Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले # ११


मनू 

तुझी इतकी पत्र मिळाली...छान वाटलं फार वाचताना. पारायणं केली काही पत्रांची. मी चांगला वाचक आहे गं ; पण लिहिणं माझा प्रांत नाही. पण म्हणलं करूयात प्रयत्न. म्हणून पत्र लिहायला बसलो

तुझं बुचाच्या झाडाचं आणि त्याच्या फुलांचं वेड माहितीये मला लहानपणीपासून. एकदा का बुचाची फुल वेचायला लागलीस कि तू कुणाची नसतेस , मग आमची काय कथा ??  दोन वेण्या घालून, फ्रॉकचा ओचा करून ती फुलं वेचत असताना फार लोभस दिसायचीस तू मनू. मला तू अजूनही तशीच लक्षात आहेस. काही माणसं मोठी होऊच नयेस वाटतं , नेहेमी तेवढीच राहावीत असं वाटत ; त्या यादीत तुझं नाव टाकलं होतं मी. का मोठी झालीस मनू ?? तुझा निरागसपणा आताशा हळवेपणामध्ये बदललाय. आयुष्य इतकं सिरिअसली घेऊ नये गं वेडाबाई. जितकं मुठीत पकडायला जाशील ; तितकं हातून निसटेल. आहेस तशी छान , हसत राहा

बाकी तुझे आंबा, गुलमोहर, मोगरा आणि बुचाचं झाड यांना तुझ्यासोबत बघायचंय पुन्हा . मागच्या वेळी आलो तेव्हा बुचाचं झाड सोडून बाकी सगळी बाग दाखवलीस. पण मी वेचली बुचाची फुल निघताना आणि प्रवासभर विचार करत बसलो तुझा. तू विचारलं होतस ना मला, काय केलं मी त्या फुलांचं....आता सांगतो

तू मागे एक वही दिली होतीस मला आठवतंय ... तुझ्या आवडत्या कविता; गाणी लिहिलेली तुझ्या हस्ताक्षरातली, त्यात ही फुलं पण ठेवून दिलीयेत मी. कोमेजतील फुल कालांतराने माहितिये मला, पण त्या पानांना गंध येत राहील नेहेमी त्या फुलांचा. त्या फुलांमध्ये तुझं अडकलेलं मन मला सोडवता येत का पाहुयात

बाकी गप्पा भेटू तेव्हा. इथे थांबतो... 

- रे 

ता. . - पत्राबरोबर बुचाची फुलं पाठवलीस तरी चालतील मला :) 



पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: