Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले #१




रे

तुला काय हाक मारावी कळत नाही बरेचदा, म्हणून रे म्हणणारे मी ! चालेल नं ? पत्र लिहायला घेतलं तेव्हा तुझी विचारमग्न मुद्रा कशी दिसत असेल याचा विचार करत होते, मग एकदम बुचाच्या फुलांचं झाडच आठवलं.  

तू पाहिलंयस कधी डोळे भरून बुचाच्या फुलांनी लगडलेलं झाड? माझ्या घराच्या बाल्कनिच्या अगदी समोरच आहे. झाड जेव्हा लगडलेल असतं  ना फुलांनी ; तेव्हा एक मंद , मोहक, धुंदावणारा सुगंध येतो गल्लीच्या कोपऱ्यापासूनच. त्या सुगंधाचा पाठलाग करत आलं , की ही फुलं गालिचा अंथरून बसलेली असतात घराच्या आवारात. झाडावर घोसच्या घोस लगडलेले आणि वाऱ्यावर हळू हळू लहरत लहरत फुलं इकडे इकडे विसावा शोधत पहुडलेली. मग दुसरं कुठल झाड आहे आजूबाजूला त्याची जाणीव देखील रहात नाही

बुचाची फुलं वेचणं हा माझा आणि लेकीचा आवडता उद्योग आहे. पांढरी पांढरी नाजूक फुलं आणि अलवारपणे डोकावणारे केसर ...खूप नजाकत आहे बुचाच्या फुलांमध्ये. फुलं  गोळा करताना एकेक आठवणींचे कप्पे उघडतायत असं वाटायला लागतं. मग त्या कप्प्यांचा एक छानसा फ्लॉवरपॉट करून ठेवायचा हॉलमध्ये , की दोन्ही दरवळत राहतात. परत - दिवसांनी फुलं आणि आठवणी दोन्ही जुन्या होतात , मग नव्याने गोळा करायच्या दोन्ही...... बुचाची फुलं आठवणींची आठवण करून देतात आणि आठवणी जवळच्या माणसांनी आपले आयुष्य किती समृद्ध केलाय; नव्हे बहराला आणलय याची

पावसाळ्यात मृदगंध आणि बुचाची फुलं इतकी बेमालूम मिसळतात की सगळी मरगळ क्षणात जाते. पावसानी न्हायलेलं आणि फुलांच्या भाराने वाकलेलं झाड , पानातून ओघळणारे जलबिंदू, झुंबरासारखी लटकलेली फुलं..... अहाहा !! उन्हातून आल्यावर डोळ्यांवर थंड पाण्याचा शिडकावा मारावा आणि  डोळे आतून निवावेत ना अगदी तस्सं वाटत

काही नाती अशीच असतात ना रे , बुचाच्या फुलांसारखी ..... नाजूक, हळुवार...जगण्याला कारण देणारी. पावसात भिजवणारी, थंडीत दुलई पांघरणारी, भेट नसेल होत नेहेमी पण सतत दरवळणारी ...... एकूण जगण्याचा उन्हाळा सुसह्य करणारी आणि प्रत्येकाच्या मनात एक तरी बुचाचं झाड़ फुलवणारी.... 

आता डोळे वटारून बघू नकोस, मी तुला विचारांच्या तंद्रीतून भंग केल की पाहतोस तसा. थांबतेय इथेच

असाच राहा ....बुचाच्या फुलांसारखा :)

- (बुचाच्या फुलांमध्ये मन अडकलेली) मी  

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित "न लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: