Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ४३


रे 

मी बसस्टॉप वर उभी आहे........ सहजच, आज बसने ऑफिसला जाऊयात म्हणून. बस यायला वेळ होता म्हणून आजूबाजूला बघत बसले.  रस्त्याच्या पलीकडे समोरच पानपट्टीवाला भरात येऊन त्याच्या गिऱ्हाकांशी बिहारीत बोलतोय. त्याची सगळ्या स्तरातली गिऱ्हाईक सराईतपणे हव्या त्या पानाची ऑर्डर देऊन राजकारणापासून ते विराट कोहलीपर्यंत गप्पा मारतायत. बाजूलाच बूटपॉलिशवाला आणि चांभार ताटकळत बसलेत.  स्टॉपच्या बाजूचं जूस सेंटर आणि त्या भोवतीची तरुणाई हा एक स्वतंत्र लेखनाचा विषय होऊ शकतो. रस्त्यावरची वेगवेगळी वाहन आणि त्यांचे चालक हे अव्याहतपणे मुंगीच्या पावलाने सिग्नलहून पुढे सरकत आहेत. तर एकूणच असा बराच संसार त्या बस स्टॉप च्या आजूबाजूने सुखेनैव नांदतो आहे.

किती सहज वाटतात नाही ही  माणसं लांबून न्याहाळताना. पण त्यातल्या प्रत्येकाची एक वेगळी स्टोरी असेल. प्रत्येकाचं चालणं, बोलणं, वागणं , राहणं इतकंच काय उठणं,बसणं, खाणं -पिणं,  झोपण सगळंच काही ना काही कारणाने एका विशिष्ट पद्धतीने घडलं असेल. यातल्या प्रत्येकाच्या प्रत्येक सवयीमागे काही ना काही कारण असेल , नाही ? आणि आपण मारे शेरे मारून मोकळे होतो लगेच - अमक्याचे केस पाहिलेस का , तमक्याला आळस देताना बघ, ती नाही का बोलताना आवाज चिरकतो, तिला गाडीत बसलं रे बसलं कि झोप येते बघ, वगैरे वगैरे वगैरे. 

पण तुला माहितीय रे, हे असं सगळं निरीक्षण करताना मला अजून एक गोष्ट जाणवली, कि यातला प्रत्येक माणूस दर क्षणी बदलतोय त्याच्याही नकळत. म्हणजे बघ ना , तो काल जसा होता तसा आज नाही, आज आहे तसा उद्या नसेल. एवढंच काय मागच्या क्षणी होता तसाही पुढच्या क्षणी नसेल. आपण सहज म्हणून जातो - तो किंवा ती किती बदललाय / बदललीय. पण त्यामागे कित्तीतरी फॅक्टर्स काम करत असतील हा विचार नाही येत आपल्या मनात.

का होत असेल असं ?

म्हणजे, माणूस असुरक्षित असतो म्हणून तो लगेच एका "लेबल" मध्ये अडकवायला बघतो का समोरच्याला. तसं एकदा अडकवलं , की मनोमन तो त्या व्यक्तीला मनात एक चौकट बहाल करून टाकतो. त्या चौकटीच्या बाहेर जाऊन त्या व्यक्तीकडे पाहण्याची त्याला गरजच वाटत नाही. त्या चौकटीबाहेर त्याला ती व्यक्ती वेगळी भासू शकते; नव्हे असतेच, हे तो स्वीकारायला तयारच नसतो. हे बदलायला हवं ,नाही ? आणि सुरुवात आपल्यापासूनच व्हायला हवी. तर आपण समोरच्या व्यक्तीला जसंच्या तसं स्वीकारलंय असं म्हणता येईल. नाहीतर नुसतेच शब्दांचे फुगे सगळे !!

तर ..... 

बस स्टॉप च्या मागेही  बुचाचं झाड आहे आणि त्याला पाणी घालत असताना मला एकदम तू शेजारीच उभा आहेस असं वाटलं. खूप सुरक्षित वाटलं मला एकदम. 

(मनाच्या चौकटीबाहेरचा 'तू' जाणून घेण्यास उत्सुक) मी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: