Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ५८


रे 

आतडे पिळवटवून टाकणारी वेदना असेल आणि गंतव्य-स्थान जवळ आल्याची जाणीव झाली की माणूस आपसूक प्रार्थनेकडे वळतो. एक प्रकारे वेदना ही प्रार्थनेची जननीच म्हणायची का रे? म्हणजेएरवी माणूस प्रार्थना करत नाही असे मुळीच नाही ; पण त्यात शरण भावापेक्षा आत्मसंतुष्टी करण्याचा हेतू जास्त असतो. म्हणजे मला हे हवे आहे, म्हणून मी देवाजवळ साकडे घातले. यात माणूस स्वतःला विसरून देवाला महत्व देतोय असा आभास असतो फक्त. तो समर्पित होत नसतो. हे समर्पण माणसाला स्वतःला किंवा जवळच्या व्यक्तीला वेदनेतून जाताना बघत असतानाच येते. या अशा प्रार्थनेत एक प्रकारची निराशा, हताश स्थितीअसते. जे आहे ते स्वीकरण्यावाचून गत्यंतर नसते आणि तरीही मनात एक अंधुकशी आशा पालवत राहते, की काहीतरी चमत्कार होईल , हे सगळे पूर्ववत होईल आणि वेदनेचा अंत होईल

ही निराशा, भयभीती अंतिम क्षणाची नसतेच मुळीतो अंतिम क्षण ज्या प्रकारे चालून येत असतो आणि कणा- कणाने सगळे गिळंकृत करत असतो त्याची असते.  कालपर्यंत सुरळीत चालू असलेले सगळे नुसतेच थांबत नाहीत तर "सगळेच किती क्षणभंगुर आहे आणि आपण वेड्यासारखे हे शाश्वत समजून चाललो होतो, नाचत होतो" अशी क्रूर जाणीव होते. सगळे आयुष्य त्या एका क्षणाभोवती फिरते. भोगणारा वेदना भोगतोच , पण बरोबर असणाराही दुपटीने भोगतो. शेवटी, त्या परम तत्वाला शरण जाणे, प्रार्थनेतून स्वतःला समजावणे हे येतेप्रार्थनेतून बळ मिळते - स्वतःला समजावण्याचे , परिस्थितीचा स्वीकार करण्याचे. जे क्षण हातात आहेत ते शक्य तितक्या उत्तम रित्या जगण्याचे आणि जवळच्या व्यक्तीबरोबर ते क्षण तन्मयतेने व्यतीत करण्याचे. सगळ्या परिस्थितीकडे स्थितप्रज्ञाप्रमाणे पाहून त्यातून उभे राहण्याचे, वेदनेशी समझोता करण्याचे अवसान अंगी येते

पण मग त्या प्रार्थनेचाही कधी कधी परिणाम दिसत नाही. आणि खरे पाहता, वेदनेनंतरची ही "प्रार्थनेचा काही परिणाम होण्याची" वेदना जास्त वेदनादायक असते. त्या वेदनेचे काय करायचे हे कुणालाच माहीत नसते. मग फक्त प्रश्न उरतातचहातचे सगळे निघून जाणार असेलच तर प्रार्थना काय कामाची ? आणि असे सगळे निसटल्यावर त्या प्रार्थनेचे काय होते ? विश्वास उरतो त्या प्रार्थनेवर , तिच्या शक्तीवर ?  मग जर का प्रार्थना फळाला येणार नसेल तर ती का करावी

केलेली प्रार्थना फळाला यावी यासाठी पुन्हा पुन्हा प्रार्थना करावी का ? आणि प्रार्थनेची प्रार्थना कुठे नेते आपल्याला ? तिचे पुढे काय होते ? सगळ्या प्रार्थना काळाच्या उदरात विरून जातात की गंतव्याच्या किनाऱ्यांवर काही पाऊलखुणा सोडून जातात

जागेपणी वेदना भोगणाऱ्या जिवाच्या चेहेऱ्यावर चिरनिद्रेच्या आधीन होताना हास्य कसे येते ? कसले समाधान असते ते? सगळ्यांना चुकवून निघून जाण्याचे, वेदनेपासून सुटका मिळाल्याचे आणि जवळच्या व्यक्तीला ती सुटका बहाल केल्याचे की आणखी कसले

काही उत्तरे शोधताना सुद्धा मनावरच्या खपल्या निघून दुःख वाहू लागते आणि वेदनेचे कढ उरी दाटतात. अशा वेळी मी पुन्हा निरांजनाची वात सारखी करायला सरसावते

काहीही असो, पण अंधाराच्या सावल्यांमध्ये वावरताना ही प्रार्थनेची शलाका लामणदिव्यासारखी तेवत राहते खरी !!! 

(प्रार्थनेलाच शरण जाऊ पाहणारी) मी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: