Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # २७


रे 

मागच्या पत्रात मी तुला विचारले होते - मृत्यू कसा असतो आणि तो जवळ येऊन ठेपला असताना माणूस काय विचार करत असेल

यालाच जोडून मला आजकाल असे वाटते; रेमाणूस मृत्यूपेक्षाही जगण्याला जास्त घाबरतो. रोजच्या जगण्याच्या धडपडीतून तो चार विसाव्याचे क्षण शोधू पाहतो, ते सहजी मिळतात असे मुळीच नाही. प्रयासाने खेचून आणले तरी त्यात सुख-चैन जास्त आणि विसावा कमी असे वाटते. आजकाल विसाव्याची व्याख्या म्हणजे बाहेरगावी जाऊन राहणे , खाणे-पिणे याची  चंगळ असणे आणि एरवी दिवसात पाहून होणारी ठिकाणे दिवसात पाहणे अशी झाली आहे. त्यात गैर काही आहे असे मला वाटत नाही कारण धावपळीची "lifestyle". परंतु यात "विसावा" नक्की कुठे आहे हे नंतर माणूस अखंड शोधत राहतो असे वाटते मला . हे फक्त सुख आहे - आपल्याकडे असलेल्या "क्रयशक्ती" किंवा "purchasing power" मुळे येणारे सुख ! हे सुख कमी पडले कि माणसाला वाटते, आता कसे होणार आपले, जणू काही जगणेच संपतेय. एका अर्थी माणूस घाबरत घाबरत जगू लागतो

मला सांग रेविसावा कधी मिळतो ? जेव्हा आपल्याकडे आपल्यासाठी द्यायला वेळ असतो आणि तो कोणाकडे मागावा लागत नाही तेव्हा! स्वतःला शोधत शोधत आपण एखाद्या पायवाटेवरून जायला लागतो, वाटेत अनेक रम्य स्थळे लागतात त्यांचे सौन्दर्य आपण डोळ्यात साठवून घेतो, स्वतःला आहे तसे , आहे त्या ठिकाणी , त्या क्षणात स्वीकारतो, कुठलेही किंतु -परंतु आल्यास आपण त्याकडे डोळसपणे बघतो , काही काळ थांबतो, समजून घेतो आणि परत पुढची वाट सहज चालायला लागतो. ही वाट काहींसाठी अध्यात्माची असेल, काहींसाठी कलेची, काहींसाठी खेळाची, काहींसाठी नुसतीच काही करण्याची. पण ती वाट आपण चोखाळतो कारण तिथे आपण आपण असतो. दुसरे तिसरे कोणी नसून फक्त आपणअशा प्रकारे या वाटेवर चालत चालत जाताना आपल्याला हळू हळू पण निश्चित असे 'जगणे' सापडायला लागते

किती छान असते हे

मरण कुणाला चुकलेले नसतेच रे, पण जगणेही चुकलेले नाहीच !! आयुष्य भरभरून जगले तरच मृत्यूला जवळ करणे जमेल. जसे खाली पडलेली  बुचाची फुले वेचताना आपल्याला त्यांचा सुगंध श्वासात आधी भरून घ्यावासा वाटतो - आपण तेव्हा 'जगत' असतो तो सुगंधमग आपल्याला जाणवते की ती फुले फार काळ टिकणार नाहीत; सुकत चाललेली आहेत पण तरीही आपण ओंजळीत ती फुले धरून ठेवतो, त्यांचा स्पर्श अनुभवतो, त्यांचे कोमेजणे सुद्धा जगतो आपण. एक प्रकारे आपण बुचाच्या फुलात प्रवेश करून त्याचे जगणे अनुभवतो. हाच तो विसावा आणि हेच ते आयुष्य असते रे आपल्या माणसासोबतचे?? हो ???

तू कधी येतो आहेस ? फुलांच्या भाराने वाकलेले बुचाचे झाड मला विचारते आहे...... 

(तुझ्या विसाव्याच्या प्रतीक्षेत ) मी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: