Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले # ४


रे 

तू आल्यावर  हे करू, ते करू , इकडे जाऊ , तिकडे जाऊ म्हणत इतकं प्लांनिंग केलं मी. प्रत्यक्षात तू आल्यावर मात्र गप्पाच संपेनात.   त्या निमित्ताने आयता चहा सुद्धा मिळाला मला कित्तीतरी वर्षांनी. चहाचा आणि गप्पांचा घनिष्ट संबंध आहे हे नव्याने पटलं मलाकित्ती जुन्या आठवणी गोळा केल्या आपण चहाच्या कपांवर .....शाळा, कॉलेज , मित्र-मैत्रिणी, सहकारी ते अगदी आत्तापर्यंत ... तुझी आवडती दीपिका पदुकोणटाटा -मिस्त्री प्रकरण , राजकारण .......... !!! तसं बोलायला आपल्याला कुठलाच विषय वर्ज्य नसतोच म्हणा

पूर्वी नं  मला असं वाटायचं , समोरचा ऐकणारा  भेटला म्हणून आपण बोलत सुटतो. पण नाही रे , ऐकणाऱ्याने  नुसतं ऐकून भागत नाही , त्याने साठवून घेतलय आपलं बोलणं मनात हे आपल्याला कळावं लागतं. आणि त्यानेच ते जाणवून द्यावं लागतं आपल्याला. हि vibrations जुळली नं तरच संवाद घडतो बघ. एरवी नुसतेच  एकपात्री प्रयोग , फक्त म्हणायला "dialogues" !!

म्हणून तुझ्याबरोबर बोलायला आवडतं  मला. सगळं सोप्पं करून टाकतोस तू माझ्यासाठी. अखंड ऐकतोस , ऐकवतोस , साठवतोस आणि मागून विचार करत राहतोस मी बोलले त्यावर. मग नंतर केव्हातरी मलाच आठवण करून देतोस, तू हे जे म्हणालीस ना, ते असं नाहीये गं , वेगळं आहे. त्यातून तुझी तल्लख स्मरणशक्ती मला धक्के देत असतेच .... "हो काय, मी असं म्हणाले होते होय ?? "  हे मलाच आठवावं  लागत बरेचदा आणि तू मात्र कालच मी हे बोलल्यासारखा मला संदर्भासहित स्पष्टीकरण देतोस. (हे मला कधी जमणार ?? असा विचार येतो मनात, पण बरंय मला नाही जमत ते. ते जमायला लागलं तर तुझं डोकं खायला मला नवीन कारण कशी मिळतील ??)

तर असा हा आपल्यातला संवाद स्वयंपाकघरात चालू झाला आणि तू निघायला फटकापाशी पोचेपर्यंत चालू राहिला. कुठलीही छान गोष्ट फार लवकर संपते , हे फार वाईट असतं  नाही ? तुझ्याबरोबर करायच्या बऱ्याच गोष्टी राहून गेल्या पण तरीही वाटत राहिलं , खूप काही केलं आपण आज

अजूनही पूर्वीसारखाच मिश्किल आहेस , असाच राहा

आणि हो  ... गल्लीच्या टोकावर पोचल्यावर परत मागे फिरलास आणि फाटकापाशी पडलेली बुचाची फुलं वेचून घेऊन गेलास .... माझ्या नजरेतून सुटलं नाहीये ते.  मीच धांदरट, घरभर फिरलो आपण पण बुचाचं झाडच दाखवायला विसरले तुला. बाकीकाय केलस त्या फुलांचं नंतर , ते सांग नक्की पुढच्या भेटीत

- (तुला  बुचाची फुलं वेचताना पाहून हरखलेली ) मी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: