Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ४०


मनू 

काही माणसे ही  "बेटा"सारखी असतात. बेट कसे , चारी बाजूंनी पाण्याने वेढलेले असते आणि मध्ये जमीन. म्हणले तर पाणी आणि जमीन एकसंध आणि म्हणले तर जमिनीचा भाग पाण्यात असून स्वतंत्र असा. तशीच ही  माणसे. सगळ्यात असून आपले स्वतंत्र अस्तित्व जपणारी. लांबून पाहिले असता ही  माणसे सगळ्या गोतावळ्यात मिळून मिसळून जगणारी भासतात पण जवळ गेले कि कळते, आतून फार फार एकटी आणि अवघड मन घेऊन आलेली असतात. मग अशा माणसांना बेटासारखे आपले स्वतंत्र अस्तित्व कायम जपतच जगावे लागते. त्यांच्याकडे इतर कुणी आकर्षित झाले तरी त्याला ते आपल्या 'आयुष्यात' स्थान देतीलही; पण तेवढ्यापुरतेच, त्यांच्या मनात कायमचे स्थान मिळवणे कर्मकठीण !! 

तू म्हणशील आज मी हा कुठला प्रपंच काढलाय ? 

तर आजवर माझा हा समज होता कि "काही माणसे " बेट असतात. पण तुझी मागची काही पत्रे वाचताना मला असे जाणवले कि प्रत्येक माणसाच्या मनात सुद्धा एक "बेट" असते का गं ?? 

तूच बघ नं , मला तू आठवतेस ती नेहेमी बडबडी , अवखळ, अल्लड, निरागस आणि सतत कसल्या ना कसल्या विचारात. पण आताशा तू गंभीर, शांत , हरवलेली आणि बऱ्याचदा निराश सुद्धा वाटतेस. 

पण एक सांगू, या सगळ्यातून तुझ्या विचारांची खोली आणि व्याप्ती मला नव्याने जाणवते आहे. म्हणजेच तू तुझ्या मनात एक स्वतःचे , कुणाला कळू न येणारे सहज स्वतंत्र "बेट"च तर निर्माण केलेस. आजूबाजूच्या सगळ्या कोलाहलात या बेटावर क्षण दोन क्षण विसावले कि तुझे मन रोजची धावपळ करायला, निभवायला सिद्ध होते. 

आणि हो, अजून एक, तुझ्या या बेटावर मला आणि त्या बुचाच्या फुलांना फक्त स्थान आहे,  खरे ना ??   

मनू, पुढच्या भेटीत या प्रश्नाचे उत्तर मला हवे आहे. 

(तुझ्या बेटावरचा कायमचा सहनिवासी ) मी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: