Search This Blog

Showing posts with label शिक्षणविवेक-गंमत शब्दांची. Show all posts
Showing posts with label शिक्षणविवेक-गंमत शब्दांची. Show all posts

Tuesday, June 23, 2020

गंमत शब्दांची - २ -किमया

छोट्या दोस्तांनो , 

तुम्हाला हेलन केलर माहितीच असेल. तिला दिसत नसे, ऐकू येत नसे आणि बोलताही येत नसे. एकूणच तिच्या भवितव्याबद्दल तिच्या आई-वडिलांना, शिक्षकांनाही आशा  नव्हती. परंतु तिच्या आयुष्यात ऍनी सलिव्हन ही शिक्षिका आली आणि तिचे आयुष्यच बदलून गेले. या शिक्षकेच्या मार्गदर्शनाखाली हेलनने लेखिका, शिक्षिका होऊन सगळ्यांना चकित केले, शिवाय सामाजिक, राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. म्हणूनच ऍनीला 'किमयागार' म्हणजेच जादूगार असं म्हणलं जातं. हेलनसारख्याच अनेकांच्या जादुई वाटणाऱ्या प्रवासावर अच्युत गोडबोले यांचं "किमयागार" हे गाजलेलं पुस्तकही आहे. 

किमयागार मधल्या या 'किमया' शब्दामागची गंमत सुद्धा हेलनच्या गोष्टीसारखीच वेगळी आहे बरं का ! त्यासाठी आपल्याला इजिप्त देशात जावं लागेल. तर या इजिप्तचं जुनं नाव 'केमि' (keme) असं होतं. केमि म्हणजे काळं किंवा करपलेलं. असं सांगतात की इजिप्तमध्ये जी नाईल नदी आहे तिच्या चिखलामुळे तिथला किनारा नेहमी काळा , करपलेला दिसत असे त्यामुळे या देशाला  'केमि' असं नाव पडलं. पण ह्या देशातील लोक सोन्याचांदीच्या वस्तू, लोखंडाच्या वस्तू असो किंवा आणखी कुठल्या, त्यांचे धातुकाम चांगले करीत. ही धातुकामाची कला इथल्याच लोकांनी सुरु केली म्हणून त्या कामाला 'किमीच्या कला' किंवा 'chemy/ chemia' म्हणत. हाच chemia शब्द पुढे ग्रीस देशातही गेला आणि तिकडून अरबस्तानात आला ( अरबी भाषेत 'अल-किमया'). असा मजल दरमजल करत हा शब्द जेव्हा इंग्लिशमध्ये आला तेव्हा chemistry आणि alchemy हे शब्द रूढ झाले.  इंग्लिशमधून इतर भाषांमध्ये म्हणजे हिंदी, मराठीत या chemy वरून  'किमया' शब्द तयार झाला. 

 निकृष्ट किंवा हलक्या धातूचे सोने करण्याची विद्या किंवा कला म्हणजे 'किमया' म्हणजेच जादुगरी आणि किमयागार म्हणजे किमया/ जादू घडवून आणणारा किंवा जादू करणारा, असे या शब्दांचे अर्थ मराठीत आणि हिंदीत रूढ झाले

आहे की नाही या शब्दाचा प्रवास गंमतीशीर ? मग आता आई-बाबांना सांगून या सुट्टीत किमयागार पुस्तक नक्की वाचा आणि त्यावर आलेलं नाटक सुद्धा यू -ट्यूबवर बघा ! भेटूया पुढच्या महिन्यात आणखी एक नवीन शब्द घेऊन!

 तुमची, 

नेहाताई  

पूर्वप्रसिद्धी - शिक्षणविवेक मासिक -जून २०२० 



गंमत शब्दांची - १- इन मीन तीन

छोट्या दोस्तांनो

'इन मीन तीनच लोक तर होते दुकानात , काहीच गर्दी नव्हती आज, त्यामुळे पटकन काम झालं.' असं मोठी माणसं बोलत असताना तुम्ही ऐकलं असेल नामग यातलं इन मीन तीन म्हणजे काय हा प्रश्न पडलाच असेल तुम्हाला. तर आज याचा अर्थ समजून घेऊ

यातला =  ही म्हणजे बायको

= आणि

मी = आपण स्वतः

= आणि

ती = मुलगी

आता या सगळ्याची बेरीज केली तर आपल्याला मी, बायको आणि मुलगी असे उत्तर  मिळते. म्हणजेच इन मीन तीन म्हणजे अगदी छोटे कुटुंब किंवा अगदी छोटी संख्या

पूर्वीच्या काळी म्हणजे आजी-आजोबा  इन मीन सव्वातीन म्हणत असत. यात सव्वाची फोड परत = तो मुलगा, वा = किंवा ती = मुलगी म्हणजेच मी, बायको आणि मुलगा/ मुलगी अशी होत असे. इथे दोन मोठी माणसे आणि लहान मुले म्हणजे खरेतर चार पण लहान मुलांना अर्धेच धरले जाते म्हणून  सव्वातीन म्हणजे तीनपेक्षा जरासंच जास्त असे सांगायचे असते

एकूणच जिथे खूप कमी माणसे असतील तेव्हा इन मीन तीन असे म्हणायची पद्धत आहे. एखाद्या कार्यक्रमाला इन मीन तीनच जण जमलेत म्हणजे खूपच कमी माणसे आली आहेत असे म्हणायचे असते

 मग आता तुम्हीही आजी आजोबांशी बोलताना किंवा आई बाबांना सांगताना हे वापरून पाहा. जमेल ना

 

- नेहा लिमये 


पूर्वप्रसिद्धी- शिक्षणविवेक मासिक - मे २०२०

अंकाची लिंक - 

https://shikshanvivek.com//Encyc/2020/5/11/shikshanvivek-sutti-visheshanka-e-ank-.aspx