Search This Blog

Friday, May 28, 2021

#रंग_माझा_वेगळा -घट घट में पंछी बोलता



दोन वेगवेगळ्या गायकांनी गायलेलं एकच गाणं किंवा एकाच गाण्याचं जुनं आणि नवीन रूप ऐकताना आपलेही मूड्स बदलतात, त्या गाण्यातल्या शब्दांचं वजन, भाव बदलतो असं लक्षात येतं. गायकांनी आपल्या स्वतंत्र शैलीत त्या गाण्याला किंवा रागाला दिलेल्या "ट्रीटमेंट"मुळे एखादी रचना खूप वेगळी वाटू शकते. काहीवेळा तर रागही बदलतो त्यामुळे शब्द तेच असले तरी दोन पूर्णपणे वेगळ्या रचना ऐकतोय असं देखील वाटतं आणि दोन्हीही तितक्याच आवडतात. 

आजची पोस्ट ही अशाच एका रचनेविषयी - संत कबीराचे शब्द - 'घट घट में पंछी बोलता' याविषयी . हे कबीरभजन गानसरस्वती किशोरीताई आणि विदुषी वीणा सहस्रबुद्धे या दोघींनी स्वतंत्ररीत्या गायलं आहे. 

किशोरीताईंनी शुद्ध कल्याण आणि भूपमध्ये रचना बांधली आहे तर पंडित काशिनाथ बोडस यांनी भटियारमध्ये (यात थोडा विभासचाही भास आहे) बांधलेली रचना वीणाताईंच्या आवाजात ऐकायला मिळते. हे कबीरभजन गानसरस्वती किशोरीताई आणि विदुषी वीणा सहस्रबुद्धे या दोघींनी स्वतंत्ररीत्या गायलं आहे. किशोरीताईंनी शुद्ध कल्याण आणि भूपमध्ये रचना बांधली आहे तर पंडित काशिनाथ बोडस यांनी भटियारमध्ये (यात थोडा विभासचाही भास आहे) बांधलेली रचना वीणाताईंच्या आवाजात ऐकायला मिळते. 

कबीर म्हणलं की रूपक, उपमा आणि त्यातून 'कळतंय पण वळत नाही' धाटणीचं साधं सोपं पण आचरणात आणायला महाकठीण असं तत्त्वज्ञान आलंच. या भजनात कबीराने शरीराला 'घट' (घडा) आणि परमात्म्याला 'पंछी' (पक्षी) अशी रूपके योजली आहेत. शुद्ध कल्याणाचा गोडवा, समंजसपणा पेलत किशोरीताई ही रचना अतिशय आध्यात्मिक प्रतलावर नेऊन ठेवतात. तो पक्षीच कानात येऊन गुणगुणतोय, इतपत ही रचना आत उतरते. डोळे मिटून ऐकावं तर कबीर आणि किशोरीताई यांचं अद्वैत परोपरी जाणवतं. किशोरीताईंचा व्यासंग, शब्दांवरची पकड, सुरांमागची अध्यात्मिक बैठक यामुळे ही रचना आणि आपण वेगळे उरुच नये, इतका उच्चकोटीचा अनुभव पदरी पडतो. ही रचना ऐकून झाल्यानंतर शांतता, निवांतपणा आतवर झिरपतो. 

वीणाताईंच्या रचनेत एक crescendo आहे आणि कुठेही 'चढा' न वाटता वीणाताई ज्या प्रकारे ही रचना पोचवतात, त्याला तोड नाही. भटीयारमुळे या रचनेतलं तत्त्वज्ञान आणखी धारदार होतं. विशेषतः तोलता, डोलता, खोलता या शब्दांमधल्या "त्या"वरचा न्यास आणि लगोलग आलेली मींड यामुळे एखाद्या तहानलेल्या जीवाला कशी पाण्याची आस लागेल तशी अवस्था होते. "सुनो भाई साधो" वरच्या तानेला तर जितकी दाद द्यावी तितकी कमी, त्यामुळे कबीराने "मन की घूंडी" आणखी खोलावी, कबीर आपल्याला आणखी-आणखी कळावा असं वाटत राहतं. थोडासा विभासही डोकावत असल्यामुळे की काय, ही रचना हुरहूर लावते. या रचनेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही रचना ७ मात्रांच्या "सतवा तालात" बांधलेली आहे. निर्गुणी भजने गाताना आवश्यक मोकळीक मिळावी म्हणून पंडित कुमार गंधर्व यांनी हातमागाच्या ठेक्यावरून हा ताल बांधला. या वैशिष्ट्यपूर्ण ठेक्यामुळे कबीराच्या पक्ष्याला आवाज मिळत जातो आणि रचना आणखी जिवंत होते. 

आता कबीर या रचनेतून काय सांगतो त्याविषयी - 

घट घट में पंछी बोलता 

प्रत्येक देहामध्ये परमात्म्याचा, सर्जनशक्तीचा वास आहे. ही शक्ती, देहाच्या अनेक विकारातून, वासनांमधून बोलते, संक्रमित होते. म्हणजे माणूस अमुक एक गोष्ट करतो, किंवा ती शक्ती त्याच्याकडून करवून घेते, काहीही म्हणा. मग कुणी-कुणाला बऱ्या-वाईटाचा जाब विचारावा आणि कुणी कुणाचा हिशोब ठेवावा ? म्हणून कबीर म्हणतो, हे ईश्वरा, तूच तराजू, तूच त्याची न दिसणारी दांडी आणि तूच नापतोल करणारा. 

आप ही दंडी, आप तराज़ू , आप ही बैठा तोलता 

ही शक्ती खरंच आपल्यात आहे की नाही हे ओळखणार कसं ? तर ध्यानात मग्न असताना आपल्या आतला आवाज असतो. तोच तो अनाहत नाद - जो मुक्त आहे, प्रवाही आहे आणि एखाद्या पक्ष्याप्रमाणे हवे तेव्हा तो शरीराच्या आत किंवा बाहेर मुक्त संचार करू शकतो. तो ऐकू येणं हीच त्या शक्तीच्या अस्तित्त्वाची खूण. हा पक्षी म्हणजे एखाद्या माळ्यासारखा सर्जनशीलतेचा जनक आणि त्याने फुलवलेली सुंदर बाग म्हणजे खुद्द त्या सर्जनशीलतेचा आविष्कार. मग आयुष्यातले भले-बुरे अनुभव मला देणारी ती शक्ती म्हणजे तूच की रे ईश्वरा, असे कबीर म्हणतो. 

आप ही माली, आप बगीचा , 
आप ही कलियाँ तोड़ता , 

थोडक्यात सगळ्यांमध्ये तू आहेस आणि तूच वेगवेगळ्या शरीर-मन-इंद्रियांचा निर्माता आहेस. म्हणून तर या शरीराला (जड) आत्म्यामुळे (चेतना) अर्थ मिळाला. सब बन में सब आप बिराजे , जड़ चेतना में डोलता , शरीर संपेल म्हणून ते जड आहे पण आत्म्याला आदी-अंत नाही, म्हणून त्याला चेतन म्हणले आहे. त्यात अमर्याद शक्ती आहे, म्हणून कुडीत जीव असेतोवर ती समजून-उमजून वापरावी. हृदयात खोलवर जपलेला ठेवा जसा आढेवेढे न घेता समोर ठेवावा, तसे हे अंतिम सत्य कबीर उलगडून सांगतो. कहत कबीरा सुनो भाई साधो , मन की घूंडी खोलता तेव्हा, कोहम-सोहमचे कूटप्रश्न सोडा आणि कबीरासारखी 'मन की घुंडी' खोलत ह्या रचना जरूर ऐका ! 

 - नेहा लिमये 

 घट घट में पंछी बोलता - Links 

 गानसरस्वती किशोरीताई आमोणकर - https://www.youtube.com/watch?v=hJ0aApZMjls 
विदुषी वीणाताई सहस्रबुद्धे - https://www.youtube.com/watch?v=OFxsQ762rpw

No comments: