Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ५४


रे 

दुपारचं कडकडीत ऊन पडतं सध्या. पंखा चालू असतो  पण त्याच वारं मात्र गरम. फरशी तापलेली, गादी गरम झालेली ... असंच एकदा उन्हाळ्यामुळे दुपारच्या झोपेची वाट लागल्यावर मी पुस्तक हातात घेतलं. आई म्हणायची तसं "हि मुलगी पुस्तक खाते, पुस्तक पिते.... म्हणजे माझी ब्रम्हानंदी टाळी लागते". आजूबाजूला ढोल जरी आणून बडवला तरी मी आणि माझ पुस्तक एकमेकाच्या गळ्यात गळे ... सॉरी, सॉरी, हातात हात घेऊन रममाण झालेलो असतो. तेव्हासुद्धा असंच झालं. पुस्तक वाचताना मूड लागला मस्त आणि मग एकदम फडफड ऐकू आली. दचकून बघितलं तर खोलीला लागून जी बाल्कनी आहे तिकडून एक बुलबुल दिसला. मग मी  पक्ष्यांसाठी ठेवलेल्या पाण्याच्या भांड्याकडे पाहिलं , तर तिकडे दुसरे बुलबुल महाराज मस्त भांड्याच्या कडांवर बसून पाणी पीत होते. तेवढ्या वेळात खोलीतल्या ट्यूब वर पहिल्या महाराजांनी दोन-चार काड्या आणून टाकल्या आणि तो गायब झाला. मग दुसर्याने इकडे फडफड , तिकडे फडफड असं खोलीभर फिरून एकदा खात्री करून घेतली. जागा योग्य आहे अशी खात्री झाल्यावर साहेब रेलिंगवर जाऊन झोके घेऊ लागले मस्त आणि आपला तुरा ऐटीत मला दाखवू लागले. माझ्या हातातलं पुस्तक केव्हाच गायब झालं होत. समोर इतकं गोड बुलबुल-पुराण असताना मी कशाला वेगळं काही वाचू

जवळ जवळ तासभर खटपट करून ३०-४० काड्या , कापूस, दोरे , कापडाचे धागे, वगैरे वगैरे ट्यूबच्या खोबणीत गोळा झाले. मग दोघांनीही छानपैकी पाणी प्यायलं , थोडा वेळ परत गजांवर बसून किलबिलाट केला आणि निघून गेले. मला त्यांचा हा संसार आणि धडपड पाहायला मजा येत होती. ते निघून गेल्यावर खोली एकदम उजाड वाटायला लागली. मग रोज हा खेळच झाला ; त्यांनी अर्धा पाऊण तास यायचं, फडफड करत फिरायचं, एक जण सामान आणेल, दुसरा ते जमवून घर बांधायला घेईल. सगळं कस मोजमापात, कुठे भांडण नाही, वैताग नाही , इकडेच कशाला, हे असंच नको वगैरे सूर नाहीत. माझा दुपारचा वेळ पण खूप मजेत जाऊ लागला. त्यांचं घर बांधून कधी एकदा पूर्ण होतंय आणि ते राहायला येतायत या आशेवर होते मी

पण मग एक दिवस दुपारी ते आलेच नाहीत. मला फार वाईट वाटलंअसं करत करत नाही, नाही, चांगले दिवस गेले. आणि अचानक एके दुपारी असाच एक बुलबुल पक्षी आलापण त्याने काय केलं माहितीये? सगळ्या काड्या , दोरे, धागे चोचीतून बाहेर न्यायला सुरुवात केली. मग शेवटी मी बाहेर जाऊन पाहिलं, तर दुसरे महाराज समोरच्या घराच्या गॅलरीत, तिथल्या एका जुन्या खोक्यामागे वाट पाहत बसलेले. थोडक्यात, त्यांनी बरंच शोधून मग घराची ती जागा फायनल केली होती; ही नव्हे.

माझी निराशा झाली पण एका दृष्टीने बरंही वाटलं की त्यांना हवं तसं घरकुल मिळालं शेवटी. आणि कौतुक याचं वाटलं की कसलेही मोह ठेवता त्यांनी आधीची जागा सोडली. चार दोन क्षण त्यांनी इथे आनंदात घालवले, मलाही आनंद दिला पण त्यात अडकून राहिले नाहीत. आपल्याला जमत नाही रे अस निर्व्याज प्रेम करणं, आनंद घेणं. आपण सदा भूतकाळात नाहीतर भविष्यकाळात रमणारे आणि अपेक्षांचे डोंगर उकरत बसणारे. नाही

, बुलबुल पक्ष्यांना सांगणारे मी, पुढच्या वेळी बुचाच्या झाडावर करा घरटं, मज्जा येईल नाही बघायला?? 

यावर बुचाची फुलं म्हणताहेतजीव लावायचा, गुंतवायचा नाही, हे कधी शिकणार तुम्ही लोक !! शहाणी आहेत बघ ती. नाहीतर तू !

( शहाणपणाचं वेड पांघरलेली तुझी) मी

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: