Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ४६


रे 

रास्ते कहाँ खतम होते हैं जिंदगी के सफर में 
मंझिल तो वही है , जहां ख्वाहिशें थम जाऐं 

या ओळींपाशी मी नेहेमीच थबकते. 

माणसाचे श्वास संपेपर्यंत तो चालत असतो. शारीरिकरित्या हे चालणे  कमी किंवा बंद होत असेल सुद्धा, पण मनातल्या मनात प्रत्येक माणूस भूत, वर्तमान आणि भविष्य अशा आलटून पालटून कोलांट्या उड्या मारत असतो. मनाचे कितीतरी पापुद्रे सोलवटून निघतात या प्रवासात. एक एक पापुद्रा सोलण्याची, एक एक श्वास घेण्याची किंमत जीवन वसूल करत असते आपल्याकडून. तरीही शेवटल्या श्वासापर्यंत चालणं काही संपत नाही आणि का संपावं ? त्या त्या वेळेला ती ती किंमत वसूल झाली तरी ती मोजत असताना बरंच काही निसटूनही गेलंय हातातून हे लक्षात येतं. पण बऱ्याचदा, आयुष्य नव्याने उलगडायला सुरुवातही होते . धूसर पण हव्या हव्याश्या वाटांची पालवी फुटते आणि अपेक्षांचे नवीन डोंगर उपसायला मेंदूची ढाल करून मन परत एकदा सज्ज होतं आयुष्याला भिडायला. क्वचित केव्हातरी मनाचं मागणं मनाच्या मनासारखं पूर्ण होतं. हा असा सोनेरी क्षण कैक योजने चालून गेल्यानंतर कधीतरीच वाट्याला येतो. आयुष्य उजळायला तेवढे पुरेसे असते खरं तर पण माणूसच तो, या एका क्षणाने समाधान होईल तर कसं होणार ?? मग त्या कोलांट्या उड्या आणि पापुद्रे सोलवटण जगण्याचा एक भाग होऊन  राहतं..... भोवऱ्यात फिरत राहिल्यासारखं !

असाच एक भोवरा तुझ्याकडून माझ्याकडे आला होता कधीकाळी. आणि त्या भोवऱ्यात तुझ्याबरोबर मी मलाही सापडत गेले, अजून शोध संपलेला नाही रे. हा शोध संपला तर काय होईल ? हा भोवरा अचानक थांबला तर काय ? मी जे तू बरोबर नसतानाही, तू आहेस असं समजून चालत राहते, ते चालणं समज थांबलं एका दिवशी किंवा आपल्यापैकी एकाने थांबवलं तर काय ? 

कधी कधी असं वाटत ना, की इच्छा असाव्यात, त्यांना रस्ते मिळावेत, गंतव्य स्थान लाभेल या आशेने चालत राहावे आणि ते मिळाले तरी प्रवास संपू नये; तो चालूच राहावा. मनातल्या मनात का असेना. प्रवास थांबला तर हेच ते गंतव्य स्थान , इथपर्यंतच पोचायचे होते, असे म्हणून नाते गोठेल तिथे. मला या क्षणाची भीती वाटते नेहेमी. 
आता म्हणू नकोस .... मंझिले अपनी जगह हैं , रास्ते अपनी जगह.... मला ते गाणे आवडत असले तरी !
मला खूप चालायचे आहे तुझ्यासोबत... बुचाही फुले ओंजळीत भरून. येशील ना ? 

(तुझा माझ्यापर्यंतचा प्रवास आठवून चालत राहणारी ) मी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: