Search This Blog

Friday, June 26, 2020

बाष्कळ, इरेस घालणे, गोषवारा, हरताळ

बाष्कळ


तुझी बाष्कळ बडबड आता पुरे झाली!’ किंवाहा बाष्कळपणा आम्ही किती काळ सहन करायचा?’ अशासारख्या वाक्यांमधून वापरला जाणाराबाष्कळहा शब्दनिरर्थकया अर्थाचा आहे.

पण निरर्थकतेला बाष्कळपणा का म्हणायचे?

ऋग्वेद हा ग्रंथ मुखोद्गत करीत असताना त्यात गुरुपरत्वे काही भेद होत होत ऋग्वेदाच्या काही शाखा निर्माण झाल्या. शाकल शाखा आणि बाष्कल शाखा अशा दोन वैदिक संहितेच्या शाखा होत्या.बाष्कल या नावाच्या एका ऋषींच्या नावाने ऋग्वेदाची ही शाखा बाष्कल शाखा म्हणून प्रसिद्धीला आली.

ऋग्वेदाचे केवळ पठण करणारांना त्या पठणाचा अर्थ कालपरत्वे समजेनासा झाला. त्यात बाष्कल शाखेच्या शिष्यांचा कदाचित लवकर समावेश झाला असेल. त्यामुळे त्यांचे पठण म्हणजे निरर्थक बडबड असे लोक समजू लागले असावेत. अशी कोणत्याही विषयातील निरर्थक बडबड म्हणजे बाष्कळपणा झाला.


या प्रकारे बाष्कळ या शब्दाची अशी व्युत्पत्ति सांगितली जाते.खरे म्हणजे मूळच्या बाष्कल ऋषीवर त्याच्या शिष्यांमुळे झालेला हा केवढा घोर अन्याय आहे !!!


(संदर्भ: मराठी व्युत्पत्ति कोश- कृ पां कुलकर्णी आणि  शब्द-चर्चा- मनोहर कुलकर्णी)


ईरेस /इरेस घालणे/ पडणे/ ईरपिर


मूळ संस्कृत शब्द ईर म्हणजे शक्ती, जोर, चुरस,ईर्ष्या

बुद्धिबळाच्या खेळात राजाला दुसऱ्याच्या मोहऱ्याचा शह लागू पडू नये म्हणून आपले एक मोहरे किंवा प्यादे देणेकिंवा

किल्ल्याचा वगैरे दरवाजा फोडताना त्याला असलेले लांब लांब खिळे हत्तीच्या धडकेबरोबर त्याच्या कपांळात शिरू नये म्हणून एक रोडकासा उंट मध्ये घालीत. म्हणजेच, इप्सित कुठल्याही प्रकारे साध्य करण्यासाठी/ स्वतःच्या बचावासाठी दुसऱ्याला पुढे घालणे (इथे स्वतःची शक्ती पणाला लावायची गरज नसते) तसेच इरेस पेटणे किंवा इरेस पडणे/चढणे म्हणजे चुरस लावून, पूर्ण शक्तीनिशी पुढे सरसावणे.

 

ईरचा दुसरा अर्थ जिच्या अंगात आले आहे अशी व्यक्ती. यावरून ईर शिरणे म्हणजे बेभान होणे, स्वतःवरचा ताबा सुटणे.

ईरपिरपिर/पीर हा फारसी शब्द आहे. शब्दशः पीर म्हणजे म्हातारा मनुष्य. पण इथे अनुभवी मनुष्य असा अर्थ घेतल्यास अफाट, उद्योगी धाडसी मनुष्य
उदा. मोठमोठाले ईरपिर हा गुंतागुंतीचा प्रश्न सोडविताना थकून गेले, पण हा इसम काही औरच आहे.


(संदर्भ: विस्तारित शब्दरत्नाकर आणि मराठी भाषेचे संप्रदाय म्हणी - वा. गो. आपटे)


गोषवारा


मूळ शब्द फारसी गोशवारा आणि मूळ अर्थ जमीनदारी पद्धतीतील खातेवही.

प्रत्येक खात्यावर असणाऱ्या नोंदीचे केलेले संक्षिप्त एकत्रित असे टांचण, त्यावरून सारांश किंवा मुख्य गोष्ट असा अर्थ.


(संदर्भ: मराठी व्युत्पत्ति कोश- कृ. पां. कुलकर्णी)


हरताळ


हरताळ म्हणजे एक पिवळा विषारी पदार्थ.

पूर्वी हस्तलिखिते लिहिताना चुकीचा शब्द खोडावयाचा असेल तर हा पदार्थ लावून खोडत असत, त्यावरून हरताळ फासणे/ हरताळ लागणे हे शब्दप्रयोग रूढ झाले.

कानडीत हरदु म्हणजे व्यापार किंवा उदीम आणि तळवू म्हणजे बंद करणे, दिरंगाई करणे. तसेच गुजराती भाषेत 'हाडताल' आणि हिंदीत 'हाटताल' म्हणजे बाजारबंदी.

फारसी भाषेत हर म्हणजे घरातील मधला भाग किंवा माजघर आणि ताला म्हणजे कुलूप.

मराठी भाषेत हरताळ करणे हा शब्दप्रयोग निःशस्त्र प्रतिकाराच्या चळवळीपासून ( १९२९) फार उपयोगात आणला जाऊ लागला. हिंदी, गुजराती आणि फारसीचा आधार घेऊन, हरताळ करणे/ पडणे म्हणजे दुकाने बंद ठेवणे आणि हरताळ लावणे म्हणजे रद्द करणे, असे अर्थ रूढ झालेयाखेरीज, कुणी मोठा मनुष्य (राजा वगैरे) मेला असता नगरातले सगळे व्यवहार लोक स्वखुशीने किंवा सरकारी हुकुमाने बंद ठेवत त्यावरूनही हरताळ पडणे असे म्हणले जायचे.


(संदर्भ: मराठी व्युत्पत्ति कोश- कृ पां कुलकर्णी आणि मराठी भाषेचे संप्रदाय म्हणी- वा गो आपटे)


लेखन आणि संकलन - नेहा लिमये