Search This Blog

Wednesday, June 24, 2020

दिवाळ, दिवाळी, पल्लवित, पाल्हाळ, गोम, सोम्या-गोम्या

दिवाळ/दिवळी/दिवाळी/ दिवाळे

 दिवाळ - मूळ फारसी शब्द दिवार किंवा दिवाल - म्हणजे भिंत

दिवळी - कोनाडा

दिवाळी - मूळ शब्द संस्कृत मधील- दीपावली (दीप + आवली) - दिव्यांची रांग/ओळ

दिवाळे - नादारी, लोकांचे देणे.


जो नादार झाला आहे तो आपल्या घरात/ दुकानात/ खिडकीत शेणाचा दिवा लावून ठेवून तिथून निघून जात असे. दिव्याच्या शेजारी हिशेबाच्या वह्या ठेवीत असे. तो गेल्यानंतर त्याचे धनको येत आणि त्याच्या वह्या पाहून त्याला ऋण परत करण्याचे सामर्थ्य नाही असे समजत. यावरून हा शब्द रूढ झाला असे मानतात

यावरून - हिंदीत दियालिया आणि मराठीत दिवाळखोर म्हणजे दिवाळे काढणाराउधळ्या या अर्थाचे शब्द आहेत.


- नेहा लिमये
(संदर्भ: मराठी व्युत्पत्ति कोश - कृ. पां. कुलकर्णी)

 

पल्लव / पल्लवित/ पाल्हाळ

पल्लव या संस्कृत शब्दाचा अर्थ अंकुर, पाने. यावरून तयार झालेले शब्द-

पालव - उपरणे, पदर, ओढणी

पालवणे/ पालेजणे- अंकुर फुटणे, पालवी फुटणे, मोहरणे, विस्तार करणे

पल्लवी - नव्या पालवीने युक्त

पल्लवित- विस्तृत

पालिवण/ पालेवन - पाल्याची झोपडी (पल्लव + अयनम्)

पाल्हेजणे - पालवी फुटणे, विस्तार होणे, पसरणे - यावरून पाल्हाळ म्हणजेच निरर्थक लांबड, विस्तार, पसारा.

 

(संदर्भमराठी व्युत्पत्ति कोशकृपांकुलकर्णी आणि विस्तारित शब्दरत्नाकर - वागोआपटे , भावे)

 

गोम /गोमा /गोमाजीपंत/सोम्या-गोम्या

गोम हा सरपटत जाणारा एक कीटक आहे'त्याच्या वागण्यात काहीतरी गोम आहे' असे म्हणतात, तेव्हा त्यात काहीतरी दोष आहे, वैगुण्य आहे असा अर्थ अभिप्रेत असतो

घोड्याच्या पाठीवर गोमेच्या आकाराची केसांची वळी असते, हा एक दोष समजतात. याला कानडीत 'गोमु' शब्द आहे त्यावरून गोम हा शब्द रूढ झाला.

 

गोमा /गोमाजीपंत/सोम्या-गोम्या

हैदराबादेत गोमा नावाचा एक चतुर भिकारी होता. त्या काळी बादशहाच्या राज्यात फार अंदाधुंदी असे आणि वर्षानुवर्षे दरबारात कशाचीही दाद लागत नसे. या भिकाऱ्याने वेशीच्या बाहेर कचेरी मांडली आणि जकात घ्यायला सुरुवात केली. हा बादशहाचा हुकूम आहे असे सांगत तो वसुली करत असे आणि ते करताना मोठ्या बढाईने पावतीवर आपला शिक्का 'गोमा गणेश पितळी दरवाजा' असा देत असे. यात पुष्कळ लोक फसले आणि अखेर तो बढाईखोर भिकारी असल्याचे उघडकीस आले. यावरून, गोमाजी, गोमाजीपंत, सोम्या-गोम्या म्हणजे कुणीतरी व्यक्ती, ढोंगी माणूस अशा अर्थाने हे शब्द रूढ झाले.

(संदर्भ: मराठी व्युत्पत्ति कोश -कृ पां कुलकर्णी आणि मराठी भाषेचे संप्रदाय म्हणी - वा गो आपटे)

लेखन आणि संकलन - नेहा लिमये 

No comments: