Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ४७

रे 


मला अजूनही शाईपेन फार आवडतं. नवीन, कोरा करकरीत पेन आणि ती  कॅम्लिन ची दौत. नवीन दौत उघडल्यावर येणारा शाईचा वास, पेनात शाई भरायला लागताना करायला लागणारी कसरत, सोबत शाईच्या डागांनी माखलेलं फडकं किंवा कागदाचे बोळे आणि सरतेशेवटी शाईने भरलेले हात .... अहाहा ...एक सोहळाच असायचा तो नाही ? हे सगळे सोपस्कार पार पडले की मग मोत्यासारख्या अक्षरात केलेला अभ्यास किंवा नवीन पुस्तकावर घातलेलं लफ्फेदार अक्षरातलं माझं नावमला माझं नाव तेव्हा जरा  जास्तच आवडून जायचं नेहेमी

मग शाईपेनाचे खेळ ... एकेमकांवर दंगा मस्तीत शाईपेन दा झटकून झटकून शाई शिंपडणे  हा तर सगळ्यात आवडता उद्योग असे त्या काळीशाळेतून घरी गेल्यावर मग आईची पोटभर बोलणी खायची कि दुसऱ्या दिवशी परत तोच खेळ खेळायला तयारपण माझा सगळ्यात आवडता खेळ म्हणजे एक मोठ्ठा कागद घ्यायचा, त्याची मधोमध उभी घडी घालायची , मग एका भागात हवी तशी शाई शिंपडून घडी मिटायची आणि प्रेस करायचं कि फ्री-हॅन्ड ड्रॉइंग तयार. असंच मुळाक्षरांचं करायचं आणि मिरर इमेज पाहायच्या. मज्जा यायची


मी लिहायला लागले तेव्हाही बॉलपेनपेक्षा शाईपेनच जवळचं वाटायचं. कित्येक गाण्यांची नोटेशन्स , बंदिशी, आवडलेले शेर, कविता, गाणी, बोधवाक्य असं काय काय लिहून ठेवलेलं आहे माझ्याकडे. कुठली शाई कशाला वापरायची हे सुद्धा ठरलेलं होतं. म्हणजे बंदिश किंवा गाण्याची पहिली ओळ काळ्या शाईने आणि त्याखालची स्वरलघु गुरु वगैरे चिन्हे निळ्या शाईने. कविता निळ्या शाईतच, बोधवाक्य काळ्या शाईत, मेंदीची डिझाइन्स  दोन्ही रंगात ; त्यात लाल शाई पण मिळविली होती मी एकदा. तर हे असे उद्योग माझे त्या शाईसोबतकाही काळाने माझ्या आयुष्यातलं  शाईपेनाचं अस्तित्व लोप पावलं खरं , पण मनात कुठेतरी अजूनही ते ठाण मांडून आहे खरं

पूर्वी काही सुचत नसलं की मी काय करायची माहितीय ? शाईपेन उघडल्यासारखं करून त्याच्या निब मधून एक टपोरा शाईचा थेंब वहीच्या  कागदावर घ्यायचा. मग पेन परत लावून निब च्या टोकाने त्या थेंबाचे गोल गोल वळसे देत राहायचे खूप वेळ. शेवटी तो कागद भिजल्यामुळे फाटायचा तरीही खालच्या पानावर हे वळसे देणं चालूच राहायचं. मग एका क्षणाला तेही वर्तुळ शाईने भरलं कि उगा मनाला समाधान मिळायचं  की वरचा कागद शाबूत आहे, त्याला काही नाही झालेलं. वहीच्या त्या दोन पानांवर परत काही लिहिता यायचं नाही. ती तशीच - म्हणलं तर कोरी आणि म्हणलं तर भरलेली

आयुष्याची काही पानं सुद्धा अशीच असतात का रेकोरी तरी भरलेली ?? इतकंच की त्या पानांवरचे शाईचे थेंब दिसत नाहीत आणि पुसलेही जात नाहीत पण तरी ते असतात

आज खूप दिवसांनी ; तू इथे विसरून गेला होतास ते शाईपेन हाती घेतलं आणि एकेक आठवत गेलं

उन्हाळा वाढतोय. गुलमोहर , बहावा , जॅकरांदा फ़ुललेत त्यामुळे डोळ्यांना सुख आहेमी आज घरी नाही, कामासाठी प्रवास करतेय... राहून राहून बुचाच्या झाडाची आठवण येतेय

(तुझ्याच शाईपेनाने तुला पत्र लिहिणारी) मी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: