Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # २६


रे 

काल एका जवळच्या मैत्रिणीला स्टेज चा कॅन्सर आहे असं कळलं. तिनेच सांगितलं, अगदी थंडपणे... सांगताना तिच्या मनात किती उलथापालथ चालू असेल याची कल्पना करणं  सुद्धा आपल्याला या जन्मात शक्य नाही. तिने स्वीकारलं होतं , तिचं कॅन्सरसकटचं जगणं ... किती दिवस, तास, मिनिटे हातात आहेत माहिती नाहीत. मला म्हणाली , कसा दिसत असेल मृत्यू? मला त्याच भय नाही म्हणाली, तो  येणारे हे माहितीच आहे आता. " माझ्याच आतड्याला पीळ पडला तीच इतकं धीरोदात्त बोलणं ऐकून , कुठून इतक बळ एकवटलं हिने, मला समजत नव्हत. मग खूप बोलत राहिली , आम्ही कॉलेज मध्ये असताना केलेल्या गमती- जमती, तिचा पहिला क्रश, पुरुषोत्तमच्या तालमींना केलेली धमाल, कॅन्टीन, सिनेमे, शॉपिंग ...सायकलवरची भटकंती  ......... जणू काही ती शेवटचं जगून घेत होती हे सगळं परत.  त्या क्षणी ती जगातली सगळ्य्यात सुंदर स्त्री होती माझ्यासाठी !!

खरंच रे ... मृत्यू कसा दिसत असावा ? अक्राळ विक्राळ, अजस्त्र , भयानक .... एखाद्या हिंस्त्र जनावरासारखा ... सावज बेसावध असताना झडप घालणारा ?? की शांत, निर्दयी, सोलून काढून मग तिळतीळ संपवणारा.. एखाद्या कोल्ड ब्लडेड मारेकऱ्या सारखा??

आणि समोर मृत्यू दिसत असताना माणूस कशाचे हिशेब मांडत असेल ... उरलय ते आयुष्य कसं आणि किती जगून घेऊ याचे ; की आत्तापर्यंत जे करावंसं वाटलं पण केलं नाही याचे ???

माझी मैत्रीण मला हवीये रे, खूप हवीये.....कशी आणू तिला खेचून मृत्यूच्या दारातून ?? काय करू??? 

ती काल फोन ठेवताना म्हणाली ते विसरणं शक्य नाही मला......सगळ्यांच्याच आयुष्यात बुचाची फुलं नसतात, तुझ्याकडे आहेत, जप ती !

हो, मला जपायची आहेत ही फुलं मरेपर्यंत. आणि गेल्यावर माझी राख बुचाच्या झाडालाच द्यावी असं लिहून ठेवणारे मी. मी प्रत्येक फुलात असेन मग आणि तू मला कधीच चुकवून जाऊ शकणार नाहीस; हो नं??

(जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकलेली) मी
पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: