Search This Blog

Wednesday, October 31, 2018

साउली

मोरपीस मन
मनाचं कोंदण 
राधेचा श्याम 
जन्माचं गोंदण
गोंदणात श्याम 
श्यामरंग ल्याली 
सावळ्या सख्याची 
राधिका "साउली"
-नेहा लिमये 

तू

तू

ही पहाट जेव्हा धुक्यात लय सावरते
मी रातराणीच्या गंधात तुला पांघरते

तो रावा बोलतो डौलात सोन सकाळी
स्पंदने तुझी ऐकते पारिजात ओंजळी

ही दुपार सरता सावल्या दाराशी येती
सय तुझी दाटता पाने उगा सळसळती

ती सांज उरी घेऊन कातरतो पुरीया
मी लावते दिवा संपवून तुझा जोगिया

मग येते रात्र ती उधळण्या नक्षत्र चांदण्या
अखेर भेटण्या तुला मी मिटून घेते पापण्या

-नेहा लिमये 

तो

तो


तो हसता हसता ऐकवून जातो विराणी
अन् उठते खळीतून कळ ती जीवघेणी

तो म्हणतो मी आहे असा काहीसा वेडा
कुणी सांगा त्याला धुंदीतच वाढे केवडा

तो गुणगुणतो स्वतःशी अंधाराची गीते
मग कुठूनशी ती किरण शलाका येते ?

तो चाळतो जुन्या स्मरणांची पिंपळपाने
शाई झरते, विरते ,उरते जागवून स्वप्ने 

तो नाही म्हणतो करावयाचा अट्टाहास
का तरीही लागे मागे अश्रुंचा वनवास

तो जगतो ऊराशी घेऊन अवकाशाला
जरी जाई झेप ओलांडून या क्षितिजाला

- नेहा लिमये 

चैत्र-पालवी

मधुमास खुणावे आता
मिटले शिशिर शहारे
पक्ष्यांनी गुंफल्या माळा 
शोधाया पुन्हा सहारे (किनारे?)

ती वाट धुक्याची सरली
सरले दुःखाचे कोहरे
त्या चैत्र-पालवी संगे
आनंदी बीज अंकुरे

- नेहा लिमये 

निःशब्द

निःशब्द

तुला ऐकल्यानंतर मागे काही उरत नाही....

शब्द, अर्थ, भाषा, विरामचिन्हे..

सगळ्या पाशातून मुक्त आहेस तू

का, कधी, कुठे, केव्हाच्या पल्याड...

तुझा आभास उरतो फक्त

वाळूत पावल उमटत जातात

वाळू पावलांना लागते पण ....

पण पाऊलवाट नाही  होत त्याची...

म्हणून तर मी रोज येते

तुझी गाज ऐकायला ....

अनिमिषपणे पाहत रहाते... 

मागे उरलेली निःशब्द शांतता........ ! ! !



- नेहा लिमये 

गर्द

गर्द 

गर्द राईतून जर्द केशरी खुणावतो केवडा
मंद सरींवर छंद गुलाबी सुचतो मनकवडा

अभ्र नभावर शुभ्र पांढरी झालर जलदांची
दर्भ तृणावर गर्भ रेशमी पाखर सुमनांची 

आर्द्र सुरावट मंद्र पावरी घुमते तरुतळी 
सांद्र सभोती चंद्र सावरी खुलते  चाफेकळी 

- नेहा लिमये 

आहट

सरसराती हुई ये वादीयां 
जब तुम्हारा जिक्र करती हैं 

बारीश की बुंदोमें 
मैं तुम्हे खोजने लगती हूँ......

एक धुंदलासा कोई पत्ता
मेरी मून्द आंखोंको दिखता हैं

नमी सी आ जाती है आवाजमे
जब वो कहता है
हां, मैने देखा है उसे 
तुम्हारा नाम लेते हुए....

थरथराती हुई मेरी तनहाई
तब  सांस लेती है 

तुम्हारा खयाल ही तो है बस जहन में
और क्या कहूँ............

बस युंही...
तुम्हारी आहट की आदतसी हो गयी है अब

- नेहा लिमये 

Tuesday, October 30, 2018

खयाल



युंही कभी आया करो खयालोमें

खयाल जो तुम्हारे मेरे बीच का
फासला तय करना चाहते है

फासले जो सुबह की अंगडाईसे परे
और शाम की तनहाईसे वास्ता रखते है

तनहाई से याद आया.....
क्या अब भी तुम आंखोपर
किताब रखकर सोते हो ?

किताब जिसमे मैने कभी दिया हुआ
पीपल का पत्ता हुआ करता था

किताब के पंने कितनेही बेतरतीब क्यू न हो
उस पत्ते का खयाल रखना...
और युंही कभी खयालोमे आते रहना !

- नेहा लिमये 

दायरा

आँखोसे मुझे तकते हुए
तुम जो तलाशते हो खुदको
एक दायरा बन जाता है
तुम्हारे मेरे दरमियान

आँखे नम सी फिर और
वो  पिघलता हुआ मंजर
दायरेसे निकलता वो लमहा
कहीं थम जाये बस

मैं वो लमहा जी लू
दामन मे बटोर लू 
फिर लौट जाऊं
वही पुरानी भीड में
खुदको तुम्हारे पास छोड कर

मैं नही जानती
इस रिशते के मायने
ना कोई जूस्तजू है मुझे
ना ही कोई आरजू...
मैं तुम हूँ 
तुम मैं हो
बस , इतना काफी हैं जीने के लिये !

- नेहा लिमये 

सल

सल

सल काही संपत नाही
पीळ काही सुटत नाही

काळ काही सरत नाही
मन काही ऐकत नाही

वेळ काही थांबत नाही
कुणी काही सांगत नाही

बीज काही रुजत नाही
काटा काही फुलत नाही

आज काही कळत नाही
उद्या काही वळत नाही

नाही काही मागणे नाही
आणि काही सांगणे नाही

जन्म काही सोसत नाही
मरण काही मिळत नाही


-नेहा लिमये

Saturday, October 27, 2018

#मराठीभाषा ५३- नखशिखांत आणि आपादमस्तक

नखशिखांत आणि आपादमस्तक
नखशिखांत - यातली नखे ही पायाची आणि शिखा म्हणजे शेंडीचे केस म्हणजेच डोक्यावरचे केस. म्हणजेच नखापासून सुरुवात करून शिखा हे शेवटचे टोक (अंत) धरून पायापासून तो डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर या नखशिखांताने व्यापले जाते.
उदा. नखशिखांत रक्ताने न्हालेल्या त्या माणसाला पाहून तिची बोबडी वळली!
किंवा
मुसळधार पावसात नखशिखांत भिजलेली ती समोर उभी राहिली आणि त्याचे भान हरपले.
आपादमस्तक - हा शब्दही खरे तर संपूर्ण शरीराचा उल्लेख करतो, पायापासून डोक्यापर्यंत असेच सूचित करतो.
उदा. महाराजांनी त्याला आपादमस्तक न्याहाळले आणि त्यांच्या कपाळावर बारीकशी आठी उमटली.
म्हणजे बघा - रक्ताने न्हाणे म्हटले, भिजणे म्हणले की, ते नखशिखांतच असते तर न्याहाळणे आपादमस्तक असते! एकेका शब्दाचे असे हे भाषेतले स्थान ठरलेले असते.

- नेहा लिमये 
(संदर्भ : शब्द-चर्चा- मनोहर कुलकर्णी) 

टीप : या शब्दसंगतीला इंग्लिशमध्ये collocation म्हणतात.

#मराठीभाषा ५२ - एकसमयावच्छेदेकरून

एकसमयावच्छेदेकरून
एक समय म्हणजे एकाच वेळी. अवच्छेद म्हणजे मर्यादा. जमिनीला असते तशी वेळेलाही एक हद्द असते; ती हद्द, तो किनारा. मर्यादेच्या त्या एकाच चौकटीत, वेळेच्या त्या एकाच मर्यादेत असा या शब्दाचा शब्दश: अर्थ आहे.
म्हणजेच, ‘एकाच वेळी एखादी गोष्ट घडत असताना नेमके त्याच वेळी’ किंवा ' दोन अथवा अधिक गोष्टी एकाच वेळी घडत आहेत' असा अर्थ होतो.
उदा. ‘अण्वस्त्रबंदी करावयाचीच झाल्यास, सर्वत्र अण्वस्त्रधारी राष्ट्रांनी ती एकसमयावच्छेदेकरून केली पाहिजे.’

- नेहा लिमये 
(संदर्भ: शब्द-चर्चा- मनोहर कुलकर्णी )


#मराठीभाषा ५१ - व्यस्त आणि व्यग्र

व्यस्त आणि व्यग्र
व्यग्र = वि + अग्र
अग्र म्हणजे टोक, साध्य, ध्येय आपल्यापुढे आहे, अशी स्थिती.म्हणजे एका विशिष्ट गोष्टीकडेच आपले सर्व लक्ष लागलेले आहे, इतर काहीही आपल्याला सुचत नाही, दिसत नाही, समजत नाही.
अस्ताव्यस्त शब्दाचा जो अर्थ, तोच बहुतांशी व्यस्त शब्दाचाही आहे. अस्ताव्यस्त या शब्दाची फोड अस्त + वि + अस्त अशी होते म्हणजे विखरून इकडेतिकडे टाकलेला.
म्हणूनच, एखाद्या कामात आपण पूर्णपणे गुंतलेलो असू आणि त्यामुळे अन्य कुठेही लक्ष देणे आपल्यला शक्य नसेल, तर अश्या वेळी आपण त्या कामात (‘व्यस्त’ आहोत असे न म्हणता) व्यग्र आहोत, असे म्हणावे लागेल.

- नेहा लिमये 

राधा के गिरीधारी

🌼 राधा के गिरीधारी 🌼
मनमोहन मनभावन नाचे कुंज बिहारी I
सबके छीन लूट लियो राधा के गिरिधारी II
कहत गोपी मधुबनमे नंदलाल आयो I
बरखा बन राधे-श्याम घुमड घटा छायो II
रंग गयी चुनर और मगन भयो ब्रिजलाल I
संग भई ब्रिजबाला किशन होय मोहजाल ।।
मची धूम खेल होरी सब गोप वृन्दावनमे I
कहत झूम राधा श्याम बसे कण-कणमे II
- नेहा लिमये 

#मराठीभाषा ५०- का आणि की

का आणि की
का आणि की हे शब्द वापरताना बऱ्याचदा गफलत होते. उदा. "मी थांबू की जाऊ?" याऐवजी 'मी थांबू का जाऊ?" असे विचारले जाते. किंवा "मला वाटलं की तू गेलास" याऐवजी "मला वाटलं का तू गेलास" असेही ऐकू येते.
हे टाळण्यासाठी खाली काही उदाहरणे दिली आहेत-

'का' चा वाक्यात उपयोग-
१. दर वेळी मीच का स्वयंपाक करायचा? - इथे प्रश्नवाचक
२. जर का मी स्वयंपाक करायचा असेल तर दादाने कपडे घडी घालायचे काम करावे. - इथे प्रश्नवाचक नसून, वाक्याला जोर, ठामपणा येण्यासाठी

'की' चा वाक्यात उपयोग-
१. सचिनवर विश्वास ठेवावा की नको? - इथे प्रश्नवाचक नसून "किंवा" या अर्थी.( विकल्प - हे की ते असे)
२. आई म्हणाली, की मावशींना निरोप देऊन ये - इथे दोन वाक्ये एकमेकांना जोडण्यासाठी
३. बाळ उठलं, की मला लगेच सांग - इथे 'म्हणजे', 'त्या वेळी' अशा अर्थाने
४. "आई, पाऊस पडतोय, मी गच्चीत जाऊ?"
"जा की ! त्यात काय विचारायचं?" - इथे ठासून, जोर देऊन सांगण्यासाठी

- नेहा लिमये 
(संदर्भ: लिहावे नेटके - माधुरी पुरंदरे )

#मराठीभाषा ४९ - सव्यसाची

सव्यसाची
सव्य (डावा हात किंवा बाजू) आणि साचिन् (सिद्ध असणे) असे दोन घटक एकत्र येऊन हा शब्द तयार होतो – सव्यसाचिन्. आणि मग त्याचे भाषेत वापरले जाणारे रूप मिळते सव्यसाची. त्याचा अर्थ आहे डाव्या हाताने कोणतीही गोष्ट करू शकणारा, करणारा.म्हणजेच दोन्ही हात सारख्याच क्षमतेने वापरू शकणारा.
अर्जुन हा धनुर्विद्येत असा सव्यसाची होता. इतका की, सव्यासाची हे त्याचे एक विशेष नावच ठरले.या शब्दात खास धनुष्यवाचक शब्द नाही. त्यामुळे हे विशेषण केवळ डाव्या हाताने धनुष्य वापरणारासाठीच योग्य आहे असे नाही; तर कोणत्याही क्षेत्रात उजव्या इतक्याच डाव्याही हाताने म्हणजेच नेमक्या विशिष्ट साधनासाठी अडून न राहाता कार्य करू शकणारा कोणीही सव्यसाची म्हणून ओळखला जातो.
- नेहा लिमये 
(संदर्भ : शब्द-चर्चा- मनोहर कुलकर्णी )

#मराठीभाषा ४८- संदेश/आदेश

संदेश/आदेश
संदेश आणि आदेश हे दोनही शब्द दिश् (म्हणजे दाखविणे) या धातूपासून सिद्ध होतात. या दिश् धातूपासून दिशा हाही शब्द तयार झालेला आहे.
संदेश = सम्+दिश् = सम्यक दिशा = योग्य काय ते दाखविलेले, सुचविलेले
आदेश = आ+दिश् = दाखविलेल्या ठिकाणापर्यंत, विचारापर्यंत (जाण्यासाठी) सूचना. (आ म्हणजे पर्यंत)
- नेहा लिमये 
(संदर्भ : शब्द-चर्चा - मनोहर कुलकर्णी )


#मराठीभाषा ४७- संदिग्ध

संदिग्ध = सम् + दिग्ध
दिग्ध हे एक धातुसाधित विशेषण आहे - दिह् या धातूपासून तयार झालेले.
दिह् (देग्धि) म्हणजे लिंपणे, चोपडणे. त्यामुळे ज्या गोष्टीवर हा लेप दिलेला असतो, तिचे मूळ स्वरूप दिग्ध होते. म्हणजे स्पष्ट राहात नाही. सम् या उपसर्गाने या दिग्धतेला अधिक दाट केले आहे.
'हे तुमचं विधान अगदीच संदिग्ध आहे!’ या वाक्याचा अर्थ - ‘तुमच्या विधानाचा नेमका अर्थ काय आहे, हे कळत नाही!’
जेव्हा एखाद्या विधानामध्ये अशी अस्पष्टता असेल, विधान अर्थदृष्ट्या कोड्यात टाकणारे असेल, तेव्हा असे विधान करणाराला सांगावे लागते की, तुमचे काय म्हणणे आहे ते नि:संदिग्धपणे सांगा! नि:संदिग्ध म्हणजे ज्यातून संदिग्धता निघून गेलेली आहे असे म्हणजेच स्पष्ट, ज्यात कसलीही शंका नाही असे.

- नेहा लिमये 
(संदर्भ : शब्द-चर्चा-मनोहर कुलकर्णी )


#मराठीभाषा ४६- टीका/टिका

टीका/टिका

टीक् -टीकते असा संस्कृत धातू आहे. त्याचा अर्थ पुढे सरकणे असा आहे. या धातूपासून टीकयते असे प्रयोजक क्रियापद तयार होते. या प्रयोजकाचा अर्थ पुढे सरकवणे म्हणजे इतरांच्या दृष्टिपथात आणणे, स्पष्ट करणे असा आहे. त्यापासून टीका असा संस्कृत शब्द तयार होतो व तो आपण मराठीत तत्सम स्वरूपात त्याच अर्थाने वापरतो. अर्थात टीका करणे याचा एक वेगळाही (निंदा करणे, दोष दाखवणे असा) अर्थ आपण जाणतोच. त्यातही मूळ वस्तूचे रूप स्पष्ट करून दाखविणे असतेच.

‘टीका’ हा शब्द ‘टिका’ असा लिहून चालणार नाही. कारण टिकणे (अस्तित्व राखणे) असा मराठी धातू असून 'टिका' हे याचे आज्ञार्थी रूप होते.

त्यामुळे टीका व टिका हे दोन भिन्नार्थक शब्द होतात.

- नेहा लिमये 


#मराठीभाषा ४५- आमंत्रण आणि निमंत्रण

आमंत्रण आणि निमंत्रण
आ व नि हे उपसर्ग मंत्रण् ह्या पदाला लागून हे उपसर्गघटित शब्द तयार झाले आहेत. आ हा उपसर्ग येणे या अर्थी व नि हा उपसर्ग प्रवेशणे, गुंतवणे, आत असणे या अर्थी वापरला जातो. सूक्ष्म अर्थच्छटा असणारे हे उपसर्गघटित शब्द आहेत.


मंत्र - सल्ला देणे, आमंत्रण/निमंत्रण - इथे आवाहन केल्याचा अर्थ. 
नि + मंत्र = विशिष्ट एका माणसाला मानपूर्वक आवाहन/ invitation.
आ- उपसर्ग = चौफेर.

आमंत्रण हे अनौपचारिक (informal) असते म्हणजे दिलेल्या वेळेच्या मागे /पुढे गेले किंवा नाही गेले तरी चालते.

निमंत्रण हे औपचारिक (formal) असते, दिलेल्या वेळेला जाणे, वेळ पाळणे अपेक्षित असते.

पण सध्याच्या काळात हे दोन्ही सारख्याच अर्थाने वापरले जातात.


बाबाराव मुसळे सरांशी चर्चा करताना अजून 2 मुद्दे समोर आले-

१. निमंत्रण हे मान्यवर व्यक्तींना तर आमंत्रण म्हणजे सार्वजनिक, सर्वांना सरसकट दिले जाते.


२. दोन ग्रामीण शब्द आहेत -

पहिला शब्द आवतन. हे वारकाहाती (म्हणजे न्हाव्याहाती) सरसकट गावमंडळींना दिलं जातं.

दुसरा शब्द निवता (नौता वरून आलेला असावा)-हे काही खास घरी दिले जाते. आणि ते कार्यक्रम असणाऱ्याच्या घरच्या बायका ज्यांना निवता द्यायचा त्या घरच्या बायकांना कुंकू लावून देत. काही ठिकाणी वारकालाच सांगितले जायचे. तो त्या घरांसमोर जाऊन 'चुलबंद निवता हाये बाई 'असं ओरडून सांगतो.

काही ठिकाणी तशा घरी करदुडा देण्याची पद्धत आहे. करदुडा मिळाला म्हणजे त्या घरच्यांनी समजून घ्यायचे.


यावरूनही आमंत्रण सरसकट आणि अनौपचारिक, तर निमंत्रण औपचारिक आणि विशिष्ट व्यक्तींसाठी असे म्हणता येईल असे वाटले.

या विषयाशी निगडीत अजून काही वाचकांच्या प्रतिक्रिया आणि माहिती -
१. खानदेशात देतात - छाप च असतो चुलीस निवत आणि दुसरी पद्धत म्हणजे अक्षदा दिल्या की सुपारी द्यायची पद्धत सुपाऱ्या मोजून किती घर पूर्ण येणार हे लक्षात येई
२. तसेच मूळ पाठवतात बहिणीला - म्हणजे यायचा खर्च असतो दिलेला आणि अक्षदा किंवा टोकन मनी म्हणूया तसंमूळ घेऊन जातो तो मुर्हाळी. यावर गावाकडे खूप लोकगीतं आहेत. हे मूळ जसे बहिणीला दिले जाते तसेच घरी लग्न असेल तेव्हा जवळच्या नातेवाईक बायकांना सुद्धा मूळ देण्याची पद्धत आजही आहे. आज तर मुळांची संख्या प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. हजार, बाराशे. ...कितीही. आपापल्या ऐपतीनुसार.

इथे मूळ देताना काही वर्षापुर्वी खोबऱ्याचे दोन कुटके गुळाने चिकटवून त्यावर करदुड्याचा दोरा गुंडाळला जाई. याला मूळ म्हटलं जाई. आता ते मागं पडलं. मूळ पत्रिका छापतात. किंवा पत्रिकेवरच मूळपत्रिका असं लिहितात.


यावरून भुलाबाईचं एक गाणं आहे "सासूबाई-सासूबाई मला मूळ आलं आता तरी धाडा ना...धाडा ना.


मूळ लावणं आणि मुऱ्हाळी जाणं असेही शब्द आहेत.नाशिक, नगर भागात वापरतात.


मूळ लावणं म्हणजे घरातील स्त्री सह सगळ्या कुटुंबाला निमंत्रण , जे फक्त अति जवळच्या नातेवाईकांसह आप्तेष्टांना असतं आणि मुऱ्हाळी म्हणजे सासुरवासीनी मुलीला सासरहून आणन्यासाठी आणि परत पाठविण्याकरता जाणारी माहेरची व्यक्ती. हे दोन्हीही शब्द मराठवाड्यातही प्रचलित आहेत.


हादग्याच्या गाण्यात हे "मूळ" येते. "सासूबाई सासूबाई मला आलं मूळ| मला काय पुसतेस बरीच दिसतेस पूस जा आपल्या सासऱ्याला||"


पोळ्याचे आदले दिवशी वर्हाडात आजोबा बैलाच्या मानेखाली तुप चोळून म्हणायचे -'आज आवतन घ्या ,उद्या जेवायला या.' दुसरे दिवशी बैलाला पुरणपोळी खाऊ घातली जायची. बैलाच्या तोंडाखालच्या सैल भागाला पोळी म्हटले जायचे.


३. गोंदिया वगैरे भागात निमंत्रणाला निमंत्रण हांडी हटका म्हणतात. हांडी म्हणजेभांडी त्या दिवशी हटकून म्हणजे उबडी अर्थात सगळ्या घराला जेवायला असतं .


४. चंद्रपूर भागात आवतन हा शब्द बोलीत प्रसिद्ध आहे. चुलीला आवतन आहे . असा निरोप असेल तर सगळं कुटुंब जेवायला बोलावलं आहे असं समजतात.


- नेहा लिमये




#मराठीभाषा ४४- आव्हान / आवाहन

आव्हान - स्पर्धेसाठी आमंत्रण देणे
आवाहन - आमंत्रण, पाचारण, बोलावणे, पुकारा, साद घालणे किंवा मंत्रोच्चारण करून देवतेला मूर्ती प्रवेशासाठी बोलावणे

जसे-
उद्याच्या लढतीसाठी त्याच्यासमोर विश्वविजेत्याचे 'आव्हान' होते.
गांधीजींनी जनतेला अहिंसेचा मार्ग अनुसरण्यासाठी 'आवाहन' केले.

-नेहा लिमये 


#मराठीभाषा ४३- तत्सम, तद्वत, परि, वाणी

तत्सम = त्यासारखा
या शब्दाचा जो अर्थ बाईंनी सांगितला, तत्सम अर्थच त्या कोशामध्ये दिलेला आहे.
तद्वत= त्याप्रमाणे
लोकशाहीत ज्याप्रमाणे हिंसाचार खपवून घेतला जाऊ नये, तद्वतच भ्रष्टाचारही !
परि= प्रमाणे, सारखा
स्फटिकापरि निर्मळ हा खळखळ झरा वाहतो
वाणी= सारखा
सोलून कोरफड, पाण्यात धुता साफ ।
बर्फ हो आपोआप, काचेवाणी ।।

- नेहा लिमये 

#मराठीभाषा ४२- तारतम्य बाळगणे

तारतम्य बाळगणे

तारतम्य - धोरण, सारासार विचार.
तरतमभाव - पात्रापात्रभाव. सरस-नीरस यांतील फरक.
तारतम - अतिथी सत्कार

"बोलताना काही तारतम्य बाळगशील की वाट्टेल ते बोलत सुटशील?" असे आपण नेहेमीच ऐकतो.

यातील "तारतम्य" हा शब्द "तर" आणि '"तम" यावरून आला आहे. "तर-तम" हे कमी-अधिक दर्शवतात. 

यावरून चांगल्या-वाईटाचा, कमी-अधिक असण्याचा, आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करून बोलणे किंवा वागणे.

- नेहा लिमये 
(संदर्भ: शब्द-चर्चा - मनोहर कुलकर्णी  आणि विस्तारित शब्दरत्नाकर)


रुबरू

ख्वाबोका एक काफ़िला
कभी मैनेभी सरमाया था
बंद मुठ्ठीमे रेत लेकर
वक्तके हांथो थमाया था

सुनेपनमें एक चिराग
कभी मैनेभी जलाया था
दबीसी एक सांस को
खुली हवासे मिलाया था

दुवाओंका एक मंजर
कभी मैनेभी बनाया था
गुजरे हुए एक लमहेको
कलके यकीनसे मिलाया था

मेरा न था जो कुछ वो
कभी मैनेभी अपनाया था
खुलीसी एक किताबको
दिलकी स्याहीसे सजाया था

गिला ना था कभी किसीसे
कभी मैनेभी ये बताया था
आईनेसे रुबरू होकर फिर
जिंदगीका गीत गाया था

- नेहा लिमये 

#मराठीभाषा ४१ - परीक्षा

परीक्षा = परि + ईक्षा = इ + ई = (दीर्घ) ई , म्हणून 'परीक्षा'. 'परिक्षा' नव्हे.

याचप्रमाणे, निरीक्षण, अधीक्षक, परीक्षक, प्रतीक्षा, समीक्षक, वगैरे.

प्रतिक्षा, समिक्षा, निरिक्षक हे चूक.

- नेहा लिमये 
(संदर्भ : शुद्धलेखन प्रदीप - मो रा वाळिंबे )


#मराठीभाषा ४०- संहिता

संहिता
संहिता हा वैदिक साहित्यातील प्रमुख खंड मानला जातो. यात देव-देवतांच्या यज्ञाच्या वेळी स्तुतीपर काव्य / मंत्र आहेत. चार वेदांसाठी चार संहिता आहेत- ऋग्वेद संहिता, यजुर्वेद संहिता, अथर्ववेद संहिता आणि सामवेद संहिता.
म्हणूनच पूर्वापार संग्रहीत साहित्य किंवा आचार-नियम या संबंधित साहित्याला "संहिता" म्हणतात.
जसे - भारतीय दंड संहिता, आचार संहिता, चरक संहिता (आयुर्वेदातील नियमावली)
नाटक लिहितानाही त्यातील पात्रे, प्रसंग, स्थळ-काळ, संवाद इत्यादी नियमावलीचा समावेश असतो म्हणून ती नाटकाची 'संहिता'.
- नेहा लिमये 
(संदर्भ : शब्द-चर्चा - मनोहर कुलकर्णी )


#मराठीभाषा ३९-सूतोवाच करणे

सूतोवाच करणे
मूळ वाक्य 'सूत: उवाच'. पूर्वीच्या काळी सूत जातीचे लोक गावोगावी जाऊन अनेक कथा, रामायण/ महाभारत ग्रंथांमधील वर्णन सांगत. यामुळे प्राचीन कथांमध्ये प्रारंभी "सूत म्हणाला, सूताने सांगितले" असे उल्लेख येतात.
पुढे यातला विसर्ग ( : ) लोप पावला आणि "सूतोवाच" म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे किंवा प्रारंभ करणे असा अर्थ रूढ झाला.

- नेहा लिमये 
(संदर्भ : शब्द-चर्चा- मनोहर कुलकर्णी )


#मराठी भाषा ३८ -अनुस्वार आणि शिरोबिंदू

अनुस्वार आणि शिरोबिंदू 

आपल्या वर्णमालेतील व्यंजनांचे सहा गट पाडले आहेत. त्यातील पहिल्या पाच गटांना ( क च ट त प) नाकातून उच्चार करण्यासाठी शेवटचे व्यंजन दिले आहे.
जसे - क गटाला ड़्, त गटाला न वगैरे
ज्या अक्षराचा उच्चार नाकातून करायचा त्याच्या डोक्यावर आपण ं हे चिन्ह देतो त्याला 'अनुस्वार' म्हणतात. अनुस्वार दिलेल्या अक्षरातून कोणते अक्षर उच्चारायचे, हे त्यानंतर येणाऱ्या अक्षरावर अवलंबून असते.
जसे - 'अंगण' मध्ये 'अं' हे अक्षर नाकातून म्हणायचे आहे, त्यापुढील अक्षर 'ग' जे 'क' गटातले आहे. म्हणून उच्चार 'अड़्गण' होतो.
सांबार मध्ये ब असल्याने उच्चार 'साम् बार' असा होतो
पण काही वेळा उच्चार नाकातून नसला तरीही अक्षराच्या डोक्यावर टिम्ब दिलेले असते. विशेष करून प्रमाण भाषेखेरीज इतर लेखनात म्हणजेच बोली भाषा वापरताना अक्षराच्या डोक्यावर टिम्ब दिलेले असते. त्याला 'शिरोबिंदू' म्हणतात.
जसे - मुलं , फुलं, कुठूनसं, पडलं, वगैरे

- नेहा लिमये 
(संदर्भ : लिहावे नेटके - माधुरी पुरंदरे )



#मराठीभाषा ३७ - ऋ , रू, श्रु

'ऋ' आणि 'रू'
ऋ या स्वरात ऐकू येणाऱ्या 'र' मुळे फसगत होऊन अनेकदा चुकीने त्याचे जोडाक्षर होण्याचा धोका असतो.

'ऋ' हा स्वर मिसळून तयार झालेले अक्षर आणि 'रू' हे व्यंजन जोडून बनलेले जोडाक्षर यातील फरक-

स्वर मिसळून तयार झालेले अक्षर-
क् + ऋ = कृ - कृपा, कृती, कृष्ण
ग् + ऋ = गृह, जागृती
स् + ऋ = सृष्टी
ब् + ऋ = बृहस्पती
त् + ऋ = तृप्ती, तृष्णा

आता व्यंजन जोडून झालेले जोडाक्षर-
क् + रू = क्रूर
ब् + रू = अब्रू
त् + रु = त्रुटी
श् + रू = अश्रू

श्रु
श् या व्यंजनामध्ये र् मिसळला की श्र होतो...जसे प्+र् = प्र, तसे श् + र् = श्र..इथे श्र मधील वरची गाठ ही अर्धा श आहे तर खालील तिरकी रेघ ही अर्धा र आहे. हा झाला श्र. आता ह्याला उकाराचे -हस्व चिह्न लागून हा होतो श्रु -श्रुती.

- नेहा लिमये 
(संदर्भ - मराठी लेखन कोश - अरुण फडके )


#मराठीभाषा ३६ - हतबुद्ध होणे

हतबुद्ध होणे
हत म्हणजे आघात झालेली/ जवळ जवळ नष्ट झालेली.
हतबुद्ध = ज्याची बुद्धी म्हणजे विचार करण्याची शक्ती नष्ट झाली आहे असा.
हतबुद्ध होणे = एखाद्या परिस्थितीवर किंवा संकटावर काहीही उपाय न सुचल्याने निराश होणे
असेच-
हतोत्साह = ज्याचा उत्साह नाहीसा झाला आहे असा

हतवीर्य = ज्याचे शौर्य नाहीसे झाले आहे असा

- नेहा लिमये 
(संदर्भ : शब्द-चर्चा - मनोहर कुलकर्णी )


#मराठीभाषा ३५-अथपासून इतिपर्यंत

अथपासून इतिपर्यंत
प्राचीन ग्रंथ किंवा संस्कृत स्तोत्रे पाहिल्यास त्यांचा आरंभ 'अथ' पासून होतो आणि शेवट 'इति' पासून होतो.
जसे - अथ: श्री गणेशपुराणम् प्रारभ्यते
आणि - इति श्री मारुतीस्रोत्रम् संपूर्णम्
त्यावरून - 'सुरुवातीपासून शेवटपर्यंत' असा अर्थ रूढ झाला.
उदा. एकदा ती काही सांगायला लागली की अथपासून इतिपर्यंत सांगणारच; तिला नेमके बोलताच येत नाही.

- नेहा लिमये 
(संदर्भ : शब्द-चर्चा - मनोहर कुलकर्णी )


#मराठीभाषा ३४- सुकर, सुगम, सुलभ

सुकर = करायला सोपे
सुगम = समजायला सोपे (गम् म्हणजे समजणे)
सुलभ = मिळायला/ लाभायला सोपे (लभ् म्हणजे लाभणे, प्राप्त होणे)
यात 'सुकर' चा उच्चार करताना र पूर्ण उच्चारावा, कुकर सारखा उच्चारू नये. 
तसेच सुगम , सुलभ सुद्धा.

- नेहा लिमये 
(संदर्भ : शब्द-चर्चा -मनोहर कुलकर्णी )


#मराठीभाषा ३३ - शुद्धलेखन

शुद्धलेखन
या शब्दात द् + ध् + अ = द्ध अशी रचना आहे. परंतु बरेचदा 'द' ला 'ध' न जोडता 'ध' ला 'द' जोडून, 'शुध्दलेखन' असे लिहिले जाते, जे बरोबर नाही.
मूळ धातू शुध् आहे. त्याला 'त' हा धातू प्रत्यय लागून विशेषण तयार होते - शुध् + त = शुध् + ध् = शुद् + ध= शुद्ध.
याचप्रमाणे - युद् - युद्ध, सिध्- सिद्ध, विध् - विद्ध
तसेच, श्रद्धा, सुद्धा, पद्धत, वगैरे
जास्त स्पष्टता येण्यासाठी 'शुद् ध' असेही लिहितात.*

- नेहा लिमये 
(संदर्भ - शुद्धलेखन प्रदीप -मो रा वाळिंबे आणि मराठी लेखन कोश -अरुण फडके )

*टीप : शेवटच्या ओळीत द् आणि ध मध्ये जी जागा आहे ती न सोडता लिहावे. की बोर्ड वर ती सोय नसल्यामुळे तसे लिहिले आहे.

#मराठी भाषा ३२- श / ष


'श' च्या उच्चाराच्या वेळी जिभेचे टोक तालूला लागते. (तालव्य वर्ण)
'ष' च्या उच्चाराच्या वेळी जिभेचे टोक किंचित वळून तालूच्या घुमटाकार पडद्याच्या मध्यभागी लागते. (मूर्धन्य वर्ण )
फारसी भाषेत 'ष' नसल्यामुळे 'श' वापरला जातो.

त्यामुळे उच्चार लक्षात ठेवून तसे लिहावे-
'श' चे शब्द - इशारा, खुशाल, पोशाख, विशद, हुशार
'ष' चे शब्द - विषय, रेषा, षट्कोन, विषाद, शुश्रूषा, भाषा

- नेहा लिमये 
(संदर्भ : शुद्धलेखन प्रदीप -मो रा वाळिंबे )


#मराठीभाषा ३१- स्र/ स्त्र


स्र = स् + र् + अ = स् + र
उदा. सहस्र, स्रोत, हिंस्र, चतुरस्र, अजस्र, स्रवणे
स्त्र = स् + त् + र् + अ = स् + त्र
उदा. स्त्री, वस्त्र, शास्त्र, अस्त्र, शिरस्त्राण

स्र व स्त्र यांच्या लेखनाप्रमाणे उच्चारातही फरक आहे, हे लक्षात घ्यावे व त्याप्रमाणे उच्चार करावेत. म्हणजे आपोआप लेखनही त्याप्रमाणे होते. विशेषतः स्र चा उच्चार -- इंग्रजी sra प्रमाणे.

- नेहा लिमये 

(संदर्भ : मराठी शुद्धलेखन प्रदीप -मो रा वाळिंबे )


Thursday, October 25, 2018

रे मना............

रे मना............

ऐकशील का एवढे ?
सतत "अहं"चे पोवाडे
नसलेल्या जखमांचे कण्हणे
पर दुखः शीतल
आणि "स्व" चे रडगाणे 

बाकी जनांचा उपहास
भावनांचा परिहास
आणि फक्त
"मी" चा अट्टाहास

"माझ्या" आकांक्षा, इच्छा
"माझे" मान - अपमान
"माझाच" शब्द
आणि "माझीच" सत्ता 

कधी संपवशील सारे
आणि सोडशील दुराग्रह
"माझेच खरे" करण्याचा

ऐकशील का एवढे
तुझ्या संवेदना वेदनांत बदलण्याआधी ?
तुझ्या अवकाशात अंधाराने घर करण्याआधी?
बाकीच्यांना संपवताना
तुझाही "स्व" संपण्याआधी ????


ऐकशील का एवढे ...................

- नेहा लिमये 

#मराठी भाषा ३० - सृजन/ सर्जन

संस्कृत मधील 'सृज्' या धातूला 'अन' हा प्रत्यय लागताना त्यातील '' चा गुण 'अर' होतो आणि 'सर्जन' ( निर्माण करणे) असे रूप होते. यानुसार सर्जन, सर्जनशीलता, विसर्जन ही रूपे शुद्ध.

सृजन, सृजनशीलता ही रूपे अशुद्ध आहेत.

अशाच काही इतर धातूंची रूपे पाहिल्यास हे लक्षात येते-
वृध - वर्धन
वृत - वर्तन
नृत - नर्तन
कृत - कर्तन
दृप - दर्पण

- नेहा लिमये 
(संदर्भ: शुद्धलेखन प्रदीप - मो रा वाळिंबे )

#मराठी भाषा २९ - चिकटणे/ चिटकणे


मूळ शब्द "चिकट" असा आहे. म्हणजेच एखाद्या गोष्टीशी घनिष्ठ संबंध आल्यास तशाच स्थितीत राहणारी, अलग होणारी अशी गोष्ट किंवा तिचा गुणधर्म.
म्हणून "चिकटणे", "चिकटवणे" हे योग्य.
"चिटकणे", "चिटकवणे" अयोग्य.

चिक - चिकट - चिकटा - चिकटणे - चिकटवणे ..ही प्रमाण मराठी भाषेतील रूपे आहेत.
मराठी लेखन-कोशातील संदर्भानुसार चिटकवणे अयोग्य आहे. बोलभाषेच्या संवादामध्ये किंवा काही बोलींमध्ये चिटकवणे असा शब्द वापरला जातो. आपण कोणत्या पद्धतीचे लेखन करत आहोत (प्रमाण की बोली) किंवा संवाद करत आहोत यावर अवलंबून असते.
प्रमाण भाषेचा आग्रह बोलीत धरता येत नाही. (परंतु त्यामुळेच गोंधळ होतात.)

- नेहा लिमये 
(संदर्भ: मराठी लेखन कोश - अरुण फडके )





#मराठीभाषा २८ - साग्रसंगीत


पूर्वीच्या काळी नाटक सुरू होण्याआधी गायन-वादन-नृत्य (संगीतकम्असायचे

अगदी आजही राजकीय किंवा इतर कार्यक्रमांच्या आधी श्रोत्यांना आकृष्ट करुन घेण्यासाठी 
असे कार्यक्रम असतात.

  (सह) + अग्र (आधीसुरुवात) + संगीत = अशा संगीतासह असलेले असे.

 साग्रसंगीत जेवणसाग्रसंगीत पूजा म्हणजे सगळे उपचार पाळून केलेली गोष्ट याअर्थी हा शब्द वापरला जातो.

नेहा लिमये