Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले # १२


रे

तुझं पत्र मिळालं...आनंद, आश्चर्य आणि काय काय वाटलं म्हणून सांगू....तू मुळात बडबडा....पण आतून सतत 
कुठल्यातरी विचारात, चेहेऱ्यावर सतत 'चिंता करितो विश्वाची' असा भाव, ओठांच्या कडांवर कायम खट्याळ हसू, चष्म्याआडचे डोळे तुझ्या मनासारखेच अगम्य, गूढ ! अश्या या (वरवर) गंभीर दिसणाऱ्या माणसाने मला चक्क मला पत्र लिहावं !! हे किती छान आहे तुला कल्पनाच नाहीये

तू त्या बुचाच्या फुलांचा गंध मी दिलेल्या वहीत जपून ठेवलयेस....काय म्हणू तुला... फार कमी गोष्टी मनाला स्पर्श 
करून जातात आताशा..त्यातली ही एक...

स्पर्श किती छान असतात नं रे...सहेतुक, निर्हेतुक, इतकं ढोबळ वर्गीकरण नको बाबा. मला काय वाटतं माहितीये, स्पर्श नं समुद्राच्या लाटांसारखे असतात.

भरतीच्या वेळी कसं समुद्र लाटा पाठवत राहतो आपल्याकडे....कधी लहान, कधी मोठ्या, कधी कधी दोन लाटांमध्ये एखादी छोटीशी लहर.....   आपण फक्त त्या झेलायच्या असतात. त्यात भिजून चिंब व्हायचं. लाटांचा आवेग कमी जास्त होत राहतो, आणि आपलं अंग कधी भिजत, कधी नाही. खरं तर प्रत्येक वेळी भिजत असतं ते आपलं मन रे. आत आत झिरपत जाते एकेक लाट, प्रत्येक लाटेबरोबर आपण एकेक स्पर्श आत साठवत जातो.
बालपणीचा पायाखालच्या मऊ वाळुसारखाआजीचा स्पर्श... सोबतच्या थंड हळुवार वाऱ्यासारखा सतत बरोबर राहणारा आई चा स्पर्श, भरधाव वेगाने येऊन बेसावध असताना अंगावर कोसळणाऱ्या लाटांसारखा तारुण्यातल्या आवेगाचा स्पर्श, छोट्या छोट्या लाटांचा पायाला गुदगुल्या करणारा मित्र-मैत्रिणींचा स्पर्श, लाट ओसरल्यावर आणि वाळू सरकत असताना होणारा आश्वासक स्पर्श...जसा बाबांचा पाठीवर फिरणारा हात. हे सगळं विहंगम दृश्य निश्चलपणे बघणारा आणि सतत भरती ओहोटीच्या वेळा चोख बजावणाऱ्या सूर्याचा कधी दाहक - कधी शांत स्पर्श....गुरुसारखा....किती वेगवेगळे पण एकाच वेळी स्वतःला विसरायला लावणारे आणि आत्मभान देणारे स्पर्श!!

यातले काही स्पर्श शारीर असतील, नसतील पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे 'मनाने मनाला' केलेले असतात रे....म्हणून इतके प्रिय आणि जवळचे असतात

जादू असते या स्पर्शात...त्रासलेल्या मनाला उभारी देण्याचं, आशेचा किरण सतत तेवता ठेवण्याचं सामर्थ्य असतं या स्पर्शात.

After words, touch has the greatest healing power. असं नेहेमी वाटतं मला.

तर....मी सांगत होते, तू बुचाच्या फुलांचा गंध त्या वहीत जपल्याबद्दल. तुला असंच वाटलं होतं ना तेव्हा...की आपण कितीसे भेटू? भेटलो तरी किती आणि काय काय बोलू असं होऊन एकंदर 25 वाक्य तरी बोलू का ? आणि बरचंस बोलताच बोलून जाऊ.......आणि झालंही तसंच बघ. त्यातून तू ऐकणार जास्त आणि बोलणार कमी. पण जे बोलशील त्यात माझ्याबद्दलच जास्त काळजी असेल, हे नक्की

म्हणून मी काही शंख शिंपले पाठवतेय आज.....तुला दिसेल, जाणवेल त्यातला समुद्र....तुझ्या माझ्यातले हे स्पर्श असे अनवट सुद्धा असतात, नाही रे??

- (तुझ्या डोळ्यातल्या समुद्रात उमटणाऱ्या लाटांची साक्षी) मी



पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: