Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ३२


रे

पहाटे जाग आली ....आज रविवार त्यामुळे कामाला जायची गडबड नाही. तशीच पडून राहिले, मग लिहायला बसले.

समोर धुक्याची शाल पांघरलेली झाडं.... गुलमोहर, चाफा, पपई, नारळ......आणि बुचाच झाड. तू आठवत गेलास....

चष्मा नीट करत, तू वेडी आहेस का विचारणारा...
मला आवडते म्हणून बुचाच्या फुलांची वेणी आणणारा..
जाताना सुद्धा लिहीत राहा, काळजी घे हे परत परत सांगणारा...

मी मोठी झाले असं म्हणतोस तू...नाही रे, लहान होते ती बरी होते. आता मी हट्ट करत नाही, कसला करू? तुझ्यासाठी काय आणू विचारलंस की मी चॉकलेट्स आण पटकन सांगायचे पूर्वी. पण आता विचार करत राहते, काय सांगावं? मागचे सगळे क्षण परत जिवंत करून दे, हे मागू की सगळं होतं तसं परत जोडून दे, हे मागू. यातलं काही मिळणं शक्य नाही माहितीय पण मनाला त्याचीच आस लागून राहते हे ही खरंच

तुझं डोकं खाल्लय तेवढं पुरे, आणखी नको. म्हणून मी काहीच मागत नाही. तसंही मागितल्यावाचून तू आपण होऊन दिलेल्या असंख्य गोष्टी आहेत माझ्याकडे

मी मात्र तुला काहीच देऊ शकले नाही.....आणि तू ही जाताना काही मागितलं नाहीस

इतकं निर्मळ असू नये रे.

मी खूप खूप खूप वाईट आहे  !!

बुचाच्या झाडावरच धुकं दूर होतंय पण माझ्या डोळ्यासमोर धुकं साठलंय आता. थांबते....

(काहीच देता आलेली) मी

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: