Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ४२


रे

मला ना कधीकधी काहीच बोलावंसं वाटत नाही. काही म्हणजे काहीच नाही. 

गप्प बसून राहावंसं वाटतं आपल्याच तंद्रीत ....आपल्याच विचारात....आणि मग त्याच तंद्रीत असताना ते विचार शरीराच्या , मेंदूच्या गाभ्यातून बाहेरच्या वातावरणात सोडून द्यावेसे वाटतात एकेक करून.

कधीकधी ना रोजच्या जगण्याचा सुद्धा गोंगाट वाटू लागतो. वरवर बघता, शांत, सुरकुत्या नसलेलं आयुष्य सुद्धा आत कुठेतरी टोचू लागतं.

जगणं उदबत्ती झाल्यासारखं वाटतं !! उदबत्तीचा धूर कसा, श्वास कोंडून टाकत नाही पण हळूहळू मुंगीच्या पावलांनी वातावरणात वावरत राहतो आणि एक अनवट अस्वस्थता मनात रेंगाळत ठेवतो. धड काही जळत नाहीये, आजूबाजूच्या हवेला सुगंधी पसरलेय आणि तरीही कुठेतरी काहीतरी निसटून जातंय ही जाणीव सतत देत राहतो तो धूर. मग हळूहळू त्या धुराची खाली शिल्लक राहिलेली राख दिसते. उदबत्तीची फक्त काडी राहिलेली लक्षात येते. ती राख सुद्धा मग आपण अंगारा समजून भाळी लावतो आणि स्वतःची भलावण करत राहतो.

त्या धुरासारख्याच आपल्या दबलेल्या इच्छा - आकांक्षा आपल्याभोवती एके दिवशी वलय धरू लागतात. त्यांना उभारी द्यायला कधी परिस्थिती नसते तर कधी संधी. त्यांची उरलेली राख तेवढी आपल्या मनात सांडते. मग सगळंच बोचू, टोचू आणि खुपू लागतं......पण एका क्षणी सगळंच थांबत. त्या सगळ्यांच्या पलीकडे आपण आहोत, हे जीवन आहे आणि ते जगायचं आहे इतकाच भाव शिल्लक राहतो.

तेव्हाच.....तेव्हाच, हे असं शांत बसावंसं वाटतं. काही बोलू नये, कुठे जाऊ नये, कुणी भेटू नये, काही विचारू नये, भूक- तहान काही लागू नये, कुणाला जवळ येऊ देऊ नये आणि कुणाच्या जवळ जाऊ नये. एक निर्वात पोकळी असावी आणि आपण त्यात विहरत राहावं. बस्स!!!

यालाच "ध्यान"-अवस्था म्हणजे meditative state म्हणत असतील नाही? 

सध्या तुझा कोकीळ बुचाच्या झाडावर असाच बसलेला असतो ध्यान लावून....तो का बरं साद घालत नसेल तिला? 

विचारायला हवं नाही?
(...........................) मी !

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: