Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले # २३

रे 

आज पहाटे जाग आली तेव्हा कुणीतरी पेटी वाजवत होत. यमनची  सुरावट होती .... सखी येरी आली पियाबीन, कलन परत मोहें घडी पल छिन दिन ...... त्याच चालीवर मी चहा टाकला , भाजी चिरायला घेतली, बाकी कामे आवरली आणि बाल्कनीत आले आणि पाहते तर काय... अंगणभर बुचाची फुलं. तो सुगंध उरात मनात भरून घेतला. क्षणभर तिथेच थबकले .... 

फुलांमध्ये आणि सुरांमध्ये अशी काय ताकद असते माहित नाही, इतकी ऊर्जा जाणवते त्या क्षणी आपल्याभोवती. जणू एखाद संरक्षक कवच असावं आपल्या भोवती, सगळ्या नकारात्मक विचारांपासून सुरक्षित ठेवणारं. एक एक श्वास मोजून घ्यायला लावणारं , एकेक क्षणाची जाणीव करून देणारं , एका क्षणात किती जगून घ्यावं असं वाटायला लावणारं कवच. त्याच तंद्रीत सगळा दिवस आपण कसलाही विचार करता एका लयीत काम करत राहतो आणि दिवस संपल्यावर जे आत्मिक , भरून पावलो असं समाधान मिळतं नं, ये काही औरच असतं

रे, मी गाणं शिकायचे तेव्हा तानपुरा सुरात लावायचा एक वेगळा रियाज असायचा आम्हाला. पहिल्यांदा मंद्र षड्ज , मग तार षड्ज , पंचम किंवा मध्यम, वगैरे क्रमाने एक एक तार जुळवत न्यायची. इतकी की, प्रत्येक सूर वेगळा आहे हे कळावं आणि त्याच वेळी एक सूर दुसऱ्या सूरापासून वेगळाही  काढता येऊ नये. तारा छेडल्यानंतर कानात फक्त षड्ज घुमला पाहिजे आणि आवाज लागलाच पाहिजे. तो षड्ज कानात जोवर घुमत नाही तोवर तंबोऱ्याच्या खुंट्या आवळण , सैल करणं , जव्हारीचा दोरा ऍड्जस्ट करणं, या क्रिया होत राहतात . पण या सगळ्या प्रक्रियेत तो षड्ज आपल्या मनात अनाहतपणे वाजत राहतो. एकदा का तानपुरा जुळला आणि मनासारखा षड्ज कानात साठवून घेतला कि आख्ख आयुष्य त्यातच एकवटलंय  वाटू लागतं. तानपुऱ्याच्या  गर्भात एक ऊर्जा स्रोत आहे आणि त्या तारांमधून तो आपल्या नसा- नसात ती ऊर्जा पोचवतो. प्रत्येक कंपन  श्वासात हळू हळू इतकं बेमालूमपणे  मिसळत जातं कि श्वासांना आपसूक एक लय सापडते. केवळ अदभुत एवढा एकच शब्द सुचतो त्यावेळी

आज यमन ऐकताना हे सगळं आठवलं मला. नुसता तानपुरा कानात वाजत राहावा आणि आपण जगत राहावं त्या षड्जाच्या साथीने असं मला कायम वाटत आलंय. तानपुऱ्याचा गर्भ म्हणजे आपलं मन, खुंट्या म्हणजे आपल्या जवळची माणसं , तारा म्हणजे आपल्या भावना/ विचार आणि जव्हार म्हणजे माणसांमधले अदृश्य धागे   - असा विचार करून बघ क्षणभर. हे सगळं जुळून आलं तर जगण्याचा तानपुरा सुरात लागणं हे किती सुंदर आहे नं ??  

ही  जीवन साधना कधी जमेल - जमेल रे, बुचाची फुलं कायम जवळ राहावीत हे मात्र नक्की !!   

आज तानपुरा उगाच बाहेर काढला, हात फिरवला तारांवरून आणि  खुंट्यांवरून आणि बुचाची फुलं जव्हारीत खोचून लावायला घेतला. बराच वेळ नुसतीच ऐकत राहिले....... यमन बोलावत राहिला पण गायला मन होईना ......... तू आठवत राहिलास फक्त प्रत्येक वेळी तानपुरा छेडताना  .......  इतकंच !

(तुला "यमन"मध्ये शोधताना हरवलेली) मी 


पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: