Search This Blog

Tuesday, June 23, 2020

श्री माधवनाथांचा अनाहत नाद

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।

तेणे मुक्ती चारी साधियेल्या।।


या चरणामधल्या "चार मुक्ती" म्हणजे सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्य.


देवाचा लोक मिळणे म्हणजेच परमेश्वराचा निवास आहे त्या वैकुंठ लोकात भक्ताला जायला मिळते, ती त्याची सलोकता. देवाजवळ जायला मिळणे म्हणजे समीपता. देवासारखे रूप प्राप्त होणे म्हणजे सरूपता. आणि अखेरची मुक्ती म्हणजे सायुज्य म्हणजेच जोडणे. स्वत:चे वेगळे अस्तित्व संपवून भक्त जेव्हा त्या ईश्वरामध्ये पूर्णपणे मिसळून जातो तेव्हा ती असते त्याची सायुज्य अवस्था. पहिल्या तीन मुक्तींमध्ये भक्त ईश्वराहून वेगळा असतो. शेवटच्या सायुज्य अवस्थेत तो वेगळा उरतच नाही.  


या चारी मुक्ती ज्यांना साध्य होतात त्या व्यष्टीतून समष्टीकडे प्रवास करणाऱ्या व्यक्ती फक्त आपल्यापुरता विचार न करता जनकल्याणासाठी ईश्वरभक्तीचा मार्ग चोखाळतात. भजन , अभंग, पंचपदी, साकी -दिंडी, आरती अशा अनेकविध गायन प्रकारांमधून जगण्याचे सार सांगणाऱ्या माधवनाथ महाराजांसारख्या विभूती म्हणूनच अमर असतात. त्यांच्यालेखी संगीताला शब्द-सुरांच्या पलीकडचे स्थान असते. एक अशी जागा ज्यावर कुणाचीही मालकी नसते, कुठलेही बंधन नसते परंतु त्या निर्वात जागांशी असलेले अदृश्य बंध त्यांना जाणवतात. निसर्गाशी सुरांचा मेळ आणि ईश्वराचे स्वररूप अस्तित्व ते जाणून असतात. पूर्वजन्मीचे संचित असो व पैलतीराकडे नेणारे निधान; स्वरांची भाषाच इतकी ताकदीची असते की ती अंतरात्म्याला साद घालते, जन्म -मृत्यूमधल्या आयुष्याकडे वेगळ्या नजरेने वाहायला भाग पाडते आणि स्वतःच्या मनोव्यापारांमधून बंधमुक्त करून इतरांच्या पीडांकडे बघण्यासाठीची सहृदयता देते.    
 
भक्तीचे मार्ग अनेक असतात - कुणी ईश्वराचे नामस्मरण करेल, कुणी तासनतास कठोर तप करेल, कुणी कर्मयोग्याचे कर्तव्य पार पडेल तर कुणी  लौकिकाशी संबंध तोडून आत्मक्लेशाचा मार्ग पत्करेल. हे सगळे केल्यानंतरही मोक्ष-मुक्तीची दारे उघडतील असेही नाही. परंतु या सगळ्यांपेक्षाही आणखी एक मार्ग आहे ज्याला दैवी स्पर्श आधीच लाभलेला आहे तो म्हणजे संगीताचा मार्ग. रागदारी, संगीत शास्त्र, त्यातले बारकावे न समजताही या मार्गाने ईश्वराच्या घराचे दरवाजे उघडतात. अंतरात विशुद्ध भाव असेल, तर गळ्यातून नव्हे तर हृदयातून सूर उमटतात.  स्वरांचे अधिष्ठान लाभलेल्या जागी नेहमीच सकारात्मक स्पंदने जाणवतात. अशा ठिकाणी संत-विभूतींचे आगमन झाले आणि त्यांनी आपली सेवा रुजू केली तर ती जागा पावन तर होतेच पण शाश्वत असलेल्या सुरांनाही देवत्त्व प्राप्त होते.

आम्ही आळीकर । प्रेमसुखाची लेकरे ।।१।।
पायी गोविली वासना । तुच्छ केले ब्रह्मज्ञाना ।।२।।

'श्रीमाधवनाथ' दीपप्रकाशाच्या नवव्या किरणात माधवनाथ महाराजांच्या भक्तिपरायणतेची आठवण विशद केली आहे. लासूरला लक्षयानी देवीच्या मंदिरात साधू गंगागीरबुवांनी नाम भजनाचा थाट मांडला होता. हे पाहताच माधवनाथ महाराजांनी मृदंग वाजवायला घेतला आणि तुकाराम महाराजांचा हा अभंग गायला. त्या निर्मळ स्वरांनी सगळे वातावरण भारावून गेले आणि श्रोतृवृंद देहभान हरपून स्वरांमध्ये चिंब न्हाऊन निघाला. माधवनाथांच्या स्वरांमुळे अज्ञानाची रात्र संपून आनंदाची प्रभात भक्तगणांनी अनुभवली. 

दिसताना हा प्रसंग अतिशय साधा सोपा दिसतो. परंतु यात फार मोठा संदेश माधवनाथ महाराजांनी दिलेला आहे. भक्तीसाठी एक व्यक्ती देखील पुरेशी असते परंतु त्यातून मुक्ती अपेक्षित असेल तर त्यासाठी एक संप्रदाय लागतो, त्या संप्रदायाची एक सामायिक प्रार्थना लागते. प्रार्थनेत किती बळ असते हे महाराजांच्या ठायी असलेल्या दिव्या शक्तींचा अनुभव घेतेलेल्यांना ज्ञात आहेच. अशी प्रार्थना जेव्हा संगीतात गुंफलेली असते तेव्हा तिची शक्ती सहस्र् किरणांएवढी भारित असते आणि त्यातून निर्माण झालेली ऊर्जा भाविकांचे अंतःकरण अपार मायेने, क्षमेने भरून टाकते. कुठल्याही नकारात्मक भावनेचा तिथे शिरकाव व्हायला वाव नसतो. मग याप्रसंगी भक्तीत लीन झालेल्या भक्तांना माधवनाथ महाराज आपल्या सूक्ष्म रूपाने उपस्थित आहेत हे जाणीव झाली, तर त्यात नवल ते काय ? म्हणूनच त्यांच्यानंतरही कुठलाही खंड न पडता आजतागायत पूर्णारती सुरु असण्याला एक वेगळे महत्त्व आहे.   मी अदृश्य शक्ती खेळवून तुमचे करीन पालन । असे माधवनाथ महाराज सांगतात, ते उगीच काय? 

सुरांना शब्दरूप देऊन नाथमहाराजांसारखे सत्पुरुष भजन-अभंग गाऊन सत्संगात राहतात आणि इतरांना "श्रीनाथ -गीतांजली" रचण्याची प्रेरणा देतात. या गीतांजलीची आजपावेतो कितीतरी पारायणे झाली असतील, होत राहतील. नामस्मरणाला वाद्यवृंदाची जोड देऊन अनेक मुखांनी ईश्वराला, माधवनाथ महाराजांना भाकले असेल , त्यांच्या नामाचा जयघोष करत ब्रह्मानंदी टाळी लागली असेल, कुणाला माधवनाथ महाराजही त्या मेळाव्याचा एक भाग होऊन आनंदाने बेहोष होऊन नाचत आहेत असा भासही झाला असेल. सुरांची भाषा उमजायला आणि ईश्वराचे अस्तित्व जाणवायला अंतःकरण लागते, या महाराजांनी घालून दिलेल्या वहिवाटेवरून भक्तसमुदाय आनंदाने वाटचाल करीत आहे. 

कलियुगात जेथे षडरीपूंनी माणसाचे मनोधैर्य पावलोपावली ढळते, नैतिक- अनैतिकातली रेषा धूसर होते आणि अस्तित्वाच्या लढाईखेरीज दुसरा पर्याय उरात नाही, त्यात भजन, कीर्तन, नामसप्ताह यासारख्या सध्या, सरळ, सोप्या साधनांचा मनोबलासाठी फार उपयोग होतो. हे श्री माधवनाथ जाणून होते. म्हणूनच नागपुरातील खटींच्या वाड्यात वास्तव्यास असताना श्रीनाथांनी स्वतःच दर गुरुवारी पूर्णारतीच्या भजनाचा क्रम सुरु करून दिला. त्यांच्या आशीर्वादाने आजही तो क्रम अव्याहतपणे चालू आहे. श्री. रामचंद्र कुळकर्णी यांनी लिहिलेली श्रीनाथ- गीतांजली यातील पदे कुठल्याही सामान्य व्यक्तीला भावतील अशीच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे "तुका म्हणे भजन प्रमाण । काय थोरपण जाळावे ते ।।" किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्यानुसार "देखे मनुष्यजात सकळ । हे स्वभावता भजनशीळ ।। म्हणजेच सामूहिक ईश्वरसेवा केल्याने भक्तसमुदाय चारी मुक्तीचे पैस पार करू शकतात. 

भारतीय स्वरसंगीतात वेगळे काय सांगितले आहे. आहत नादांतून निर्माण झालेल्या स्वर-श्रुतीनी संगीत तयार होते जे कानांना ऐकू येते, डोळ्यांना त्यातील सौंदर्यस्थळे दिसतात आणि हृदयाला ते अत्यानंदाची अनुभूती देणारे ठरते. परंतु सृष्टीत एक असाही अनाहत नाद आहे जो नेणिवेत असतो. जाणिवेतून नेणिवेचा हा प्रवास भजन-कीर्तनासारख्या सत्संगातूनच प्राप्त होतो. ईश्वराच्या सान्निध्याचा हा अनाहत स्वर सगळी मानवी भावकिरणे भेदून आत्म्याला स्पर्श करतो. श्री माधवनाथांनी आपल्या जीवनकार्याचा आणि नंतरही या अनाहत नादाचा परिचय सर्वदूर पोचवला. 

श्रीनाथ गीतांजलीत म्हणल्याप्रमाणे 

करुणेची साउली माधवनाथ ।
त्या प्रभूचा बंधू भगिनींनो जयजयकार करूया ।
नाथांचे गुण गाऊ या हो या या ।।

श्रीनाथांच्या चरणी ही अल्पशी सेवा...माझी शब्दसुमनांजली !

- नेहा लिमये 

पूर्वप्रसिद्धी - श्री माधवनाथ संस्थान स्मरणिका - ऑक्टोबर २०१९ 

No comments: