Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले # १९


रे

तू काल विचारलंस मला...कायम negative shade असलेलं का लिहितात लोक? Positive सूर असणारं फार कमी लिखाण आढळत आजकाल

खरंय तुझं. मी विचार करत गेले, मग जाणवत राहिलं. समज तू एका निसर्गरम्य ठिकाणी असशील तर काय पाहायला जास्त उत्सुक असशील? भल्या पहाटे उठून सूर्योदय बघायला जाशील का संध्याकाळी रमत गमत सूर्यास्त बघायला जाशील?? 

मला माहितीये, लोक सहसा सूर्यास्त बघायलाच जास्त उत्सुक असतात. त्या वेळची आकाशातील रंगांची उधळण , येणारा गडद अंधार जास्त आपलासा वाटतो. आपलं, दुःख वेदना, संकटं अशीच असतात ....चहुबाजुनी येणारी, वेगवेगळ्या shades असणारी, निराशेच्या अंधाराने घेरून टाकणारी. पण चांदण्यांनी आकाश भरून जातं तश्या ह्या वेदना मिरवतो आपण. आपलंच आकाश कसं भरलंय दुःखानी, आपणच कसे त्या दुख्खाच्या आकाशात चांदण्यांना झेलतोय हे दाखवण्यात फार मोठेपणा वाटतो आपल्याला. सुखाची ओंजळ थिटी पडते तिथे.माणसांना सुख कुरवळण्यापेक्षा दुःख धरून बसायला एकूणच आवडत.

म्हणूनच वाचताना सुद्धा वेदना जास्त जवळची वाटते माणसांना. कुणीतरी आपल्यासारखाच या वेदनेतून जातोय हे कुठेतरी बरं वाटतं जीवाला किंवा आपण सुदैवी आहोत म्हणून ती वेदना आपल्याला भोगायला लागत नाही हे सुद्धा सुप्तपणे कुठेतरी सुखावून जात असत

लिहायचाच विचार केला तर वेदनेला शब्द लवकर फुटतात, शब्दांना धार येते सोसल्याची, सोसणं बघितल्याचीक्वचित सूड घेतल्याची सुद्धा. वजन मिळतं शब्दांना, वेदनेतून बाहेर पडण्याचं  किंवा त्यातच झिजून मरण्याचं  सुदधा.

लिखाण नसतं रे कधी positive किंवा negative, लेखक फक्त शरण जातो एका क्षणाला....ज्यात त्याने एखादं आयुष्य होरपळलेलं पाहिलेलं असतं, कधी तो/ ती स्वतःच तावून सुलाखून बाहेर पडलेले असतात. तो एक क्षण त्यांच्यातली उर्मी कागदावर जिवंत करतो...बस्स!! मग त्याचं असं काही उरत नाही....उरतो फक्त एक अपरिहार्य शेवट .... वेदनेला वाट करून देण्याचा

एक नंदादीप अखंड तेवत राहतो त्याच्या आत.........लिहित्या मनाला सूर्योदयच दिसावा कायम, सूर्यास्त होऊच नये यासाठी !!

असो.

इथल्या टेकडीवरून सूर्यास्त फार छान दिसतो. त्या संधिप्रकाशात टेकडीवरचं बुचाचं  झाड तुझ्यासारखं दिसतं थेट. माहितीये?? 

(तुझ्यातल्या संधीप्रकाशाची वाट पाहत कॉफी घेताना) मी



पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: