Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ४५


रे 

"तू रागावलायेस"

"नाही बुवा."

"मग शांत का आहेस एवढा ?"

"मी शांतच असतो नेहेमी"

"नाही. तू नेहेमी शांत असतोस हे बरोबर, पण आज थंड आहेस. सांगणारेस का काय झालंय??"

" . . . . . . .  . . . . . . "

"अरे असं काय करतोस , तू सांगितल्याशिवाय मला कळणारे का ? बोल ना."

"नको. मी एक बोलणार, तू दुसराच अर्थ काढणार. मग मी आणखी चिडणार, मग तू वैतागणार. आणि तू वैतागलीस कि पुढचे आठ दिवस अबोला तरी नाहीतर मिनिटा मिनिटाला बॉम्बस्फोट तरी . त्यापेक्षा आपण दोघेही थोडे दिवस शांतच राहुयात, कसं"

"हो बरोबर, म्हणजे मी बोलते, मी वैतागते, मी अबोला धरते ..... नेहेमी माझीच चूक असते , हो ना ? आणि तू घुम्यासारखा बसलास , ते चालत. बोलणाऱ्याचे तोंड दिसतं ; पण हे असं धुसफूस करून काय साध्य होत देव जाणे ??"

"बघ , मी तुला म्हणालो ना, तू दुसराच अर्थ काढतेस ते. हे असं होतं ; म्हणून मी शांत बसलोय."

"हो, हो, बैस , शांतच बैस. जाते मी...... तू नॉर्मल  झालास कि बोलू परत , मग तर झालं ?"

"मी रागावलो नाहीये गं तुझ्यावर. फक्त थोडा वेळ हवाय, to bounce back to normal. काय असतं ना, मनाचा असा "dormant period" लागतो अधून मधून. "सुषुप्ती"अवस्था. कुठले  आकार-विकार, भाव-भावना नसलेली अवस्था. अशी गाढ , शांत झोप मिळाली ना मनाला ,की मन परत ताज तवान होतं.  आणि हो, जाते नाही ग, येते म्हणावं.  "

"ठीके. येते ! "

------------- 

मी तेव्हापासून वाट पाहतेय रे, तू कधी बोलशील. एकवेळ ना फाडफाड रागावलास तर परवडेल ; पण हे असं तुझं थंड राहणं जीवाचं पाणी पाणी करतं माझ्या. कधी संपणार तुझी "सुषुप्ती" कि काय ती अवस्था ??? सांग ना .... 

अजून किती दिवस बुचाच्या झाडाला तू समजून गप्पा मारत बसू मी ?? ते पण बिचारं  मुकच आहे सध्या. गदागदा हलवलं तरी फुलं आहेत कुठे खाली पडायला ?

आभाळ भरून आलंय .... पाऊस येणारे. आता तरी ये  आणि बोल !

( तू बोलशील लवकरच हे रोज स्वतःच स्वतःला समजावणारी ) मी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: