Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले # १७



रे 

एखाद्या गोष्टीला हो म्हणणं आणि नाही म्हणणं यात एका विचाराचं अंतर असतं.

एक क्षणच माणूस विचार करतो ... हे जमेल ?जमत असेल तरी मी का करू? मला काय मिळणार यातून? मिळालं तरी विकतचं दुखणं घेऊ की नको अंगावर ? एक विचार आणि परिणती नकारात  होते.

याउलट..

मी करायलाच हवं , नाही म्हणलं तर दुखावेल समोरचा, माझं कर्तव्य म्हणून तरी पार पाडायलाच हवं, करून तर पाहू, पुढचं पुढे बघता येईल ..... पुन्हा विचार एकच ... त्याला फुटणारे फाटे अनेक असले तरी....पण होकार येतो जमेला.  

तसं बघायला गेलं तर दोन्हीमधलं सोप्पं काहीच नाही. एखादा माणूस मान मोडून, मनापासून जबाबदाऱ्या अंगावर घेऊन फत्ते पाडत असेल तर आणखी एका जबाबदारीला "नाही" म्हणता येणं कठीण असतं त्याला. "हो" म्हणणं हे त्याच्या अस्तित्वाइतकच महत्वाचं होऊन बसतं त्याच्यासाठी. नाही म्हणलं तर येणारा वाईटपणा शक्यतो कुणालाच नको असतो. पण  मानेवर जू  ठेवून हो म्हणणं फार त्रासदायक असतं अशावेळी.

एखादी गोष्ट कर्तव्यभावनेतून करणं आणि आपल्याला हवीये म्हणून करणं यातला फरक मग त्या जबाबदारी निभावण्यात पण दिसून येतोच. मग मात्र वाटत, असा  जुलमाचा रामराम ठोकण्यापेक्षा याने सरळ "नाही" का नाही म्हटलं ?? दुखावता, आपला मुद्दा यथोचित दुसऱ्याच्या गळी उतरवून "नाही" म्हणणं ही  कला फार कमीजणांना साध्य असते. त्यातही "नाही" म्हणायचं "टाईमिंग" फार कमी लोकांना कळतं ; ते चुकलं तर  ते "कचखाऊपणाचे" धनी होतात आणि त्याच त्या ठिकाणी वर्षानुवर्षे फिरत राहतात. याउलटएखाद्याला आपल्या क्षमतेपेक्षा जास्त जबाबदारी दिली तर त्याला "हो" म्हणणं सुद्धा तितकंच कठीण असतं.  

नाही म्हणायला एक क्षण लागतो, पण नवीन आव्हान स्वीकारायचा समंजसपणा जे दाखवतात, ते यशाकडे जाणारी आणखी एक पायरी चढतात हे व्यवस्थापनाचं शास्त्र सुद्धा सांगत. थोडा अधिक त्रास, थोडी अधिक ओढाताण, थोडंसं चाचपडत इप्सित सध्या करणं शेवटी तुमचं व्यक्तिमत्व झळाळून टाकतं. साधं, सहज, सोप्प प्रत्येकच वेळी समोर यावं आणि आपलं कौतुक त्यावरच बेतलेलं असावं हा कुठला आशावाद ?? तर हे असं फक्त स्वतःच्या सोयीसाठी "नाही" म्हणताना, माणूस त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा धुळीला मिळवतो . त्याला आतून वाईट वाटत असेल किंवा नसेल सुद्धा, पण त्या क्षणी त्याच्या "नाही" म्हणण्याने त्या अपेक्षांचं ओझं त्याने नकळत दुसऱ्या कोणाच्यातरी मानगुटीवर देऊन टाकलेलं असतं. "हो" म्हणणं त्या अर्थाने मला तुलनेने अंमळ जास्त अवघड वाटतं

असो. हे सगळं लिहिताना मला आज आठवत गेलं, तू कधीच कशासाठी "नाही" म्हणाला नाहीस मला. आवडलं नसेल तर "हम्म .." शिवाय कधी काही ऐकलंच नाही मी तुझ्याकडून. पण "हो , हे करूयात .." असंही कधी म्हणाला नाहीस. काय समजावं माणसाने. विचार स्वातंत्र्य का काय ते ... ते हेच असेल तुझ्या लेखी. पण हो किंवा नाही म्हणणं खूप महत्वाचं असत रे नात्यातली पारदर्शकता जपायला

बाकी तू म्हणशील , काय आज हा "हो-नाही" चा घाट घातलास मनू अचानक

त्याच कारण असं , तुझ्या खिडकीतून दिसणाऱ्या बुचाच्या झाडाला माझ्या घरासमोरचं बुचाचं झाड बोलावत नेहमी. पण तुझं बुचाच झाड 'हो' म्हणायला फार वेळ घेतं बुवा. पोचतं का रे तुझ्यापर्यंत त्याचं म्हणणं ?? असेल तर, तुझ्या बुचाच्या झाडाची फुलं घेऊन ये यावेळी येताना. इथे कोणालातरी हवीयेत ती

- (हो -नाही च्या उंबरठ्यावर उभी ) मी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: