Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ३१

रे

मागच्या पत्रात तू म्हणाला होतास की एखाद्याने अलिप्त राहायचे ठरवले तर त्याला बांधून घालू नये, त्या माणसाला जाऊ द्यावे. इतके सोप्पे असते का ते? सांग मला

नक्की काय करायचे माणसाला जाऊ द्यायचे म्हणजे?? काल जी व्यक्ती जगण्याचा अविभाज्य भाग होती तिला आजपासून वजा करून टाकायचे ? शरीराला अनेक अवयव असतात जे दिसतात , पण जो दिसत नाही अशा 'मन' नावाच्या अवयवाला तोडून फेकून द्यायचे स्वतःपासून वेगळे करून ?? की ज्या व्यक्तीने आपल्यासाठी इतके काही केले त्या व्यक्तीला निरोपही देता कृतघ्नपणे बेदखल करायचे आयुष्यातून ?? 

आणि हे सगळे का करायचे तर त्या व्यक्तीचा सहवास झेलण्यासाठी आपली ओंजळ थिटी पडते , म्हणून?? 

जिस रिशते को निभा नही सकते, उसे एक खूबसुरत मोड पार छोड देना चाहिये.....असं वाचलं होतं कुठेतरी. पण जिथे नातंच संपतं एक क्षणात, तिथे कसला मोड आणि काय देणार?? 

आपण स्वार्थी असतो रे, हेच खरं. चंदन जरी मिळालं तरी आपण फक्त सहाणेचं काम करतो, त्याला उगाळण्याचं. चंदन झिजत त्याला आपण जबाबदार आहोत हे गावीच नसतं आपल्या. ते संपलं की मग कळतं, आपणच संपवलं त्याला, आता फक्त सहाण उरलीय हातात. त्यावरचा लेप कधीच सुकून गेलाय.

नाही उरत काही हातात .... नाही उरत. कमनशिबी असतो आपण आणि तसेच राहणार

पापण्यांच्या कडा ओलावल्या तरी पुसणार कोण?? 

बुचाच्या झाडाकडे आज तरी मी बघू शकणार नाही...

थांबते

(संपलेल्या वाटेवर वाट पाहत थांबलेली) मी

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: