Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले # २४


रे 

तुला वाटतं  कधी असं .. जाऊन शांतपणे एखाद्या तळ्याच्या काठी बसावं

तू लगेच विचारशीलतळ्याच्या  काठीच का ?? नदीकाठी का नको

नदी खूप बोलकी असते . तिच्याकाठची झाड - झुडपं, तिचं पाणी प्यायला येणारे पक्षी आणि इतर गुरं , तिच्या पोटातले मासे , एवढच काय , तिच्या किनाऱ्यांशी सुद्धा तीच खूप जवळकीचं नातं असतं. म्हणूनच तर आयुष्यात काहीही छान घडलं नं , कि नदीकाठी धावत जाऊन एखाद्या खडकावर बैठक मारून, भाकऱ्या टाकत टाकत नदीला सगळं सांगावंसं वाटतं. तिच्या पाण्यात  पाय बुडवून बसावं आणि इवलुश्या माशांनी पायाला गुदगुल्या करत असताना  आपण तिला तितक्याच लडिवाळपणे आपली गोड  गुपीतं सांगून टाकावीत असं वाटतं. नदी  आपली आई, मैत्रीण, बहीण , लहान मूल सगळळं काही होऊ शकते. दिसताना शांत दिसत असली तरी तिच्या पाण्यावर उठणारे तरंग आपल्या मनातल्या कंपनांशी बरोब्बर जुळवून घेतात. एखादं गाणं आपण गुणगुणत असलो तर ती पक्ष्यांना सांगते आपल्या सुरात सूर मिसळायला. नाचावंसं वाटलं तिच्या काठावर तर ती आकाशातल्या रंगांना बॅकड्रॉप तयार करून द्यायला सांगते. नदी म्हणून जिवाभावाची असतेच असते. नदीबरोबरचा प्रवास संपत नाही कधी , काठावरून मागे फिरून नदी डोळ्यात साठवल्याशिवाय परतीचं पाऊलही उचलवत नाही. आणि परत आलो तरी नदीच झालेली असते मनात विचारांची

पण तुला माहितीये रेखूप खूप बोलायचं असून सुद्धा काहीही बोलायचं नसतं ना तेव्हा  मात्र तळ्याकडे जावं. तळ बोलत नाही, नुसतं ऐकत राहतं.  तळ्याचा सभोवताल गूढच असतो जरा ... आजूबाजूची झाडी स्तब्ध, एखादाच पक्षी पाहुण्यासारखा उडून निघून जातो, आकाश सुद्धा निरभ्र . तळ्याला काठ नसतात ..... तळ सुरु होतं आणि संपतं  कुठेतरी ... पण नक्की कुठून कुठे ते त्याच्याभोवतीचं धुकं ते जाणवू देत नाही आपल्याला.  तळ्याला फक्त खोल खोल डोह असतो. जसा मनाला असतो आठवणींचा अगदी तसाच.  सांगायचं राहून गेलेलं, कसं सांगावं कळत नसलेलं , तोडकं -मोडकं , विषय जुळवत असं सगळं त्या तळ्याला सांगून झालं कि नंतर एकदम रिकामं रिकामं वाटतं बघ.  मी अशी कशी, तशी का नाही, अमुक अशी असते तर काय झालं असतं .... हे प्रश्नही तळ्यालाच विचारावेतते प्रश्न त्याच्या डोहात शिरतात, भोवऱ्यासारखे फिरतात गरगर ; पण तळ काही म्हणजे काही दिसू देत नाही वरती. एखाद्या सन्यस्त मुनीसारखं ते आपण बोलू ते किंवा विचारू ते ऐकून घेतं, डोहात खोल साठवतं आणि सांगत आपल्याला , जा आता , झालंय सांगून. मग आपण परतीची वाट धरावी मागे वळून बघता ...... तळ्याला सगळं माहितीये आणि कळतं आपण सांगितलेलं पण ते उपदेश करत नाही. आपणही ते तिथेच सोडून आलोय या जाणिवेनं पुढे जावंत्याचं 'साठवून घेणं' इतकंच हवं असतं आपल्याला.   

माणसं सुद्धा अशी नदीसारखी किंवा तळ्यासारखी असतात नाही रे .... प्रवाही , अवखळ, निरागस, अल्लड, दिलखुलास  .... नदीसारखी. आणि स्थितप्रज्ञ, गंभीरआधारवड झालेली ...तळ्यासारखी !  

आणि काही तुझ्यासारखी ..... माझ्या मनातल्या अगणित झऱ्याना  कधी नदी, कधी तळ होऊन सामावून घेणारी

 मला कधी जमेल असं व्हायला तुझ्यासाठी ?

(तळ्याकाठी बसून हे लिहिणारी ) मी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: