Search This Blog

Showing posts with label पत्रमालिका -बुचाची फुले. Show all posts
Showing posts with label पत्रमालिका -बुचाची फुले. Show all posts

Friday, November 23, 2018

बुचाची फुले - एक प्रवास


"बुचाची फुले" ही पत्रमालिका बुक हंगामा संचालित "न लिहिलेली पत्रे" या फेसबुक पेजवर २०१७ आणि २०१८ दरम्यान दर शनिवारी प्रसिद्ध होत असे.  औरंगाबाद येथे झालेल्या 'दुसऱ्या नुक्कड डिजिटल साहित्य संमेलनात" लोकप्रिय मालिकेसाठी "बुचाची फुले"ला ज्येष्ठ साहित्यिक रा रं बोराडे यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. 

वाचकहो , 

जवळ जवळ दीड वर्षे चालू  असलेल्या या प्रवासाचा मी व्यक्तिशः खूप आनंद घेतला. 


ही पत्रमालिका लिहायला घेताना धाकधूक होती कारण इथे मध्यवर्ती सूत्र असे काही नव्हते
असलेच तर फक्त दोन जीवांचा आठवणींचा प्रवासत्यांच्यातले हितगूज होतेमग बुचाची फुले हेच नाव का?


तर, बालपणीपासून मी जिथे ज्या जागी गेले तिथे मला बुचाची झाडे भेटत गेलीत्या फुलांचे घोस पाहून 
आणि त्यांचा दरवळ हुंगला की नेहेमी वाटायचेयांचे आणि आपले कुठल्यातरी जन्माचे नाते आहे.
मी त्यांच्याशी संवाद साधू शकतेथोडक्यात ही फुले "माझीआहेत
तसाच हा संवाद माझा माझ्याशी आहेम्हणून पर्यायाने आणि ओघाने "बुचाची फुलेहेच नाव मनात आले.

वाचकांनी या मालिकेला भरघोस प्रतिसादप्रतिक्रिया दिल्या
काहींशी अतिशय जवळचे बंध निर्माण झाले.
'शनिवारी पत्र नसले तर चुकल्यासारखे वाटतेअशीही प्रतिक्रिया आली तेव्हा आत काहीतरी हलले 
आणि जबाबदारी वाढली असे वाटले

मी त्यात किती खरी उतरले माहीत नाहीपण हा संवादु "शब्देणहोता 
त्यामुळे शब्दांची आणि वाचकांची मी शतशः ऋणी आहे.

विक्रम काका आणि  लिहिलेली पत्रे यांच्या ऋणात मी नेहेमीच आहे आणि असेन
काका नसते तर हा साठीचा टप्पा मी गाठला नसतात्यामुळे विशेष लोभ

अखेरबुचाची फुले सगळ्यांच्या आयुष्यात आनंद देत राहोत असे म्हणून मी थांबते

स्नेहांकित,
नेहा

बुचाची फुले # ६०


मनू

काही वाटा समांतर असल्या तरी नेहेमीच सोबत असतात. भलेही त्या एकमेकांत मिसळत नसतील, नव्हे त्यांना तसे मिसळावे वाटले तरी ते नियतीला मान्य नसेल कदाचित. पण तरीही त्यांचा प्रवास थांबत नाही. आपापले वेगळे अस्तित्व सांभाळत त्या एकमेकांना सोबत करत चालत राहतात. नागमोडया वळणांवर त्या स्वतःला समजूतदारपणे सोपवून मोकळ्या होतात. वाटेतल्या अडथळ्यांना वळसा घालून पुन्हा चालू लागतात

अशी अबोल, समजूतदार सोबत किती जणांच्या नशिबात असेल मनू? आणि असली तरी ती कितीशी वाट्याला येत असेल, हे ही एक कोडेच.

आपला पत्र-प्रवास काहीसा असाच नाही? मी काही सांगण्याआधी ते तुला पोचावे आणि तू काही लिहिण्याआधी मलाहे शेवटले पत्र लिहिताना सुद्धा तू इथेच आहेस हे जाणवते आहे.....हा भास नक्कीच नाही. तू सूक्ष्म रूपाने इथे असतेस हा ठाम विश्वास आहे माझा. खरे ना?

एकटेपणा कुणाला चुकलाय मनू? तुझा एकटेपणा वेगळा आणि माझा वेगळा. पण त्या एकटेपणात ही अशी सोबत असली की आयुष्य बुचाचे झाड होते आणि ही पत्रे, ते सोबत चालणे, यो प्रवास, सगळ्या आठवणी बुचाची फुले होऊन जातात

हा आठवणींचा प्रवास कधीच संपू नये असे वाटते, नव्हे, तो संपणार नाहीच....जोवर बुचाची फुले आहेत तोवर. हो ना??

(बुचाच्या फुलांमध्ये तुला पाहणारा तुझा) रे

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

बुचाची फुले # ५९


रे

आत्ता विमानात बसले आहे. विमान प्रवासाची एक वेगळीच गंमत असतेआजूबाजूला निळभोर आकाश, त्यात पांढुरके ढगांचे पुंजके, दूरवर नजर टाकली तर ढगांच्या पायऱ्या असलेला रस्ता, खाली पाहावं तर सगळा लिलीपुटचा प्रदेश , आपल्या आजूबाजूला अर्धवट पेंगुळलेली माणसं, आईच्या खांद्यावर झोपी गेलेली गोड बाळं, सेवेला तत्पर हवाई सुंदऱ्या, लॅपटॉप आणि बाकी गॅजेट्स मध्ये रममाण झालेलं कॉर्पोरेट विश्व. सगळंच एखाद्या स्वप्नासारखं

मला नेहेमी वाटतं, कसं काय कळतं त्या वैमानिकाला की अमुक एका ढगावरून गेलो की डावीकडे वळायचं आहे, खाली नदी किंवा कालवा आला की अमुक एक ठिकाण आलं बुवा. कमाल आहे नाही. मला सगळे ढग सारखेच दिसतात, मुळात आकाशातले रस्ते आणि ट्रॅफिक हा विषयच आपल्या डोक्यात कधी येत नाही. वैमानिक रस्ता विसरत असेल का रे कधी? आणि विसरला तर त्याला सूचना मिळतील त्या ऐकून तो परत योग्य रस्त्याला लागत असेल का हे आपले माझे वेडीचे भाबडे प्रश्न

जिकडे तिकडे बर्फाळ प्रदेश असावा त्याप्रमाणे आत्ता ढगांचं साम्राज्य आहे विमानाभोवती. जमीन , समुद्र , नदी, झाडं, माणसं दिसायचं नाव नाही. अवकाशाची पोकळी, ढग आणि आपण - विमानाला चकवा लागला नाही ना अशी शंका यावी इतकं अंतर हे असंच पार करणं चालू आहे

मला या ढगांचे निरनिराळे आकार दिसतायत, दोन ढग एकत्र येऊन विलग होताना दिसतायत, ढगांची एक लांबलचक पट्टी आकाशाचा कॅनव्हास व्यापून टाकताना दिसतेय. मग फक्त ढगच, आकाश सुद्धा नाही. व्यापून राहणारा पांढरा रंग, जणू कापसाची दुलईच. मला यात लुप्त व्हावंसं वाटतं आहे. सगळ्या चिंता, धडपड, गोंधळ , दुःख मागे ठेवून त्या दुलईत लपून बसावं आणि सापडूच नये. खूप शोधावं आपल्याला माणसांनी आणि मग आपण हळूच बाहेर येऊन त्यांना वेडावून दाखवावं, त्यांचा सात्विक संताप गालातल्या गालात हसून झेलावा आणि मनात असे जिवलग दिल्याबद्दल देवाचे आभार मानावे

पण कसलं कायढगांची पट्टी मागे पडून, विमान खाली जायला सुरुवात होते आणि लिलीपुटचा प्रदेश परत दिसायला लागल्यावर हे स्वप्नरंजन थांबतं. तेवढ्यात हवाई सुंदरी येऊन सीटबेल्ट लावा सांगून जाते

प्रत्येक वेळी लँड होताना सीटबेल्ट बोचतोच, बघ !

म्हणूनच, एअरपोर्ट जवळ एखादे तरी बुचाचे झाड आहे का हे माझी नजर आपसूक शोधत राहते.

(सगळी विमाने तुझ्या गावावरून का जात नाहीत - इति) मी

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

बुचाची फुले # ५८


रे 

आतडे पिळवटवून टाकणारी वेदना असेल आणि गंतव्य-स्थान जवळ आल्याची जाणीव झाली की माणूस आपसूक प्रार्थनेकडे वळतो. एक प्रकारे वेदना ही प्रार्थनेची जननीच म्हणायची का रे? म्हणजेएरवी माणूस प्रार्थना करत नाही असे मुळीच नाही ; पण त्यात शरण भावापेक्षा आत्मसंतुष्टी करण्याचा हेतू जास्त असतो. म्हणजे मला हे हवे आहे, म्हणून मी देवाजवळ साकडे घातले. यात माणूस स्वतःला विसरून देवाला महत्व देतोय असा आभास असतो फक्त. तो समर्पित होत नसतो. हे समर्पण माणसाला स्वतःला किंवा जवळच्या व्यक्तीला वेदनेतून जाताना बघत असतानाच येते. या अशा प्रार्थनेत एक प्रकारची निराशा, हताश स्थितीअसते. जे आहे ते स्वीकरण्यावाचून गत्यंतर नसते आणि तरीही मनात एक अंधुकशी आशा पालवत राहते, की काहीतरी चमत्कार होईल , हे सगळे पूर्ववत होईल आणि वेदनेचा अंत होईल

ही निराशा, भयभीती अंतिम क्षणाची नसतेच मुळीतो अंतिम क्षण ज्या प्रकारे चालून येत असतो आणि कणा- कणाने सगळे गिळंकृत करत असतो त्याची असते.  कालपर्यंत सुरळीत चालू असलेले सगळे नुसतेच थांबत नाहीत तर "सगळेच किती क्षणभंगुर आहे आणि आपण वेड्यासारखे हे शाश्वत समजून चाललो होतो, नाचत होतो" अशी क्रूर जाणीव होते. सगळे आयुष्य त्या एका क्षणाभोवती फिरते. भोगणारा वेदना भोगतोच , पण बरोबर असणाराही दुपटीने भोगतो. शेवटी, त्या परम तत्वाला शरण जाणे, प्रार्थनेतून स्वतःला समजावणे हे येतेप्रार्थनेतून बळ मिळते - स्वतःला समजावण्याचे , परिस्थितीचा स्वीकार करण्याचे. जे क्षण हातात आहेत ते शक्य तितक्या उत्तम रित्या जगण्याचे आणि जवळच्या व्यक्तीबरोबर ते क्षण तन्मयतेने व्यतीत करण्याचे. सगळ्या परिस्थितीकडे स्थितप्रज्ञाप्रमाणे पाहून त्यातून उभे राहण्याचे, वेदनेशी समझोता करण्याचे अवसान अंगी येते

पण मग त्या प्रार्थनेचाही कधी कधी परिणाम दिसत नाही. आणि खरे पाहता, वेदनेनंतरची ही "प्रार्थनेचा काही परिणाम होण्याची" वेदना जास्त वेदनादायक असते. त्या वेदनेचे काय करायचे हे कुणालाच माहीत नसते. मग फक्त प्रश्न उरतातचहातचे सगळे निघून जाणार असेलच तर प्रार्थना काय कामाची ? आणि असे सगळे निसटल्यावर त्या प्रार्थनेचे काय होते ? विश्वास उरतो त्या प्रार्थनेवर , तिच्या शक्तीवर ?  मग जर का प्रार्थना फळाला येणार नसेल तर ती का करावी

केलेली प्रार्थना फळाला यावी यासाठी पुन्हा पुन्हा प्रार्थना करावी का ? आणि प्रार्थनेची प्रार्थना कुठे नेते आपल्याला ? तिचे पुढे काय होते ? सगळ्या प्रार्थना काळाच्या उदरात विरून जातात की गंतव्याच्या किनाऱ्यांवर काही पाऊलखुणा सोडून जातात

जागेपणी वेदना भोगणाऱ्या जिवाच्या चेहेऱ्यावर चिरनिद्रेच्या आधीन होताना हास्य कसे येते ? कसले समाधान असते ते? सगळ्यांना चुकवून निघून जाण्याचे, वेदनेपासून सुटका मिळाल्याचे आणि जवळच्या व्यक्तीला ती सुटका बहाल केल्याचे की आणखी कसले

काही उत्तरे शोधताना सुद्धा मनावरच्या खपल्या निघून दुःख वाहू लागते आणि वेदनेचे कढ उरी दाटतात. अशा वेळी मी पुन्हा निरांजनाची वात सारखी करायला सरसावते

काहीही असो, पण अंधाराच्या सावल्यांमध्ये वावरताना ही प्रार्थनेची शलाका लामणदिव्यासारखी तेवत राहते खरी !!! 

(प्रार्थनेलाच शरण जाऊ पाहणारी) मी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/