Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ४८

रे


कल्पना कर की तू गच्चीत झोपला आहेस आणि वर अगणित चांदण्यांनी भरलेलं आकाश आहे. त्या चांदण्यांमध्ये ढगाआडून चंद्रही डोकावतोयनिरभ्र आकाश , उंच उंच झाडं, त्यांच्या लांबवर पसरलेल्या सावल्या, त्यातून सळसळ वाहणारा वारा आणि रात्रीची नीरव शांततात्या शांततेला भंग करू नये असं एकीकडे वाटत असताना राहवून हरिहरनचा मखमली आवाज हवासा वाटतो कानात ... "हाजीर"मधला ....  

''मरिज- - इष्क का क्या है, जिया जिया जिया 
है एक सांस का झगडा , लिया लिया लिया

आणि मग जी तल्लीनता अनुभवायला मिळते, डोळे कधी पाझरू लागतात कळत नाही. चांदण्यांना मनातलं सार काही सांगून होत. सावल्यासुद्धा अशा वेळी फितूर होत नसतात. गच्चीच्या  कठडयावरून रेंगाळत रेंगाळत त्या आपल्या अंथरुणापर्यंत येऊन अंगावर कधी पांघरूण घालतात कळत सुद्धा नाही. सोबत होते मग त्यांची. झोप तर केव्हाच उडालेली असते. चांदणे आणि रस्त्यावरच्या दिव्याचा पिवळा प्रकाश अशा सोनसळी छटेत मला बुचाचे झाड आणखीन सुंदर भासू लागते. त्याच्या उंच उंच गेलेल्या फांद्या आणि झुकलेले फुलांचे झुबे मोहक दिसतात. आकाशाच्या काळ्याभोर साडीवरची ही सोनेरी कलाकुसर मी डोळ्यात साठवू पाहतेआकाश मोगरा !! किती सार्थ नाव आहे ना बुचाच्या झाडाचं  !!! 

अशा सगळ्या भारलेल्या वातावरणात कॉफीची आठवण झाली नाही तरच नवल ! मी थर्मोस मध्ये कॉफी भरून आणलेलीच असते वरती. मग कॉफी , मी आणि आकाशमोगरा - आमचा फड रंगतो गच्चीच्या कठड्यावर. यात तू अर्थात असतोसच... तू आणि मी कॉफी घेताना मारलेल्या गप्पा मी आठवत जातेमला गरम गरम वाफाळलेली कॉफीच लागायची  तर तू पूर्ण थंड करून मग कॉफी पिणार. मला कॉफी पिण्यापेक्षा तिचा वास जास्त हवासा असायचा. मी कॉफी हुंगत बसायचे आणि तू अर्थातच माझी चेष्टा करायचास. त्या गप्पांमध्ये काय नसायचं ... जुनी गाणी, जुने चित्रपट, नाटकं, गाण्याचे कार्यक्रमपुस्तकं ... ..... आपल्याकडे विषयाचा तोटा नसायचा, नाही ? आता परत एकदा हे सगळं करूयात रे , खूप वर्ष झाली, अशा गप्पा नंतर कधी जमल्याच नाहीत कुणाबरोबर.

तर , कृपया लवकरात लवकर येण्याचे अगत्य करावे, ही विनंती ! (खूप दिवसांनी असं लिहिताना गम्मत वाटली मला

कधी कधी एखादं पत्र विनाकारण सुद्धा लिहावंच की, नाही कासारखं काय आपलं , इकडे सगळं ठीक , तिकडे काय चालूये ?? 

तर तो हरिहरन , गच्ची, आकाश मोगरा आणि मी ...सगळे थांबलोय बर का तुझ्यासाठी कॉफी घ्यायला. कळलं असेलच

(तू विनाकारण कधी येशील मला भेटायला ?) इति मी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: