Search This Blog

Tuesday, November 20, 2018

लघुकथा -४ -तीव्र मध्यम

पहाटेच उठून शुचिर्भूत होऊन ती दिवाणखान्यात आली. सरस्वतीचे स्मरण करून तिने तानपुरा जुळवायला सुरुवात केली. भटियार का ललत…मनातल्या तीव्र मध्यमाला तिने विचारलं. 

तेवढ्यात दारावरच्या घंटीने खणखणीत पंचम लावला…. 

आत्ता एवढ्या पहाटे कोण आलं ?? 

दारात उंचापुरा देखणा तरुण उभा….  घारे डोळे तिच्यावर रोखलेले, गालांवर मिश्किल हसू, केसांची झुलपं कपाळावर सांडलेली …चेहेऱ्यावर अवखळ भाव !

दोन वर्षांपूर्वी अमेरिकेला गेलेला आपला लेक अचानक दारात बघून ती थबकली. 

तिच्या आजच्या रियाजाची सांगता लेकाच्या डोळ्यात दिसली तिला. 

मनातल्या मनात हळूच तीव्र मध्यमाला म्हणाली…….असा भेटणार होतास होय मला आज 'केदार' बनून !!!  
:) :)



 - नेहा लिमये 

(पूर्वप्रसिद्धी - नुक्कड फेसबुक पेज - द्वारा बुकहंगामा.com ) 

No comments: