पाहावं  !!
कालपासून एक गाणं वाजतय कानात .... स्वदेस मधलं .... यूं ही चला चल राही , कीतनी हसीन ये दुनिया !! खरय नं ?? 

असो .... 

आपल्या बुचाच्या झाडावर साळुंक्यांचं घरटं बांधून झालाय बरं , आता पिल्लं येतील बघ थोड्याच दिवसात. मी झाडाखाली  पाण्याने भरलेलं तसराळ ठेवून येते रोज. त्यात पंख फडफडवत , पाणी पिणारे साळुंका - साळुंकी छान वाटतात बघायला. तू ये रे लवकर , हे सगळं फार लोभस आहे.

- (तुझ्या आठवणींच्या  कॅलीडियोस्कोप मधून तुला पाहणारी) मी

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: