Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ५७


रे

परवा काही कारणाने एका नातेवाईकाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणं झालं. गेटमध्ये शिरेपर्यंत नाकात मृदगंध दरवळत होता. गेटमधून आत शिरल्या शिरल्या औषधांचा, सॅनिटाइझर, क्लिनर्स, डेटॉल, वेगवेगळे वास नाकात भरले. एकदम अंधारून आल्यासारखं वाटलं. थोड्या वेळाने परत बाहेर पडले तेव्हा खास संध्याकाळचा वास जाणवला - कॉफीचा, आकाशातल्या रंगांचा, उडत निघालेल्या पक्ष्यांचा, घरी परत निघालेल्या नोकरदारांचा आणि शाळेतून चिवचिवाट करत बाहेर पडलेल्या चिमुकल्यांचा. सगळे गंध एकमेकांत मिसळत गेले आणि त्या लयीत मी घरी कधी पोचले कळलं देखील नाही. मग घरी आल्यावर निरंजनात वातीचा, स्वयंपाकाचा, पुस्तकांचा, गादीचा असे कितीतरी गंध मी मुद्दाम हुंगून भरून घेतले

गंध नसतील आयुष्यात तर काय होईल रे? मला जाणवलं, ऐकू येण्याइतकच वास येणं फार महत्त्वाचं आहे. एक प्रकारे नाकाने पण मनुष्य बघत, ऐकत, अनुभव घेत असतो

म्हणून तर पाऊस आला की भज्यांचा वास येणं अपरिहार्य असतं, उन्हाळ्यात आंब्यांच्या वासाशिवाय राहणं मुश्किल, हिवाळ्यात गरम आणि अद्रकवाल्या चहाचा किंवा सूपचा वास येतोच येतो. लहान बाळाच्या जावळाचा वास, पहिल्या वहिल्या प्रेमपत्राचा वास, जाळीदार पिंपळपानातल्या मैत्रीचा वास हे तर खास असतात.

इतकंच कशाला, सगळ्यात जवळच्या व्यक्तीचा गंध सुद्धा तितकाच जवळचा असतो आपल्यालाती व्यक्ती आली हे आधी त्या व्यक्तीचा गंध सांगतो, मग त्याच्या पावलांची चाहूल वगैरे.

म्हणून तर तुझ्या-माझ्यात इतकं अंतर असताना सुद्धा ही बुचाची फुले इतकी जवळची वाटतात; हो

पावसाळा सुरू झाला, बहराचे दिवस !! ये लवकर !!!

( अशीच तुझी आस लागलेली गंध-वेडी ) मी

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: