Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ४९


रे 

रेल्वेमध्ये खिडकी जवळची जागा पकडली की मला कोण आनंद व्हायचा. मग त्या खिडकीच्या गजांवर हनुवटी टेकवून रुळांकडे पाहत बसायचं. समांतर धावणारे रूळ कधी एकमेकांना छेद देत धावायचे, मग परत विलग व्हायचे , मग परत जवळ येऊन लांब जायचे, मग त्यातला एक रूळ तिसऱ्याच रुळाबरोबर धावायला लागायचा अशी खूप गम्मत पाहायला मिळायची. गाडीचा वेग आणि रुळांमधलं अंतर कमी जास्त होणं हे सुद्धा तितकच भारी वाटायचं तेव्हा. लहान होते ना मी, त्यामुळे असं वाटायचं की रूळ आपले आपणच असे होताततेव्हा हे दृष्टीभ्रम, घर्षण आणि त्याच विज्ञान  वगैरे काही कळायचं नाही. बरं असतं नाही; अज्ञानात सुख असतं बघनाहीतर मोठं झाल्यावर बघ, हेच रूळ बघितले की डोळ्यातलं आश्चर्य जाऊन तिथे एक निर्विकारपणे येतोजणू काही आपण हे रोजच पाहतो अशा रीतीने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्याच विचारांच्या तंद्रीत हरवतो.

पण हे विसरतो, की आपले विचार सुद्धा त्या रुळांसारखेच की - मन आणि मेंदूच घर्षण झालं की हे विचार एकमेकांना छेदतात. मेंदू तर्कनिष्ठ पद्धतीने "नाही , नाही " सांगतो आणि मन बापुडवाणा होऊन ते समजून घेत तेव्हा आपली गाडी समांतर धावायला लागते - आपण करतो एक आणि मनात विचार वेगळाच चालू असतो. कधी  मेंदू आणि मन दोन्ही "नाही" पर्यंत पोचतात तेव्हा एखाद्या त्रासिक विचारापासून अलग होऊन सुटका मिळते. आणि दोघांनी "हो" म्हणलं तरी मन ऐकेल ते कसलं, त्याची गाडी तिसऱ्याच विचाराच्या रुळावर धावायला लागते. काहीही असो, गाडी विचारांच्या रुळावरून घसरता काम नये हे महत्वाचं. हो ना?  

ट्रेनवरून आठवलं, मी एकदा तुझ्या घरून ट्रेनने परत येत असताना एकदम काहीतरी आठवलं तुला आणि तू धावत जाऊन मोगऱ्याचा गजरा घेऊन आला होतास. तो गजरा माझ्या हातात देऊन म्हणाला होतास, "जाताना हे रूळ बघत जा, तो "****गाव" चा बोर्ड दिसला कि तिथे ओळीने बुचाची झाडं आहेत. आवडतील तुला" असं म्हणून त्या गजऱ्यातली एक कळी तेवढी स्वतःकडे ठेवून घेतलीस आणि बाय करून निघून सुद्धा गेलास

परतीच्या प्रवासात मी त्या बुचाच्या फुलांचा सुगंध मनात साठवत होते आणि हातातल्या मोगऱ्यालाही जपत होते. तुला कस कळलं, मला मोगरासुद्धा तितकाच आवडतो हे ?  हे असं तुलाच जमत फक्त , बोलता सगळं काही सांगून जायला

आता मी ट्रेनने प्रवास करत नाही. कामासाठी गेले तर विमानानेच जाते. त्यात ही मजा नाही रे

शेवटी बुचाची फुल ती बुचाची फुल आणि मोगरा तो मोगराच !! हो ना

बघ... ही अशी धावते माझ्या विचारांची गाडी तुझ्यावर विषय आला की. थांबते

(ती मोगऱ्याची कळी कुठल्या पुस्तकात जपून ठेवली असशील या विचारात) मी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: