Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले # ५


रे 

कधी कधी मला वाटतं , का इतकी धावपळ करतो आपण. वेड्यासारखे धावत सुटतो सगळीकडे निरुद्देश. एकच कारण सगळ्यामागे, आपल्या माणसांना खुश ठेवणे, किमान पक्षी त्यांना काही कमी पडू देणे. आपल्याला कितीही adjustment करायला लागू देत , पण त्यांचं सगळं वेळच्या वेळी यथासांग होऊ दे. मग "जिथे कमी तिथे आम्ही" या न्यायाने हि सगळी माणसे आपल्याला गृहीत धरायला बघतात प्रत्येक गोष्टीत ; त्यात त्यांचा काय दोष 
?? आपणच ओढवून घेतो नाही हे सगळं ?? 

नाहीतर काही माणसं बघ , सगळ्यात असून नसल्यासारखी वावरतात. काही फरक पडत नाही त्यांनासमोरच्याची सोय-गैरसोय हे मुद्देच नसतात त्यांच्या जगण्यात. स्वार्थी असतात असही नाही अगदी पण स्वकेंद्रित असतात हे खरं. "रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा" हे जगतात ते अगदी पूर्णपणे. कसं काय जमतं काय माहित ? आपल्या मात्र ज्यात त्यात भावना अडकलेल्या, कुणी चांगलं म्हणावं प्रत्येक वेळी असं नाही रे, पण किमान जाणीव ठेवावी एवढी किमान अपेक्षा असतेच. ती अपेक्षा सुद्धा पायदळी तुडवली जाते बरेचदा, मग काय "मै  और मेरी तन्हाई " सुरु होत. आपण स्वतःपासून सुद्धा फार अलिप्त होत जातो - आपल्या आवडी निवडी पडतात बाजूला आणि इतरांची उठ -बस करण्यात दिवसच्या दिवस जातात

तू नेहेमी म्हणतोस, शेवटचं खळखळून कधी हसलोय, आठवत नाहीये.  मला तर मी शेवटची कधी मोकळेपणे रडले कुठला guilt ना बाळगता , ते सुद्धा आठवत नाहीये. इतकं हरवून बसलोय का रे आपण आपल्यालाच ?? खरं तर एक क्षण लागत नाही डोळ्यात पाणी यायला, पण पाणी पापण्यांच्या काठावरच राहतं आताशा, बाहेर पडत नाही , याला काय म्हणावं नक्की

एकच दिलासा आहे यात, तू आहेस बरोबर , तुझ्याकडे मन मोकळं करता येतं.  पण मग तुला मी फारच गृहीत धरतेय का रे, असंही वाटू लागतं . शेवटी प्रत्येकाला आपापले प्रॉब्लेम्स आहेतच की. यावर तू रागावून बोलणं बंद करशील थोडा वेळ हे कळतंय मला आणि हे हि माहितीये किथोड्याच वेळात विचारशील मला , काय गं , जेवलीस का ? बरीयेस नं ?? ..... हे बाकी फार गोड  आहे. आपलं असणं  आणि नसणं दोन्ही तितकंच जाणवतं समोरच्याला, हे पाहून मन शांतावतं जरा तरी , नाही ?? 

बाकी इथे उकाडा वाढलाय फार. लाही लाही होते दुपारच्या उन्हात. बुचाचं झाड सध्या प्रतीक्षेत आहे, पानगळ कधी थांबतेय याच्या. जरा ओकंबोकं दिसतंय त्यामुळे सध्या.  

हा उन्हाळा परवडतो पण अनेकदा माणसांचे उन्हाळे सोसताना आपण कोरडे होत जातो , ते नाही परवडत. म्हणून लवकर येतू आलास की माझ्याबरोबर बुचाच्या झाडाचाही उन्हाळा सरेल , हे वेगळं सांगायला नको. थांबते आता

(आजन्म तुझ्या सावलीच्या ऋणात असलेली) मी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: