Search This Blog

Thursday, July 2, 2020

#मराठीभाषा- उचलबांगडी, कानफाट्या / कानाला खडा, डाक

उचलबांगडी करणे

संस्कृत मध्ये उत् म्हणजे वर आणि चल् म्हणजे हलणे, जाणे, निघणे. उचलणे म्हणजे खालून वर येणे.

उचलबांगडी या शब्दात बांगडी हा शब्द 'पांगडी' शब्दाचा अपभ्रंश आहे. पांगडी म्हणजे कोळ्यांचे मासे धरण्याचे जाळे. कोळी जाळे पसरून मासे आत आले म्हणजे ते उचलतो. हे जाळे मोठे असले म्हणजे ते दोघे चौघे मिळून सर्व बाजूनी एकदम उचलतात. तसेच, एखाद्या मुलाच्या मनात जायचे नसेल तर बाकीची मुले काही डोक्याकडून आणि काही पायाकडून एकदम त्याला उचलतात. त्यावरून पुष्कळजणांनी मिळून एखाद्याला शक्तीचा प्रयोग करून त्याच्या जागेवरून /पदावरून काढून टाकणे , असा अर्थ रूढ झाला.

(संदर्भ: मराठी व्युत्पत्ति कोश- कृ पां कुलकर्णी आणि मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी- वा गो आपटे)

___________________________________________________________________________________

कानफाट्या / कानाला खडा

कानफाटा म्हणजे नाथपंथी , गोसाव्यांची एक जमात. ह्या पंथात कानाला भोक पाडून किंवा फाडून त्यात लाकडाच्या बाळ्या (कुंडले) घालतात. यांच्या काही वर्तनाबद्दल एकूण लोक साशंक असत. म्हणून 'एकदा कानफाट्या नाव पडले की झालेच' असा वाक्य प्रयोग रूढ झाला. यावरून, एकदा एखाद्याचे नाव वाईट झाले की लोक काही चांगले केले तरी संशयच घेतात म्हणून पहिल्यापासून चांगले वर्तन ठेवावे, असा ध्वनित /अध्याहृत अर्थ.

असेच, कानाची पाळी खूप नाजूक असते आणि त्या ठिकाणी खडा दाबून धरणे हा पूर्वीच्या काळी शिक्षेचा प्रकार होता, यावरून कानाला खडा लावणे हा वाक्यप्रयोग आणि एकदा केलेली चूक पुन्हा करायची नाही असा निर्धार करणे, हा अर्थ.

(संदर्भ: मराठी व्युत्पत्ति कोश- कृ पां कुलकर्णी आणि विस्तारित शब्दरत्नाकर- वा गो आपटे)
___________________________________________________________________________________

डाक

डाक / डाँख हा हिंदी शब्द. धातूच्या भांड्याचे भोक बंद करण्यासाठी उपयोगात आणता तो धातूचा रस. सोप्या भाषेत, धातूचा जोड. डांकणे म्हणजे सांधा जोडणे हा एक अर्थ होतो.

दुसरा अर्थ, डाक म्हणजे टपाल. टपालाची मूळ कल्पना खलिफाच्या राज्यात सुरू झालेल्या 'बरीद' पासून आली. बरीद म्हणजे दूत किंवा संदेशवाहक. उतारुंना नेण्यासाठी ठिकठिकाणी टप्प्यावर घोडे ठेवण्याच्या जागा असत याला डाक-चौकी म्हणत. तसेच, बरीद-ए-मुमालिक' असा गुप्तचर विभागाचा प्रधान अधिकारी असे आणि याच्या अखत्यारीत गुप्तचर, संदेशवाहक आणि डाक-चौक्या असत.यावरून, डाकघर म्हणजे टपाल कचेरी. आणि डाकवाला म्हणजे टपाल वाटणारा.

(संदर्भ: मराठी व्युत्पत्ति कोश - कृ पां कुलकर्णी)

___________________________________________________________________________________

लेखन आणि संकलन - नेहा लिमये