Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ३६


रे 

लहानपणी आपण एक खेळ खूप खेळायचो....  कवडश्यांचा ; आठवतंय ? 

म्हणजे आधी घरातली एक भिंत निवडायची, ज्यावर कमीत कमी कपाटं असतील. मग बाकी सामान म्हणजे फ्रेम्स, वॉल हँगिंग्स , शेल्फ्स बाजूला करायचे आणि भिंत मोकळी करायची. एका खुर्चीत तू पाय ताणून फतकल मारणार आणि समोरची भिंत आणि हातातलं घड्याळ आळीपाळीने बघणार. तुझ्यामागे बाल्कनी आणि तिथून अंगावर येणारं ऊन. मग तोंडाचा चंबू करून , घड्याळ आणि ऊन यांचा कोन साधून समोरच्या भिंतीवर तू कवडसे पाडणार . भिंतीवरून छतावर , मग जमिनीवर आणि परत भिंतीकडे ... तो कोन जसा साधला जाईल तसा कवडश्यांचा आकार, त्याचा brightness बदलायचा. सोनेरी, लखलखणारे, चमकदार कवडसे !  घड्याळाच डिझाईन जितकं वेगळं, कवडसे तितकेच वेगवेगळे. मग आपण घरातल्या सगळ्यांची घड्याळं  जमा करायचो - गोल, लंबगोल, चौकोनी,  बाजूने खडे किंवा वेलबुट्टी असलेलं... मग त्यातून पाडलेल्या कवडश्यांच्या भोवती जी आभा यायची ती बघायला  किती मस्त वाटायचं; जणू एखादी जादूच आहे !  

मग त्या खेळाची दुसरी पायरी - म्हणजे तू कवडसे पाडणार आणि मी ते पकडणार. तुला ते कोन साधणं बरोब्बर जमायचं आणि मी एक कवडसा हाताने झाकतेय तोवर तू दुसरीकडे कोन साधून मोकळा ! मी वेड्यासारखी भिरभिर भिरभिर धावतेय खोलीभर कवडसे पकडत. शेवटी मी दमून जमिनीवर झोकून देऊन फतकल मारायचे आणि फुगुन बसायचे. तू  थांबशील असं वाटायचं मला ; तरी तुझे प्रयोग सुरूच. मग समोरची भिंत सोडून माझ्या फुगलेल्या चेहेऱ्याला तू भिंत करायचास. कवडसे आधी माझ्या मोठ्या कपाळावर, मग गालांवर, नाकावर आणि मग हाताच्या घडीवर येऊन स्थिरावायचे. थोडक्यात, हे सगळं माझा रुसवा काढायचे प्रयत्न असायचे. मला एकीकडे राग राग यायचा तुझा आणि तरीही एकीकडे छानसं काहीतरी वाटायला लागायचं. पण तरी मी दाद नाही द्यायची तुला. मग तू हिरमुसून निघून जायचास. 

पण रे, त्या दिवशी कवडश्यांच्या खेळातली ती भिंत खूप आपली वाटून जायची. मग त्या भिंतीवरच्या फोटो फ्रेम्स , हँगिंग्स , कपाटं किंवा शेल्फ्स नकोच वाटायचे परत लावायला.  असं वाटायचं , तिथे फक्त तू पाडलेले कवडसे असावेत आणि मी ते पकडतानाचे माझ्या हाताचे ठसे ! 

आता जाणवतं रे, काही कवडसे फक्त भिंतीवर नाही, मनावर सुद्धा पडतात आणि ते पकडायच्या नादात आपण फक्त धावत राहतो आयुष्यभर !

आता ती भिंतही नाही समोर आणि तू ही नाहीस हाकेच्या अंतरावर !  

एक विचारू ??  

आपल्या नात्यात फक्त कवडश्यांनाच जागा होती का रे ? आधीच कोवळं ऊन किंवा नंतरचा उन्हाचा दाह नव्हताच का आपल्या वाट्याला ! 

पण मग.....  

मी बुचाच्या झाडाशी बोलताना आजही माझ्या चेहऱ्यावर जे कवडसे खेळतात ; ते कोण पाडतं मग ? 

(तुझी आठवण काढत कवडसे पाडणारी) मी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: