Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ५१


रे 

तू नदीकाठच्या रस्त्याने चालत गेला होतास असं लिहिलं होतंस मागच्या पत्रात. मी ही आज नदीकाठच्या घाटावर जाऊन बसले होते संध्याकाळी. आता घाटावर पायऱ्या बांधल्यात, मंदिराचं नूतनीकरण झालंय, मुलांना खेळायला, ज्येष्ठ नागरिकांना चालायला जॉगिंग ट्रॅक आणि छोटी बाग आहे. एकूण घाट सुंदर दिसतो. संध्याकाळी तिकडे खूप चहल -पहल बघायला मिळाली. मी मंदिरात जाऊन मग पायरीवर बसले जाऊन. समोर नदी शांतपणे वाहत होती आणि काठावर काही मुलं खेळत होती. चपटे दगड गोळा करून पाण्यावर तरंग उमटवत जायचा खेळ - भाकऱ्या टाकणं म्हणतात त्याला

, तुला फार छान जमायचं नं भाकऱ्या टाकायला. मला नाही जमलं विशेष कधी. मला तुझ्यासारखं जमायचं नाही म्हणून वैतागायचे मी. मग तू छान समजूत घालायचास आणि म्हणायचास "काही नाही , टेकनिक असतं  त्याच सुद्धा, ते जमलं कि येईल तुलाही. विशेष काही नाही." हे आठवलं आणि पुन्हा एकदा प्रयत्न करावासा वाटला मला. म्हणून मी त्यातल्या एका मुलाला बोलावलं आणि सांगितलं , मलाही खेळायचंय, घ्याल का मला तुमच्यात ? आधी बावचळली मुलं पण नंतर मात्र माझा हात धरून घेऊन गेली मला. त्यांनाही मजा वाटत असावी एवढी मोट्ठी बाई आपल्यासारखीच खेळू लागते म्हणल्यावर

चांगला तासभर आमचा डाव रंगला बरं. आधी आधी माझे दगड थेट पाण्यात जाऊन बुडत होते. मग त्यातल्या छोटूरामने मला पोझ घ्यायला लावली. म्हणतो कसा, " ताई, तुम्ही ना स्वतःला फार जखडून ठेवता बघा भाकरी टाकताना. जरा ढील देऊन मोकळं सोडा आणि हे असे हात मागे न्या, लांब करा आणि पाणी नाहीच इथे असं समजून टाका पाहू. ते काय असतंते असं आपण हवेवर टाकतो ते ...ते बघा गोल गोल .... मग फिरून आपल्याकडे येत बघा .... " 

"फ्रीझबी? " 

"हो हो, तेच ते. तर हा दगड म्हणजे फ्रीझबी समजा. आणि हो, तुम्ही ना भाकरी कुठे पडायला हवी ते आधीच ठरवता  आणि मग टाकता दगड. तसं नाही, नजर लांबवर, पलीकडे असू दे आणि बिनधास्त टाका, बघा दगड आपोआप जागा शोधतो की नाही भाकरीसाठी

आणि खरंच रे- वेळा प्रयत्न केल्यावर थोडंसं जमलं मला . म्हणजे अगदी - नाही पण - भाकऱ्या पडायला लागल्या माझ्या. काय आनंद झाला मला आणि कधी एकदा तुला लिहू हे असं झालं होत मला

रे, त्या छोटूरामने दोन महत्वाच्या गोष्टी शिकवल्या मला. स्वतःला जखडून ठेवून , बंदिस्त करून तुम्ही काही मिळवू शकत नाही. स्वतःला थोडं मोकळं करून, कसली पर्वा करता झोकून द्याल तेव्हा तुम्ही खरे  चालायला लागलं ध्येयाच्या दिशेने. याचच एक्सटेंशन म्हणजे नजर भविष्यावर ठेवा आणि एक एक करून छोटी छोटी उद्दिष्ट साध्य करत जा. मॅनेजमेंट प्रिंसिपल्सच शिकवली मला त्याने

भाकऱ्या टाकायचा खेळ मला आता त्यामुळे जास्त जवळचा वाटू लागलाय. तू आलास ना की जाऊ रे परत आणि मी तुला हरवेन या वेळी बघ.  

बाकी - हे मला असं काहीही तुला लिहिता येत आणि छोट्या गोष्टींचा आनंद देता-घेता येतो हे किती छान आहे नाही ? मी हेच सांगितलं आज बुचाच्या झाडाला तर ते हसलं, म्हणालं , जरा ते स्वतःला मोकळं करण्याचं घे मनावर. तेव्हा खर सांगते, तुझा भास झाला मला !!

( स्वतःला मोकळं करण्याच्या प्रयत्नात ) मी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: