Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ४१


रे

तुझं पत्र मिळालं आणि बरोबर बुचाची फुलं सुद्धा ! 

तू पत्रात लिहिलंस की प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक तिचं अस स्वतंत्र बेट असतं आणि त्यात फक्त तिलाच शिरकाव असतो. 

पण रे, ते बेट पाण्याने वेढलेलं असतं म्हणून स्वतंत्र असतं ना.  समज, ते पाणीच संपलं तर? काय उरेल मग??  
मन सुद्धा असंच असतं नाही? जवळच्या व्यक्तींच्या मायेने वेढलेलं ; म्हणून आतमध्ये सुरक्षित आणि  हव्या तश्या कल्पनेच्या भराऱ्या मारायला स्वतंत्र !

मग तरीही का दुखावतो आपण जवळच्याच व्यक्तीला आणि पर्यायाने स्वतःलाही ! हे माहिती असून की 'आपण न बोलता समोरच्याला आपोआप आपल्या अपेक्षा कळाव्यात' हे प्रत्यक्षात शक्य नाही. आणि समज, त्यातून जरी बोलून दाखवले तरी कृतीतून ते उतरवणे समोरच्याला प्रत्येक वेळी शक्य होईलच असं नाही ना !! समोरच्या व्यक्तीलाही "मन" नावाची गोष्ट आहे आणि त्या 'मनात" उतरून विचार करायचा , एकदम प्रतिक्रिया द्यायची नाही, हे वेळोवेळी ठरवून सुद्धा आपल्याला जमत नाही. असं  का ? एक ठिणगी पडून आख्ख रान पेटावं तसा एक शब्द चुकीचा पडला की आपलं बोलणं तिखट होऊन शब्द सांडतात आणि दोन मनं दुखावली जातात खोलवर. कायमची. तरीही आपल्याला का कळत नाही ? एका मर्यादे पलीकडची गुंतवणूक आहे मनाची म्हणून आपण समोरच्याची अगदी वैयक्तिक अशी जागाही सोडत नाही ! कुठून येतो इतका अधिकार??
तुला एक साधी सोप्पी गोष्ट सांगते....

मला न लहानपणी गणिताच्या अभ्यासाला बसले कि कानात इअरफोन घालून गाणी  ऐकत गणितं सोडवायची सवय होती. जरा हळुवार संथ लयीचं गाणं असलं, कि गणितातली आकडेमोड वळणदार , गोलाकार यायची, सगळी चिन्हे अगदी ठसठशीत ! आणि लय द्रुत झाली कि डॉक्टर ने prescription लिहावं तसं मधल्या स्टेप्स लिहिल्या ना लिहिल्यात अशा पद्धतीने एकदम उत्तरच आलेलं ! पण हे जे बीजगणितातून भूमितीत आणि भूमितीतून परत बीजगणितात जाणं एरवी अवघड वाटायचं नं , ते त्या गाण्यामुळे सोप्पं व्हायचं रे.  मग कळायचं सुद्धा नाही गणिताचा अभ्यास केव्हा संपायचा ते. हे म्हणजे मनाचा लगाम आपल्या हाती आहे असं वाटण्यासारखं .... स्वप्नच कि नाही. खऱ्या आयुष्यात असं नाही न होत. हे असं अखंड मनाला लीलया तळ्यात मळ्यात करायला लावणारं आणि ते ही सहज, न थकवता न कंटाळता आणि नेमक्या उत्तरावर आणून सोडणारं  ...... असं पार्श्वसंगीत का नसतं मनाच्या आत इनबिल्ट ??? 

मुळात माणसाला मनच का असतं ? आणि असलच तर जशी HR policy असते  तसं जगण्याचं एखादं मॅन्युअल का नाही बनवता येत? जगण्याची पण एक स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर का नसते ??

विचार पाहू तुझ्या बुचाच्या झाडाला, तोवर मी पाणी घालून येते माझ्या बुचाच्या झाडाला !!

( तुझ्या-माझ्या मनाचं गणित सोडवू पाहणारी ) मी

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज

लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: