Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले # ३


रे 

असा कसा रे तू  ??  मी तुझं ऐकायला जावं तरी "तुला त्रास होईल गं ...नको" म्हणणार आणि नाही ऐकलं तर "बघ, तुला नकोच आहे मी " असा सूर लावतोस. करावं काय म्हणते मी ??  कधी कधी नं , तुला एक टपली मारून तुझे गाल ओढावेसे वाटतात.  पण त्यावरही वैतागशील  तू ! असा आहेस ..... सोप्पा तरीही तितकाच अवघड समजायला

असो.. तर तू येऊन गेल्यापासून बुचाचं झाड परत हसरं झालंय..... पानं सांगतात नं मला सकाळच्या गार वाऱ्यात मी बाल्कनी मध्ये चहा पीत त्यांना न्याहाळत असते तेव्हा

तू म्हणशील काय प्रत्येक वेळी बुचाच्याच फुलांचंच  कौतुक तुला ! तर आज आपण शेजारी पाजारी जरा नजर टाकू ... गुलमोहर आणि आंबा हे आपल्या बुचाच्या झाडाच्या अलीकडे पलीकडे.  जर्द केशरी गुलमोहर फुलला नं कि नजर हटत  नाही त्यावरून आणि आंब्याचा मोहर, छोट्या छोट्या हिरव्यागार कैऱ्या म्हणजे तर निव्वळ लेकुरवाळा कारभार. या दोन्हीमध्ये आपलं बुचाचं झाड म्हणजे  तिरंगाचं होतो बघ

तर एकूणच उन्हाळा जवळ आल्यामुळे सध्या पानं  रंग बदलायला लागलीयेत. आपापली जागा सोडायला त्यांना भाग पडतंयरस्त्यावर ब्राउन, पिवळ्या , हिरव्या पानांचा खच पडतोय. थोड्या दिवसांनी हे संपेल आणि परत हिरवं गार होईल बघ सगळं

माणसं सुद्धा किती लिलया रंग बदलतात नं रे ....आपण ओळखतो ती हीच व्यक्ती का असं वाटावं इतकी !  कालपर्यंत आपली गरज असणारी व्यक्ती आज ओळख देख नसल्यासारखी वागते , तेव्हा फार फार एकटं वाटतं. पण तुला खरं सांगू, एकवेळ माणसं रंग बदलतात त्याचं नाही वाटत रे काहीपण परत पहिल्यासारखी होत नाहीत नं ते दुखतं  बघ फार.  फांदी मोडावी आणि परत तिथे अंकुर फ़ुटूच नये तसं.  त्यात आणि माझ्यासारखी बावळट मीच ...असेल परिस्थिती तशी म्हणून वागली असतील , असं म्हणून मी त्यांना माफ करून टाकते कि पुन्हा थपडा खायला मी तय्यार !

तू म्हणशील..... कुठून कुठे विषय नेते मी. पण भीती वाटते, तू राहशील ना रे आहेस तसाच , बदललास तरी इतका नको बदलूस बाबा कि तुझ्या डोळ्यात पाहताना मलाच मी ओळखू येणार नाही !  
असो ...थांबते ..... काळजी घे आणि जप स्वतःला अशा माणसांपासून

- (बुचाची फुलं नाहीयेत आत्ता पाठवायला म्हणून आंब्याच्या मोहोराचा सुगंध पाठवणारी) मी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: