Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ३४


रे

परवा एक वाक्य पडलं कानावर "प्रॅक्टिकल लोकांचं एक बरं असतं , ते भावनिक नसतात त्यामुळे त्यांना त्रास होत नाही फारसा निर्णयाचा". 

मला त्यातली विसंगती खटकली. 

म्हणजे निर्णयाचा त्रास होत नाही म्हणून ही लोकं प्रॅक्टिकल होतात का प्रॅक्टिकल असतात म्हणून निर्णय सहजरित्या घेऊन टाकतात ? आणि एखाद्या निर्णयाप्रत पोचायला त्यांना कुठल्या भावनिक आंदोलनाचा सामना करावा लागलाच नसेल ; त्रास झालाच नसेल किंवा निर्णय घेतल्यानंतर हि माणसे आतून कोलमडून जात नसतील; अशी गृहीतके इतक्या सहज काढणारी माणसे भावनिक कशी ठरतात मग ?? 

मला विरोधाभास कळत नाही असे नाही; पण जगणे कायम ब्लॅक आणि व्हाईट असू शकत नाही. ग्रे शेड्स असतातच. 

जेव्हा कुठलाही निर्णय एखादी समंजस व्यक्ती घेऊ पहाते ती परिस्थितीचा आणि भवतालचा विचार करून घेऊ पाहते. त्याला अशी व्यवहारी, रूथलेस हि विशेषणे लावणे सोप्पे आहे. परंतु ती व्यक्ती सुद्धा आतून निर्णयाप्रत पोचत असताना मानसिकरित्या खचण्याचा अनुभव घेत असेल हे लक्षात येत नाही बरेचदा. उलट आपण समोरच्याला किती दुखावणार आहोत हे माहिती असताना सुद्धा असा निर्णय घेणे हि त्या व्यक्तीची त्या वेळची विवशता असू शकते. भावनिकता हि नेहेमीच व्यवहारिकतेच्या विरुद्धार्थी वापरली जाऊ नये असे मला वाटते. 

काय असतं हे प्रॅक्टिकल होणं -  आहे त्या परिस्थितीचा मनावर दगड ठेवून स्वीकार करणं ? सगळ्या भावना मनातच ठेवून; त्यांच्या आहारी न जाता प्रसंगाला शरण जाणं आणि  त्या प्रसंगानुरूप निर्णय घेणं ?? हे फार वरवर झालं रे. 

प्रॅक्टिकल होणं म्हणजे एक प्रकारे स्वतःला थोडं थोडं मारणं आणि तसं पाहत जगणं , त्याला तोंड देणं .  मनाविरुद्ध निर्णय घेऊन, दुखावल्या गेलेल्या व्यक्तीचे शिव्या-शाप सोसत राहणं. आणि तरीही दुःखाचे कढ पचवण्याची शक्ती आपल्याला सहज प्राप्त झालीये याचा मुखवटा चढवणं. नव्हे, तो मुखवटा घेऊन रोजचे व्यवहार नित्य नेमाने जणू काही घडलंच नाहीये, अशा पद्धतीने करणं. यात भावना नसतात किंवा मध्ये येत नाहीत हे कुणी सांगितलं ?? 

नाही रे, आपण प्रॅक्टिकल असतो म्हणजे भावना विरहित नसतो रे ..... उलट भावनाशील माणूसच प्रॅक्टिकल होऊ शकतो - त्याला स्वतःबरोबरच समोरच्याचं दुखावलं जाणं व्यवस्थित कळत  असतं  ! 

बुचाच्या झाडाला नाही कळत की अवेळी आलेल्या वादळात उन्मळून पडलं तरी दोष वादळाचा नसतो. त्याला परत आपली मुळ सावरून उभं राहायचंच असतं  !!! 

(तुझ्या विचारात हरवलेली ) मी 
पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: