Search This Blog

Monday, November 12, 2018

सुचतं कसं ???

खूप जण विचारतात ....तुला एवढ्या धबडग्यात सुचतं कसं न केव्हा ??

आता मी एक सामान्य बाई...घर, मुलं, ऑफिस सांभाळताना तारेवरची कसरत वगैरे करणारी. पण कुठेतरी लिहायची खुमखुमी बाळगणारी. म्हणजे लोक फाडफाड इंग्रजी बोलावं; तशी फाडफाड लेख किंवा कविता facebook किंवा तत्सम ठिकाणी post करत राहतात. मला नाही जमत तेवढं पण जे जसं ज्या वेळी सुचेल आणि  हे 'बरं' झालयं असं वाटलं की मी ते चार लोकांपर्यंत पोचवते.... चार म्हणजे प्रायोरिटी प्रमाणे चार !!
एक माझा नवरा ज्याचं 'ह्म्म्म' कुठल्या tone मध्ये आहे त्यावरून बरं , ठीक, मस्त, सांगता येत नाही यातून सुयोग्य पर्याय आणि पर्यायाने अभिप्राय कळतो.

दोन, माझी मोठी मुलगी, जी आहे 10 वर्षांची पण मानसिक वय 21 असावं तसा चेहेरा करते, मोठ्ठा pause न आधीच मोट्ठे असलेलं डोळे अजून मोट्ठे करते न मग माझ्या गळ्यात हात टाकून म्हणते , आई तू खूप लिहायला पाहिजेस मग ओळखायचं कि हे 'छान' category मध्येही मोडू शकतं.

तीन, माझे व्हाट्सअँप, फेसबुक वगैरे वरचे मित्र मैत्रिणी आणि ऑफिस मधले सहकारी जे 'खूप भारी' पासून ते वर सांगितलेली प्रतिक्रिया देतात 'कसं काय सुचत बुवा' किंवा 'तू लिहीतेस हे माहिती नव्हत ' (!!!!!) म्हणजे 'खूप छान' आहे पासून ' हे काय झेपत नाही बुवा' ते 'ही बाई अजबच आहे' पर्यंत बरंच काही असू शकतं.

चार, यात दोन व्यक्ती आहेत, पहिली, माझ्या tech savvy सासूबाई ....त्या वाचून अभिप्राय तर देतातच पण हे पण मोकळेपणानं सांगतात कि मला कविता वगैरे फारसं कळत नाही ग, गोष्टी लिहीतेस त्या आवडतात, आता पुढची गोष्ट केव्हा लिहिणारेस (म्हणजे माझी modern सासू facebook वर आहे यातच मोठ्ठा आनंद आणि सासू असून सुनेचं  कौतुक करतायत हे म्हणजे 'घी में शक्कर'च झालं !!😊😊) दुसरं, माझी आई जी स्वतः छान वाचक आहे आणि ती पण लिहू शकते पण लिहित नाही अशी आहे...तिची प्रतिक्रिया हा कळस असतो ...म्हणजे 'बरं सुचतंय तुला, पण कामाकडे न घराकडेे दुर्लक्ष नको हं '(म्हणजे मी  multitasking मध्ये कमी पडतेय आणि लिहिताय म्हणजे आभाळाला हात नाही टेकलेत, जमिनीवर या असा अर्थ मी घेते 😶😉).

असो....तर मूळ मुद्दा राहिला बाजूला...की सुचतं कसं ?? तर त्याचं असं आहे....काही वेळा सुचू म्हणता शब्द सुचत नाहीत. आणि काही वेळा कुठेही अचानक सुचतं....कुठेही म्हणजे अगदी कुठेही. ऑफिस मीटिंग असताना, कार चालवताना, मुलीचा अभ्यास घेताना, स्वयंपाक करताना (विशेष करून पोळ्या लाटताना), साड्या dry clean ला टाकताना, एका हाताला मोठी न दुसऱ्या हाताला छोटीला धरून त्यांच्या अखंड प्रश्नावलीला उत्तरे देत रस्ता cross करताना, वॉर्डरोब आवरताना, अगदी स्वयंपाक घरातली झुरळ मारताना सुद्धा !!पण नेमकं त्या वेळी type करायला हाताशी काहीही नसतं. आणि नंतर आठवून लिहू म्हणलं तरी तो क्षण हातात पकडता येत नाही !!

निवांतपण आहे, आता लिहूयात म्हणूनघरातला आवडीचा कोपरा पकडून फतकल मारून बसलोय आणि मग सुचतंय ते भराभर उतरवून काढलंय न ते मनासारखं उतरलय असे दुग्ध शर्करा योग कमीच येतात. पण जेव्हा येतात तेव्हा मनाला परिस स्पर्श करून जातात न आपल्या मेंदूत काहीतरी अशी संरचना आहे ज्याद्वारे आपल्यात जरा बरं लिहिण्याची क्षमता आहे, याची प्रचीती येते.

सुचणंं हे फार काही अवघड नाहीय, मात्र ते योग्य वेळी नेमक्या शब्दात पकडणं कठिणे....रोजच्या जगण्यातले असंख्य क्षण काही ना काही 'सुचवूनच' जात असतात. आनंद, राग, लोभ, स्पर्धा,  प्रेम, दुःख, आश्र्चर्य, मत्सर, अपेक्षाभंग सगळ्या भावना जगतो आपण सतत....आणि काही क्षण तर असेही असतात जिथे काहीच जाणवत नाही....blank असतो आपण. मनाचा तळ गाठू म्हणलं तर आधी किनारा तर दिसावा लागतो. हे सगळे क्षण त्यासाठी मदत करतात, पण पकडीत येतीलच असं अजिबातच नाही. आपण जगत असतो....आला दिवस साजरा करतो....पण एखादी स्थिती अशी येते कि त्याच क्षणांकडे त्रयस्थ पणे पाहिलं की जाणिवा बदलतात. आणि याच जाणिवा त्या क्षणांना, 'खूप काही सुचलेलं' शब्दात व्यक्त करायला भाग पाडतात. सुचणं ही क्रिया क्षणार्धात होते पण जोवर तिला आपण पुरेसा वेळ देऊन, स्मरणातून बाहेर काढत नाही, शब्दांच्या कसोटीवर तासत नाही तोवर त्याचं 'लिखाण' झालंय असं म्हणता येत नाही. लिखाणासाठी सुचण्याची ऊर्जा लागतेच आणि सुचण्यासाठी रोजचं जगणं समरसून जगायची.

असो....सुचतंय म्हणून फार लिहित सुटलेय का मी ???😛😛

आत्ता हे लिहिताना रात्रीचे 11.30 झालेत...दोन्ही पिल्ले एक या कुशीला न एक त्या अशी निरागसपणे झोपी गेलीयेत...मी दुपारच्या झोपेमुळे टक्क जागी आहे, सकाळी लवकर उठायचं आहे न अमुक अमुक कामे आहेत, ऑफिस ला गेलो कि तमुक आधी करूयात असं सगळं मनाला बजावत असतानाच रात्रीच्या निरव शांततेत, दोन पिल्लांमध्ये फक्त माझी मीच असताना  हे 'सुचण्यावरून' सुचतंय !!😊😊

आता बोला !!!

- नेहा लिमये 

No comments: