Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ५९


रे

आत्ता विमानात बसले आहे. विमान प्रवासाची एक वेगळीच गंमत असतेआजूबाजूला निळभोर आकाश, त्यात पांढुरके ढगांचे पुंजके, दूरवर नजर टाकली तर ढगांच्या पायऱ्या असलेला रस्ता, खाली पाहावं तर सगळा लिलीपुटचा प्रदेश , आपल्या आजूबाजूला अर्धवट पेंगुळलेली माणसं, आईच्या खांद्यावर झोपी गेलेली गोड बाळं, सेवेला तत्पर हवाई सुंदऱ्या, लॅपटॉप आणि बाकी गॅजेट्स मध्ये रममाण झालेलं कॉर्पोरेट विश्व. सगळंच एखाद्या स्वप्नासारखं

मला नेहेमी वाटतं, कसं काय कळतं त्या वैमानिकाला की अमुक एका ढगावरून गेलो की डावीकडे वळायचं आहे, खाली नदी किंवा कालवा आला की अमुक एक ठिकाण आलं बुवा. कमाल आहे नाही. मला सगळे ढग सारखेच दिसतात, मुळात आकाशातले रस्ते आणि ट्रॅफिक हा विषयच आपल्या डोक्यात कधी येत नाही. वैमानिक रस्ता विसरत असेल का रे कधी? आणि विसरला तर त्याला सूचना मिळतील त्या ऐकून तो परत योग्य रस्त्याला लागत असेल का हे आपले माझे वेडीचे भाबडे प्रश्न

जिकडे तिकडे बर्फाळ प्रदेश असावा त्याप्रमाणे आत्ता ढगांचं साम्राज्य आहे विमानाभोवती. जमीन , समुद्र , नदी, झाडं, माणसं दिसायचं नाव नाही. अवकाशाची पोकळी, ढग आणि आपण - विमानाला चकवा लागला नाही ना अशी शंका यावी इतकं अंतर हे असंच पार करणं चालू आहे

मला या ढगांचे निरनिराळे आकार दिसतायत, दोन ढग एकत्र येऊन विलग होताना दिसतायत, ढगांची एक लांबलचक पट्टी आकाशाचा कॅनव्हास व्यापून टाकताना दिसतेय. मग फक्त ढगच, आकाश सुद्धा नाही. व्यापून राहणारा पांढरा रंग, जणू कापसाची दुलईच. मला यात लुप्त व्हावंसं वाटतं आहे. सगळ्या चिंता, धडपड, गोंधळ , दुःख मागे ठेवून त्या दुलईत लपून बसावं आणि सापडूच नये. खूप शोधावं आपल्याला माणसांनी आणि मग आपण हळूच बाहेर येऊन त्यांना वेडावून दाखवावं, त्यांचा सात्विक संताप गालातल्या गालात हसून झेलावा आणि मनात असे जिवलग दिल्याबद्दल देवाचे आभार मानावे

पण कसलं कायढगांची पट्टी मागे पडून, विमान खाली जायला सुरुवात होते आणि लिलीपुटचा प्रदेश परत दिसायला लागल्यावर हे स्वप्नरंजन थांबतं. तेवढ्यात हवाई सुंदरी येऊन सीटबेल्ट लावा सांगून जाते

प्रत्येक वेळी लँड होताना सीटबेल्ट बोचतोच, बघ !

म्हणूनच, एअरपोर्ट जवळ एखादे तरी बुचाचे झाड आहे का हे माझी नजर आपसूक शोधत राहते.

(सगळी विमाने तुझ्या गावावरून का जात नाहीत - इति) मी

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: