Search This Blog

Wednesday, June 24, 2020

मेख, भाऊगर्दी, खटाटोप, अभीष्टचिंतन

मेख

 मेख म्हणजे खुंटी - लाक्षणिक अर्थाने बारीकसा मुद्दा/खोच/गूढ

यावरून

मेख मारणे- अडकवून ठेवणे, काम थांबवणे
मेख बसणे - अडकून बसणे, काम थांबणे
मेख ठेवणे - एखाद्या करारात खोच किंवा अट ठेवणे
मेख घेणे - वेठीस धरून काम करून घेणे
मेखा घेणे - सूड घेणे
मेखा उचटणे/उपटणे - ताबडतोब घालवून देणे
तुकाराम बुवाची मेख - सुटणारे कोडे - तुकारामबुवांच्या काही अभंगात असा काही गूढ अर्थ भरला आहे की तो कुणालाच निश्चयपूर्वक उकलता येत नाही.

 (संदर्भ: मराठी व्युत्पत्ति कोश -कृ पां कुलकर्णी आणि मराठी भाषेचे संप्रदाय म्हणी - वा गो आपटे)


भाऊगर्दी /भाऊ/भाई

संस्कृतमधील भ्रातृ या शब्दावरून 'भाऊ' शब्द तयार झाला.

सदाशिवराव पेशवे यांना 'भाऊ' संबोधण्यात येत असे. पानिपतची लढाई चालू असताना एकदा 'भाऊ' घोड्यावरून उतरुन लढाईत घुसल्यानंतर सर्व रणक्षेत्रावर धुमाळी माजली. यावरून भाऊगर्दी म्हणजे अतिशय निकराचे युद्ध असा अर्थ. गर्दीच्या ठिकाणी गोंधळ माजल्यास 'भाऊगर्दी झाली' असे म्हणतात.

 'भाऊ' शब्दावरून इतर काही शब्द -

भाऊबंद - नातेवाईक
भाऊबंदकी - भावा-भावातले वितुष्ट
भाऊबळ - भाऊबंदाच्या क्रमाने वतनाचा प्राप्त होणारा हिस्सा
भाऊबीज - कार्तिक शुद्ध द्वितीया - यमद्वितीया - या दिवशी बहीण भावाला ओवाळते
भाईचारा - सलोख्याचे संबंध
भावोजी/भाऊजी - दीर

 (संदर्भ: मराठी व्युत्पत्ति कोश -कृ पां कुलकर्णी आणि मराठी भाषेचे संप्रदाय म्हणी - वा गो आपटे)


खटाटोप

खटाटोप या शब्दाची उगमकथा रंजक आहे. 'फटाटोप' या शब्दापासून पुढे 'खटाटोप' असा अपभ्रंश होऊन हा शब्द मराठीत आला असे सांगतात.

 मूळ संस्कृत श्लोक असा-

निर्विषेणापि सर्पेण कर्तव्या महति फणा |
विषमस्तु चाप्यस्तु फटाटोपो भयंकर: ||

 या श्लोकाचा शब्दशः अर्थ असा की विष नसलेल्या सापाने सुद्धा (स्वसंरक्षणार्थ) विषारी सापाचे अनुकरण करावे कारण विष नसलेल्या सापाने नुसता फटाटोप केला (फणेचा विस्तार केला) तरी तो लोकांना भयप्रद होतो.

या संदर्भात एक कथा सांगितली जाते ती अशी-
एकदा एक विषारी साप होता आणि तो जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना दंश करीत असे. जेव्हा हा प्रकार आदि शंकराचार्यांच्या कानावर गेला तेव्हा त्यांनी त्या सापाला लोकांना दंश करण्याची /त्रास देण्याची विनंती केली. काही दिवसांनी आदि शंकराचार्य तिथून जात असताना त्यांना दिसले की साप जखमी अवस्थेत आहे आणि त्याची फारच वाईट अवस्था आहे. त्यांनी त्याला कारण विचारले असता साप उत्तरला, "महर्षी, तुम्हीच मला लोकांना त्रास देऊ नको, दंश करू नकोस असे सांगितले होते. मी त्याप्रमाणे केले. परंतु जेव्हा लोकांना हे कळले की मी निरुपद्रवी आहे तेव्हा त्यांनी मला दगड मारण्यास, त्रास देण्यास सुरुवात केली.

त्यावर शंकराचार्यांनी त्याला सांगितले की "मी तुला दंश करू नकोस असे सांगितले होते, लोकांवर फणा वर काढू नकोस असे नव्हते सांगितले" या कथेचा परिपाक वरील श्लोकाच्या अर्थात दिसून येतो.यावरून खटाटोप म्हणजे सर्व बाजूनी जिवापाड केलेली खटपट, कार्य थोडे आणि खटपटीचे अवडंबर मोठे असा अर्थ रूढ झाला.

 (संदर्भ: मराठी व्युत्पत्ति कोश -कृ पां कुलकर्णी आणि मराठी भाषेचे संप्रदाय म्हणी - वा गो आपटे आणि संस्कृत सुभाषितमाला )

 

अभीष्टचिंतन

वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करणाऱ्या जाहिराती अनेक ठिकाणी झळकतातहा शब्द अभिष्टचिंतन, आभीष्टचिंतन असा लिहून चालणार नाही

अभीष्ट हा या शब्दातील घटक अभि+इष्ट या दोन भागांचा मिळून बनतो. भि मधीलआणि इष्ट मधीलएकत्र येऊन त्यांचाबनतो म्हणून अभीष्ट असे रूप प्राप्त होते.

इष्टदिशेने जाणारे, इच्छिलेले, कल्याणकारक असा याअभि+इष्ट'चा (म्हणजे अभीष्टचा) अर्थ आहे.

आपले चिंतन (म्हणजे मनातला विचार) असे इष्ट दिशेने जाणारे हवे, म्हणून अभीष्टचिंतन !

(संदर्भ : मराठी व्युत्पत्ति कोश - कृ पां कुलकर्णी आणि शब्दचर्चा - मनोहर कुलकर्णी)

लेखन आणि संकलन - नेहा लिमये

No comments: