Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले # ७



रे 

आज मोगऱ्याला पहिला बहर आलाय ... सकाळी सकाळी डवरलेलं मोगऱ्याच झाड बघून जीव हरखून गेला अगदी. त्याच्या शेजारची अबोली पण खुललीये. तुळशीचं तर विचारूच नकोस. ती घरातल्या कर्त्या बाईसारखी ठाम उभी असतेच नेहेमी सगळ्या बागेचा भर एकटीने सोशीत. आता मी वाट बघतीये, गुलाब आणि ब्रह्मकमळ कधी फुलतायत त्याची. मन प्रसन्न होतं बघ हि छोटीशीच बाग पाहून

मला आवडतं झाडांशी बोलायला. ती निमूटपणे ऐकून घेतात. लगेच रिऍक्ट करत नाहीत. त्यांना बोलणं कळतं आपलं पण त्यांची मूळ इतकी घट्ट रोवलेली असतात नं मातीत कि ती स्वतःचा सहज स्वभाव सोडत नाहीत. समोरच्याचं बोलणं अव्हेरता ऐकून घेणं किती अवघड असतं  नं ; पण झाडचं करू जाणे तेसोशिकपणा झाडांकडून घ्यावा माणसाने. ऊन , पाऊस, वारा, थंडी, धूळ, माती, धूर, कीड सगळं सगळं सोसतात पण तरीही डोलतात .... उलट आपल्यालाच कितीतरी देतात ..... फुलंफळ , पानं.... वर सगळं देऊनसुद्धा आपल्यासाठी उरतात

नाहीतर माणसं  - बोलण्यापेक्षा ऐकून घेणं जास्त महत्वाचं असतं , हे फार कमी  जणांना कळतं. बरेचदा आपलं म्हणणं समोरच्याने ऐकून घ्यावं इतकच वाटत असतं  रे. प्रॉब्लेम शेयर करतोय म्हणजे सोल्युशन पण लगेच हवंय असं नसतं नं , कधी कधी प्रतिक्रिया  देणं आणि ऐकून घेणं हि सगळ्यात चांगली प्रतिक्रिया असू शकते हे कळतंच नाही लोकांना !  

तात्पर्य, मला तुझं खूप काही ऐकायचं आणि तुला खूप काही ऐकवायचंय. मी बोलत असताना त्यातले pauses सुद्धा ऐकू येतात तुला. आणि का थांबलीस , काय बोलणार होतीस हे प्रश्न तू मला विचारता मलाही ऐकू येतात. एकूणच बोलूनही आपण बरच काही बोलत असतो एकमेकांशी. किती छान आहे बघ हे. दुर्मिळ असतं हे फार, म्हणून मला खूप खूप जपायचं तुला आणि आपल्यातल्या नात्याच्या विणीला. असशील ना असाच नेहेमी बरोबर

वाट पाहतेय .... बुचाचं झाड मोहोराची बघतंय तशीच.... 

- (हे पत्र वाचून तुझं 'हम्म्मम' ऐकू येणारी ) मी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: