Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ५५


रे

काल संध्याकाळी टेकडीवर फिरायला जाऊन आले. खूप दिवसांनी मनसोक्त सूर्यास्त पाहिला. पक्ष्यांचे थवे आकाशातून उडत जाताना पाहिले. सूर्याचं सोनेरी बिंब लालचुटक होत बिल्डिंगच्या मागे लुप्त होताना पाहिलं. रस्त्यावरची गर्दी लिलीपुटच्या देशात गेल्यासारखी एवढुशी दिसत असलेली बघितली. आकाशाचे बदलते रंग आणि टेकडीवरच्या बदलत्या सावल्या दोन्ही डोळ्यात साठवले. खाली उतरताना आपल्या नेहेमीच्या चाफ्याच्या झाडाखाली क्षणभर रेंगाळलेच. चाफ्याची - फुलं ओंजळीत घेऊन वास भरून घेतला आणि उतरताना पायाखालचे दगड मग जाणवलेच नाही

खाली आले तोच आपले बुचाची फुले लगडून महाराज समोर. मग अस्मादिकांचा मोर्चा आपसूकच तिकडे वळला. तिथल्या बाकावर झक्कपैकी बैठक मारून बरोबर घेतलेल्या लिंबू सरबताने रसना तृप्ती अनुभवली.

आता घरी निघावं असं म्हणून उठणार, तोच वरून बुचाच फुल पडलं. तो कौल समजून मी आणखी थोडा वेळ थांबले.....

दूर जरा धुरळा उठल्यासारखा दिसला आणि त्यातुन कुणीतरी झपाझप चालत येताना दिसलं. जवळ आल्यावर मी फक्त टणकन उडी मारायची राहिले होते. आपले आवडते सर....अजून तितकेच फिट. मुलं अमेरिकेत, 2 वर्षांपूर्वी बाई गेल्या, सर रिटायर झाले पण अजूनही तितकाच उत्साह! मी नमस्कार केला तर बॅचसकट ओळखलं मला....नंतर ओघाने तुझा विषय निघालाच. खूप गप्पा झाल्या.निघताना मला काय म्हणाले माहितीय

"त्याला माझा निरोप सांग, म्हणावं, नुसती बुचाची फुलं पाठवून काही होत नसतं" , मग हसले आणि निघून गेले. , त्यांना कसं माहीत हे ???

मी या तंद्रीतच घरी आले

तू इथे नाहीस म्हणून एकटं वाटतं. पण काल जाणवलं, एकट असून एकटेपणा जाणवण म्हणतात ते यालाच
मी मनाने अजूनही त्या झाडाखालीच आहे...का माहितीय?

(पुन्हा तुझ्यासाठी बुचाच्या फुलांचा कौल मागणारी) मी

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: