Search This Blog

Monday, November 12, 2018

संधिप्रकाश, एकटेपणा आणि space !

दिवसातली कुठली वेळ सगळ्यात जास्त आवडते असं विचारलं तर माझं उत्तर असेल "संधिप्रकाशाची" वेळ. दुपार कलताना, संध्याकाळ उमलताना हुरहूर लावणारी हीच ती वेळ. निसर्गाचे कितीतरी अविष्कार या वेळेला बघायला मिळतात. अगणित रंगांची उधळण करून सूर्य अस्ताला जात असतो. त्याच्या जाण्याला सोन्याची झळाळी लाभून, "सूर्यास्त" हा एक सोहळा बनून जातो. दुसरीकडे चंद्राची कोर नव्या नवरीसारखी हळूच डोकावायला लागते. गाणं संपत आल्यावर जसं संगीत मंद होत जातं, तशीच झाडं-झुडपं वाऱ्याबरोबर बारीकशी शीळ घालत डोलतात. पक्षी हळू-हळू घरट्याकडे परतायला लागतात. एकूणच वातावरणात काहीसं सैलपण आलेलं असतं. या अशा वातावरणात गच्चीत जाऊन किंवा खिडकीत बैठक घालावी आणि मस्त वाफाळती coffee घेत हा संधिप्रकाश डोळ्यात साठवून घ्यावा यासारखं सुख नाही !


संधिप्रकाश न्याहाळत बसले असताना मला नेहेमी वाटतं की ही वेळ म्हणजे निसर्गानं त्याच्यापुरती घेतलेली "space" तर नसेल? दिवसभराचा सूर्याचा दाह आणि रात्रीची चंद्राची शीतलता या दोन परस्पर-विरोधी घटनांमधली विसाव्याची वेळ. दिवसभराची धावपळ झाल्यानंतर शांत, निवांत होण्याची वेळ. रंगांमधून स्वतःशी संवाद साधण्याची वेळ. एका रूपातून दुसऱ्या रुपात जाताना स्वतःला पारखून बघायची वेळ. संध्याकाळ होत असताना, अंधारी रात्र चोरपावलांनी येत असताना सोन्याची झळाळी अंगभर पांघरून घेण्याची ही वेळ. ही space मिळाली कि त्या अंधाराला चांदण्यांनी उजळून टाकायची ताकद येते.

आपल्यालाही अशी "space" हवी असते नाही? आजूबाजूला खूप माणसे आहेत तरीही आपले आपणच आहोत, रस्त्यावरून चालताना खूप वाहनं आहेत पण आपण एकटेच प्रवास करतोय, लग्न कार्यात सगळ्यांची धांदल चालू आहे आणि आपण एका कोपऱ्यात ती बसून फक्त बघतोय असं खूप वेळा होतं. "एकटेपणा" हा खूप "सार्वजनिक" सुद्धा असतो. म्हणजे जर आपण नीट observe केलं ना तर गर्दीतला प्रत्येक माणूस खरं तर एकटाच असतो, त्याच्यापुरता तरी. इतरांसाठी तो कदाचित "स्वतःपुरतं" बघणारा असेल किंवा एकूणच "माणूस घाणा" असेल. किंवा असंही असेल की माणूस खूप बोलघेवडा आहे, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागतोय पण तरीही त्याच्या वागण्यात कुठेतरी थोडासा "aloofness " जाणवतोच. मध्ये कुठेतरी वाचण्यात आलं होता की गर्दीतल्या प्रत्येक चेहेऱ्यामागे त्याची स्वतःची एक "स्टोरी" दडलेली असते. ती जर तुम्हाला वाचता आली तर तुम्ही एकटे राहणार नाही आणि त्या माणसालाही एकटा राहू देणार नाही. पण हा एकटेपणा म्हणजे नक्की असतं काय असा प्रश्न पडतो मला नेहेमी !

प्रत्येक माणूस हा जन्माला आल्यानंतर विविध नात्यांनी बांधला गेलेला असतो. सुरुवातीला फक्त कुटुंब, मग मित्र-मैत्रिणी, शाळा, कॉलेज, ऑफिस वगैरे असं त्याच्या भोवताल
चं माणसांचं वर्तुळ वाढत जातं. त्याची "ओळख" सगळीकडे पसरायला लागते. मग परस्पर अपेक्षा तयार होतात. प्रत्येक निर्माण होणाऱ्या नवीन वर्तुळातून इच्छा, हक्क, स्वप्नं, तणाव निर्माण होतात. पण कुठेतरी त्याच्या "आतला" आवाज हा फक्त त्याच्या पुरताच राहतो. हा आतला आवाज त्याची सतत साथ करत असतो आणि त्याला उत्तर म्हणून काही वेळा "एकटा" असण्याची गरज भासते. यालाच आपण "space " असं गोंडस नाव देतो. 

पण मग एकटेपणा म्हणजेच space का? याचा उत्तर मला संधिप्रकाश देतो असा वाटतं. सूर्य, चंद्र, झाडं , पक्षी हे सगळे तसा पाहिलं तर एरवी एकटेच असतात. पण संधिप्रकाश त्यांना "एक
" राहण्याची किंवा आपापली "space " अनुभवण्याची संधी देतो. ती वेळ सोडली तर ते कोणाशी न कोणाशी बांधलेले असतात. संधीप्रकाशात ते फक्त "स्वतःचे" असतात. असा निवांतपणा, सगळ्यांशी जोडलेले असून सुद्धा आपण विभक्त आहोत, आपलं असं स्वतंत्र अस्तित्व आहे हे त्यांना फक्त संधीप्रकाशातच मिळतं. एकटे असणं आणि एकटे असावसं वाटणं यात हाच फरक आहे. पहिल्या प्रकारात माणूस परिस्थिती किंवा स्वभावानेच एकटा असतो व राहतो. पण एकटे असावसं वाटणं म्हणजेच "space" आणि हि त्याची त्या वेळची गरज असते. निसर्गाच्या प्रत्येक बारीक सारीक घडामोडीत किती विचार दडलेला आहे ! म्हणूनच तर आकाशाला "space " म्हणत नसतील ना? 


- नेहा लिमये 

No comments: