Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले # २५


रे 

परवा एका इंटिरियर डिझायनर ला भेटायला गेले होते कामासाठी. खूप बोलत होता तो भरभरून त्याच्या कामाविषयी.  सतत काहीतरी क्रीएटीव्ह करावं लागतं  म्हणाला आमच्या क्षेत्रात. मी त्याला असंच विचारलं , नक्की काय प्रकारचं मटेरियल वापरता हो तुम्ही ? म्हणजे वास्तूचा प्रत्येक कोपरा कोपरा सुंदर करण्याचा ध्यास बाळगणारे तुम्ही व्यावसायिककसं काय इतकं नवनवीन सुचतं तुम्हाला.  इतकं कुणी आत्मीयतेनं विचारताय म्हणल्यावर त्याचीही कळी खुललीमग बरंच  काय काय सांगत राहिला आणि एक वाक्य तो म्हणून गेला जे अजून घुमतंय माझ्या कानात. " Material is immaterial for me !" म्हणजे प्लास्टिक, स्टील, सिरॅमिक पासून... टायर , बाटल्या , लाकडाच्या फळ्या , पत्रे, दगड-धोंडे कशानेही मी घराचा एकूण नजारा बदलू शकतोकाय प्रकारचं मटेरियल आहे, ब्रँडेड आहे का नाही.... आकार, दर्जा, रंग , पोत कसाही असू दे ... त्यातून कला घडते ; घडू शकते...  सौन्दर्य दृष्टी आणि कल्पकता वापरून, यावर माझा ठाम विश्वास आहे, म्हणाला


Material is immaterial for me .... याला जोडून मला सुचलं  - "Thought should be thought thoughtlessly!"  आपण हे आपल्या विचारांच्या बाबतीत केलं पाहिजे.  आपण विचार जगण्यापेक्षा ते निवडत बसतो बऱ्याचदाआपण त्याना एकदम compartmentalize करतो ...चांगला , वाईट, योग्य, अयोग्य , असला , तसलाबरा , उत्कृष्ट, पांचट, फुकट . . ...  काही गरज नसते त्याची. विचार का आहे,  कसा आहे, कोणाविषयी आहे, असा असावा का तसा  असावा, असावा का नाही ...  याचाच विचार जास्त करतो आपण. विचार करून डोकं फुटायची पाळी येते पण विचारांचा विचार काही संपत नाही !  एकदा तरी आपणच त्या विचाराकडे बघण्याची आपली दृष्टी तपासून बघावीझोकून द्यावं त्यात स्वतःला (फार विचार करता :) ). एका नितळ त्रयस्थ दृष्टीने बघावं त्याकडे ...... त्यानंतर साठलेलं, साचलेलं कुठलाही अभिनिवेश बाळगता व्यक्त करावं स्वतःशीचविचारांच्या चिखलातून एखाद्या संधीच कमळ फुलेल , ना फुलेल पण शून्यावस्था लवकर संपेल. मनाला वळण लावणं तसं कठीणच , पण निदान आपल्याच विचारांचा आपल्याला होणार त्रास कमी होईल. काय वाटत तुलाबघ, विचार करून :)  

तू हे पत्र वाचताना तुझ्या कपाळावरची सूक्ष्म आठी मला दिसतेय. आणि मागे तू म्हणाला होतास ते ही आठवतंय , "मनू, फार विचार करून मोठी होऊ नकोस, लहानच राहा". पण मला व्हायचंय मोठं तुझ्याइतकं, बुचाची फुलं हातात येतील इतकं, कळलं का ???

(तुझ्या विचारांच्या विचारात असलेली) मी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: